For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

परम धामाच्या प्रवासाचे श्रम जाणवत नाहीत

06:31 AM Jan 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
परम धामाच्या प्रवासाचे श्रम जाणवत नाहीत
Advertisement

अध्याय सहावा

Advertisement

ईश्वराच्या चेतन मायेमुळे सजीव हालचाली करू शकतात. सत्वगुणी लोक या चेतन मायेचा सदुपयोग करून घेऊन स्वत:च्या उद्धाराच्या दृष्टीने अनुकूल असा विचार करून त्यानुसार हालचाली करतात व स्वत:चा उध्दार करून घेतात. याउलट रज व तमगुणी लोक ईश्वराच्या जडमायेच्या प्रभावाखाली येऊन जडमायेने तयार केलेल्या शरीराच्या व इतर वस्तूंच्या प्रेमापोटी ईश्वराला विसरतात. भोग, संग्रह, शरीराचं कोडकौतुक इत्यादीत रमून जातात. शरीराला सुख, आराम देणाऱ्या वस्तूंच्या मोहात अडकतात. देह म्हणजेच मी अशी ठाम धारणा असल्याने देह सुखी तर मी सुखी, हे मनोगत साध्य करण्यासाठी नाना प्रकारची पाप कर्मे करत असतात. त्यामुळे त्यांचे चित्त मलिन झालेले असते. परिणामी त्यांना स्वत:च्या आत्मरूपाचे भान राहत नाही तर त्यांना ईश्वराचे महत्त्व कसे पटणार? ईश्वर प्राणाच्या रूपात स्वत: शरीरात हजर असतात. प्राण्यांना त्यांच्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या हालचाली करण्याचे सामर्थ्य पुरवतात. ईश्वरीतत्व समजण्यासाठी त्याने सत्वगुणाची वृद्धी करावी अशी त्यांची अपेक्षा असते पण ज्यांना ईश्वरीतत्व शोधण्यात स्वारस्य नसते ते स्वार्थापोटी रज, तम गुणांची वृद्धी करतात आणि ईश्वराचं अस्तित्व साफ नाकारतात.

ज्यांनी त्यांच्या जीवनातील ईश्वराचे महत्त्व ओळखलेलं असतं अशा काही मुठभर लोकांना ईश्वरी तत्व जाणण्यात रस असतो. ते त्यांच्यावरील मायेचे आवरण दूर होण्यासाठी सर्वप्रकारच्या मोहाचा त्याग करतात. पुढील श्लोकात बाप्पा अशा महान लोकांच्याबद्दल सविस्तर सांगत आहेत.

Advertisement

यो मे तत्त्वं विजानाति मोहं त्यजति सोऽ खिलम्

अनेकैर्जन्मभिश्चैवं ज्ञात्वा मां मुच्यते ततऽ ।। 12 ।।

अर्थ- जो माझे तत्त्व जाणणारा सर्वप्रकारच्या मोहाचा त्याग करतो. नंतर अनेक जन्मांतरी मला पूर्णपणे जाणून तो मुक्त होतो.

विवरण- बाप्पा म्हणतायत ईश्वराने मायेच्या शक्तीने सृष्टीनिर्मिती केली आहे हे ज्यांच्या लक्षात येतं ते जीवनातून मायेला दूर करायचा प्रयत्न करतात पण स्वबळावर हे करणं अशक्य आहे हे लक्षात आल्यावर मायेच्या कचाट्यातून सुटण्यासाठी मला शरण येतात. असे लोकच मोहाच्या भोवऱ्यातून बाहेर पडू शकतात. परंतु ही सुद्धा अनेक जन्मांची तपश्चर्या आहे कारण जरी मनुष्य ईश्वराला शरण गेला तरी त्याला कोणत्या गोष्टीचा केव्हा मोह पडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे जरी तो ईश्वराला शरण गेलेला असला तरी पुन:पुन्हा मोहाच्या गर्तेत सापडून प्रवाहपतीत होऊ शकतो. मोहपाशातून दूर राहून ईश्वरी तत्वाला आपलंसं करण्यासाठी संपूर्ण निरपेक्षता अंगी बाणवावी लागते. संपूर्ण निरपेक्ष होणं, म्हणजे देहबुद्धी नष्ट होणं. संपूर्ण निरपेक्ष होणं आणि ईश्वरी तत्व समजणं या दोन्ही गोष्टी एकदमच घडतात. जरी हा जन्मजन्मांतरीचा प्रवास असला तरी तो अत्यंत आनंददायी असल्याने कधीही कंटाळवाणा होत नाही. ज्याप्रमाणे आपण एखाद्या फळाफुलांनी बहरलेल्या वाटेवरून चालत असलो तर आपल्याला चालण्याचे श्रम जाणवत नाहीत त्याप्रमाणे या परम धामाकडे जायच्या वाटचालीचे श्रम जाणवत नाहीत. ह्या प्रवासाची सुरवात आपल्या आवडत्या देवाची भक्ती करण्यातून होते. अर्थात ह्या सर्व देवांची निर्मिती मीच केली असल्याने ती माझीच भक्ती ठरते. सुरवातीला काही फळ मिळावे म्हणून भक्ती केली जाते पण भक्ती करून मिळालेले फळ नाशवंत आहे हे समजल्यावर नाशवंत फळासाठी भक्ती करण्यात काही अर्थ नाही हे लक्षात आल्याने तो कोणत्याही फळाची अपेक्षा न करता केवळ माझ्यावरील प्रेमापोटी माझी भक्ती केली जाते. निरपेक्षतेने माझी भक्ती करणारा भक्त मला प्राणप्रिय असतो.

क्रमश:

Advertisement

.