‘लँड रोव्हर’चे खेडे
‘लँड रोव्हर’ कार असणे हे एक प्रतिष्ठेचे चिन्ह आहे. प्रत्येक श्रीमंताला ही कार आपल्याजवळ असावी असे वाटते. मोठे उद्योगपती, अभिनेते आणि श्रीमंत लोकांकडे ही कार असते. तथापि, भारतात एक खेडेगाव असे आहे, की ज्यातील प्रत्येक घरासमोर आपल्याला एक लँड रोव्हर उभी आहे, असे सकाळी किंवा रात्री दिसून येईल. हे दृष्य पाहिल्यावर आपल्याला आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. प्रत्येक शहरी श्रीमंताकडेही जीं गाडी नसते, ती या खेड्यातील प्रत्येक घरात कशी, असा प्रश्न निश्चितपणे आपल्यासमोर उभा राहील. या खेड्याचे नाव ‘मानेभंजन’ असे असून ते पश्चिम बंगाल राज्यातील दार्जिलिंग जिल्ह्यात भारत आणि नेपाळ यांच्या सीमेवर वसले आहे. दार्जिलिंग शहरापासून ते साधारणत: 28 किलोमीटर दूर आहे. हे गाव त्याच्या निसर्गसौंदर्यासाठी आणि डोंगरदऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे.
याच खेड्याला ‘लँड रोव्हरचे गाव’ असेही संबोधले जाते. या गावातील जवळपास प्रत्येक घरात एक लँड रोव्हर किंवा तत्सम महागडी लक्झरी कार आहे. मात्र, महत्वाची बाब अशी की, या गावातील लोक या कार्स स्वत:च्या चैनीसाठी उपयोगात आणत नाहीत. तर त्यांचा उपयोग टॅक्सीप्रमाणे केला जातो. या गावातील प्रत्येक घरात एक तरी टॅक्सी व्यावसायिक आहे. तो टॅक्सी चालविण्याचा व्यवसाय करतो, या प्रदेशात प्रेक्षणीय पर्यटनस्थळे असल्याने येथे नेहमी विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्यांच्यासाठी या महागड्या कार्स ट्रक्सी म्हणून उपयोगात आणल्या जातात. या गाड्यांपैकी काही 60 ते 70 वर्षे जुन्या आहेत. तरीही त्या आजही या उंचसखल आणि दुर्गम भागात प्रवासाची उत्तम सेवा देतात. या खेड्यातील लोकांनी 1960 पासून या व्यवसायाला प्रारंभ केला. या व्यवसायात प्राप्ती बख्खळ होत असल्याने संपूर्ण गावानेच तो स्वीकारल्याचे दिसून येते. त्यामुळे या गावात अशा महागड्या कार्स आणि एसयुव्हीही दिसून येतात.