आमच्या गावचे गायरान आम्हाला परत द्या ! सांगरूळ ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मागणी
आठ दिवसात निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
सांगरूळ / वार्ताहर
ग्रामपंचायतीस कोणतीही पूर्व सूचना न देता परस्पर सर्वे करून सांगरूळ येथील गायरान मधील जमीन कृषी विद्यापीठाच्या नावावर केली आहे .यामुळे ग्रामस्थांच्या मधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत . ही जमीन शासनाने ग्रामपंचायतकडे परत करावी अशी मागणी सांगरूळ येथील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .याबाबतचा निर्णय आठ दिवसात न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे .
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की ग्रामपंचायत सांगरूळ कडील गायरान क्षेत्रापैकी एकूण ९०.३९ हेक्टर ( २२५ एकर ) जमीन वन खातेकडे वर्ग झाली आहे व इतर हक्कात नाव लागले आहे . तसेच अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी इतर अधिकारात सहयोगी अधिष्ठाता राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांना त्यापैकी ५० हेक्टर आर क्षेत्र (१२५ एकर ) जमीन देणेबाबत आदेश दिला आहे . या आदेशानुसार मंडल अधिकारी व तलाठी यांनी फेरफार केलेला आहे .
या संपूर्ण घडामोडीत कोणत्याही प्रकारचा ना हरकत दाखला ग्रामपंचायत सांगरूळ यांचेकडून घेतलेला नाही . सध्या ही जमीन हस्तांतरित झाल्यानंतर घनकचरा ,सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, पर्यटन स्थळ, चराऊ गायरान यासाठी तसेच इतर सेवा सुविधा पुरविणेसाठी ग्रामपंचायतकडे कोणत्याही प्रकारची जमीन शिल्लक नाही . त्यामुळे शासनाने परस्पर निर्णय घेऊन गावकऱ्यांच्यावर तसेच गावावर अन्याय केला आहे . याबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे .सांगरूळ ग्रामस्थांच्यावर शासनाने लादलेला अन्यायकारक निर्णय रद्द करून आठ दिवसात हस्तांतर झालेली जमीन सांगरूळ ग्रामपंचायतीकडे परत करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे .या निवेदनावर सरपंच शितल खाडे उपसरपंच विद्या चाबूक यांचे सह सर्व सदस्य व गावातील सर्वपक्षीय नेते संघटनांचे व तरुण मंडळाचे कार्यकर्ते यांच्या सह्या आहेत .
वनविभागातील संबंधित अधिकाऱ्यांची
याबाबत बैठक लावून एक आठवड्याच्या आत निर्णय घेऊ अशी ग्वाही शिष्टमंडळाला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे .
यावेळी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे मा जि प सदस्य बाजीनाथ खाडे सदाशिव खाडे निवास वातकर कृष्णात चाबूक प्रदीप नाळे आनंदा कासोटे विलास आसगावकर भगवान लोंढे शशिकांत म्हेतर आरुण खाडे यांचे सह गावातील सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य व तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते .