काजूचे सर्वात मोठे झाड जंगलाप्रमाणे येते दिसून
जगातील काजूचे सर्वात मोठे झाड ब्राझीलमध्ये आहे. येथील रियो ग्रांडे डो नॉर्ट प्रांताची राजधानी डो नॉर्टमध्ये हे झाड आहे. याला कॅश्यू ऑफ पिरांगी या नावाने देखील ओळखले जाते. हे झाड आकारात इतके मोठे आहे की एक छोट्या जंगलाप्रमाणे ते दिसते. याला गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सकडून जगातील सर्वात मोठे काजूचे झाड म्हणूनही मान्यता देण्यात आली आहे. या झाडाचा आकार अद्याप वाढत आहे. आता या झाडाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
हे झाड एखाद्या जंगलाप्रमाणे दिसते, परंतु प्रत्यक्षात हे केवळ एकच झाड असल्याचे या व्हिडिओच्या कॅप्शनदाखल नमूद करण्यात आले आहे. वर्षभरात या झाडाद्वारे अनेक टन काजू मिळत असतात. तसेच याच्या फळात तीन संत्र्यांपेक्षा अधिक प्रमाणात व्हिटॅमिन सी असते असे सांगण्यात आले आहे.
गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या एका अहवालानुसार काजूचे हे झाड दोन एकर क्षेत्रात फैलावलेले आहे. आकारात हे 70 नियमिक काजूच्या झाडांइतके आहे. हे झाड 100 वर्षांपेक्षा अधिक जुने असल्याचे मानले जाते. 1888 मध्ये लुइस इनासियो डी ओलिवेरा नावाच्या एका स्थानिक मच्छिमाराने याचे रोप लावले होते.
विशाल आकारामागील कारण
हे झाड इतक्या मोठ्या आकारात वाढण्यामागील कारण जेनेटिक म्युटेशन आहे. याचमुळे झाडाच्या 5 फांद्यांपैकी चार जेव्हा जमिनीला स्पर्श करतात, तेव्हा त्याचे मूळ जमिनीत तग धरते आणि त्यातून आणखी फांद्या निर्माण होतात असे गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून म्हटले गेले आहे.