कोल्हापुरतील 'या' गावात भरला जातो पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोंगड्यांचा बाजार ; होते कोट्यवधींची उलाढाल
महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू राज्यातून 250 पेक्षा अधिक घोंगड्याचे इथे येतात
कोल्हापूर : पारंपरिक पद्धतीने हातावर विणलेली, अंगाला बोलणारी पण तितकीच आरोग्यवर्धक, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा आशा तिन्हीही ऋतूत खासकरून धनगर बांधवांची ओळख असलेल्या घोंगड्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा बाजार विठ्ठल- बिरदेवाचे देवस्थान असलेल्या कोल्हापुरातील पट्टणकडोली गावात भरतो.
महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू राज्यातून 250 पेक्षा अधिक घोंगड्याचे व्यापारी दरवर्षी पट्टणकोडोलीच्या यात्रेनिमित्त गावात येतात, वेगवेगळ्या 25 प्रकारच्या पारंपरिक घोंगड्यांच्या होणाऱ्या विक्रीतून दहा दिवसांच्या काळात दोन ते अडीच कोटींची उलाढाल या व्यवसायातून होत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं तर बदललेल्या जीवनशैलीमुळे पारंपारिक हस्तकलेची वीण आधुनिक तंत्रज्ञानाने उसवल्याची खंत ही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. जान आणि बाललोकर या घोंगड्यांना सर्वाधिक मागणी आहे तर नवीपिढी या व्यवसायात यायला हवी अशी अपेक्षाही जाणकार व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू, गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पट्टणकडोलीतील विठ्ठल- बिरदेवाची यात्रा सुरू आहे. लाखो भाविक पट्टणकोडोलीत या यात्रेसाठी दाखल होतात. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोंगड्यांचा बाजार इथं भरतो, मेंढ्यांच्या लोकरापासून बनणाऱ्या सुबक हस्तकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली उबदार घोंगडी पट्टणकडोलीच्या बाजाराचं वैशिष्ट्य आहेत.
मोठ्या प्रमाणात सांगली, सातारा, सोलापूर कोल्हापूर आणि सीमाभागात असणाऱ्या धनगर बांधवांचं ऊन, वारा, पावसात संरक्षण करणाऱ्या आणि आरोग्यवर्धक असणाऱ्या या घोंगड्यांचा गेल्या एक शतकांपासून बाजार पट्टणकोडोलीत भरतो. धनगरी, धावळी, कुदरगी, बल्लारी लोकापुरी यासह 15 ते 20 प्रकारांची घोंगडी या बाजारात उपलब्ध असतात. पूर्वीप्रमाणे या व्यवसायाने ही कात टाकली असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मशीनवर बनवलेली पानिपत घोंगड्यांनी पारंपारिक घोंगड्यांची जागा घेतली असल्याचं गेली 45 वर्ष घोंगडी विकण्यासाठी येणाऱ्या केशव सणगर व्यापाऱ्यांनी सांगितलं.