अपात्र लाभार्थ्यांना लाडकी बहिण योजना बंद
नवीन नियमावलीची अंमलबजावणी सुरू: कोल्हापुरातील शेकडो महिलांचा समावेश : चारचाकी, ‘संजय गांधी’, नमो योजनेतील लाभार्थ्यांचा पत्ता कट
कोल्हापूरः विनोद सावंत
राज्य शासनाने लाडकी बहिण योजनेसाठी नव्याने नियमावली केली आहे. याची अंमलबजावणी या महिन्यांपासूनच सुरू झाली असून यामध्ये अपात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांची लाडकी बहिण योजना बंद केली आहे. कोल्हापुरात अशा शेकडो महिलांचा समावेश आहे. या महिन्यांतील १५०० रूपयांचा हप्ता जमा झाला नसल्याने त्यांनी माहिती घेतली असता हा प्रकार समोर आला आहे.
विधानसभेच्या निवडणूकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहिण योजना सुरू केली. पात्र लाभार्थ्यांना दर महिना १५०० रूपये दिले जात आहेत. जानेवारी अखेरपर्यंत या योजनेचे सात हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा झाले होते. आठवा हप्ता फेब्रुवारी महिना झाला तरी मिळालेला नव्हता. यावरून विरोधकांनी या योजनेबाबत टिका सुरू केली. अखेर राज्यशासनाने ही योजना बंद करणार नसून पुढेही सुरू ठेवली जाईल, अशी ग्वाही दिली. तसेच फेब्रुवारी महिन्यातील देय रक्कम महिला दिनी जमा केली.
लाडकी बहिण योजनेसाठी कोल्हापूर जिल्ह्यात १० लाख १३ हजार ६३० लाभार्थी होते. परंतू राज्यशासनाने विधानसभा निवडणूकीनंतर नियमावलीत बदल केला. सरसकट सर्वच माहिलांसाठी ही योजना नसून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही योजना सुरू केल्याचे सांगण्यात आले. यानुसार चारचाकी असणाऱ्यांनाही अपात्र ठरविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. या नवीन नियमांची अंमलबजावणी राज्यशासनाने या महिन्यापासून म्हणजेच मार्चपासूनच केल्याचे दिसून येत आहे. कोल्हापुरातील काही लाभार्थ्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नसल्याने त्यांनी संबंधित कार्यालयात चौकशी केली. यावर त्यांना कळाले की नवीन नियमानुसार योजनेतून आपणास अपात्र करण्यात आले आहे. यामुळे त्यांना रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले.
अपात्र लाभार्थ्यांची निश्चित आकडेवारी समजणे कठीण
नवीन नियमावलीनुसार कोल्हापुरात एकूण किती लाभार्थ्यांना लाडकी बहिण योजना बंद झाली याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्याकडे चौकशी केली असता. त्यांनी मुंबईतील महिला व बाल कल्याण विभागानेच लाभार्थ्यांची माहिती संकलित केली असून थेट नावे कमी केली असल्याचे सांगितले. यामुळेच कोल्हापुरातील किती लाभार्थ्यांना नवीन नियमानुसार अपात्र ठरवून योजना बंद केली याचा नेमका आकडा समजू शकलेला नाही.
५० हून अधिक महिला साधला संपर्क
लाडकी बहिण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता जमा झाला नाही, अशी तक्रार घेऊन आतापर्यंत ५० हून अधिक महिला कार्यालयात चौकशीसाठी आल्या होत्या. यांची संगणकावर तपासणी केली असता नवीन नियमानुसार ते अपात्र ठरल्याचे समोर आले. यामध्ये चारचाकी असल्याने, आधारकार्ड दुसऱ्याचे दिल्याने, संजय गांधी निराधार योजना, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असल्याचा समावेश आहे.
सुहास वाईंगडे, जिल्हा महिला विकास अधिकारी
आरटीओ विभागाच्या मुख्यालयातूनच घेतली माहिती
लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी पात्र असणारेच असावेत. यासाठी सर्व्हे करण्यात आला. सर्व्हेसाठी गेल्यानंतर काहींनी चार चाकी वाहने असतानाही नसल्याचे सांगितले. यामुळे मुंबईतील महिला व बाल कल्याण विभागाने थेट प्रादेशिक परिवहन विभागाच्या मुख्यालयातूनच चारचाकी वाहन असणाऱ्यांची यादीच घेऊन संबंधितां लाभार्थ्यांना अपात्र केले असल्याचे समजते.
अर्ज करतानाच ४० हजार लाभार्थी अपात्र
राज्यशासनाने योजना जाहीर केल्यानंतर पोर्टोल आणि अॅपवर अशी दोन स्तरावर लाभार्थ्यांची नोंदणी झाली. यामध्ये पोर्टोलवर ३ लाख ५७ हजार ३५८ लाभार्थी झाले. तर अॅपवरूनक ६ लाख ९६ हजार ७७७ लाभार्थींची नोंद झाली. असे एकूण १० लाख १३ हजार ६३० लाभार्थी होते. यावेळी अपुरे कागदपत्र जमा झाल्याने तब्बल ४० हजार ५०५ अर्जदारांचे अर्ज अपात्र करण्यात आले.
एकूण पात्र लाभार्थी - १० लाख १३ हजार ६३०
अपात्र लाभार्थी - ४० हजार ५०५
फेब्रुवारीचा हप्ता- १५००
वाटप होणारी एकूण रक्कम- ३०४ कोटी ८ लाख ९० हजार
स्वत:हून लाभा नाकारलेले लाभार्थी : ६७
योजनेतून अपात्र होण्याची कारणे
चारचाकी वाहन असणे.
एकाच कुटूंबात दोन पेक्षा अधिक लाभार्थी.
बनावट कागदपत्राद्वारे योजनेचा लाभ.
कुटूंबातील एकाला निवृत्त वेतन.
अडीच लाख पेक्षा जास्त उत्पन्न.
पाच एकर पेक्षा अधिक जमिन.