क्षेत्रज्ञ हा अनादि, इंद्रियरहित असतो
अध्याय नववा
बाप्पा म्हणाले, शब्दाच्या आधारे वस्तूचे नाम, रूप, गुण, धर्म, क्रिया, विकार याचे वर्णन करता येते पण परब्रह्मस्वरूप शब्दातून वर्णन करता येत नाही म्हणून श्रुती नेती नेती असे सांगून हात टेकतात. परब्रह्मस्वरूप वर्णन करता येत नसले तरी प्राप्त केले जाऊ शकते. यावरून लक्षात येईल की, ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे व त्या ज्ञानाच्या बळावर ईश्वरीस्वरूप समजलेलं आहे तो बाहेरून चारचौघांसारखाच दिसतो. परंतु त्याची वर्तणूक इतरांच्यापेक्षा वेगळी असल्याने उठून दिसते. साधुसंत, योगी, महात्मे यांची वर्तणूक खूप वेळा आपल्याला वेगळी वाटते. तसेच त्यांचे बोलणे बऱ्याचदा अनाकलनीय असते. याचं कारण त्यांना झालेलं आत्मज्ञान हेच होय. देव पहायला गेलो आणि देवरूप झालो अशी त्यांची अवस्था झालेली असते. पुढील श्लोकात बाप्पा समजून घेण्याच्या विषयाची म्हणजे क्षेत्रज्ञाची वैशिष्ट्यो सांगत आहेत.
यदनादीन्द्रियैर्हीनं गुणभुग्गुणवर्जितम् ।
अव्यत्तं सदसद्भिन्नमिन्द्रियार्थावभासकम् ।। 27।।
विश्वभृच्चाखिलव्यापि त्वेकं नानेव भासते ।
बाह्याभ्यन्तरतऽ पूर्णमसंगं तमसऽ परम् ।। 28।।
दुर्ज्ञेयं चातिसूक्ष्मत्वाद्दीप्तानामपि भासकम् ।
ज्ञेयमेतादृशं विद्धि ज्ञानगम्यं पुरातनम् ।। 29 ।।
अर्थ- जे अनादि, इंद्रियरहित गुण भोगणारे, पण गुणांनी विरहित, अव्यक्त, सत् व असत या दोहोहूनहि वेगळे, इंद्रिये व त्यांचे विषय प्रकाशित करणारे, विश्वाचे पालन करणारे, सर्वव्यापी, एक असून नाना प्रकारांनी भासमान होणारे, बाह्यत: व आन्तरत: पूर्ण असलेले, संगरहित, अंधकाराच्या पलीकडे असलेले, अति सूक्ष्मत्वामुळे जाणण्याला कठिण, प्रकाशमान वस्तूंना देखील प्रकाशित करणारे, असे ते ज्ञानानेच समजणारे पुरातन ज्ञेय म्हणजे जाणून घेण्याचा विषय आहे असे जाण.
विवरण- ही ज्ञानाची वैशिष्ट्यो आपण क्रमाने समजून घेऊ म्हणजे क्षेत्रज्ञाची ओळख आपल्याला होईल. समजा एखाद्या गावाला आपल्याला जायचे आहे पण आपल्याला ते गाव अनोळखी आहे. मग आपण काय करतो, तर त्या गावात राहणारा किंवा त्या गावाला जाऊन आलेल्या एखाद्या व्यक्तीकडे तेथील तपशील विचारून घेतो आणि त्याचा उपयोग करून त्या गावात गेल्यावर तर्काने अचूकपणे इच्छित ठिकाणी पोहोचतो. तसंच बाप्पा आपल्याला क्षेत्रज्ञाबद्दल काही खुणेच्या गोष्टी सांगत आहेत.
क्षेत्रज्ञ हा अनादि, इंद्रियरहित गुण भोगणारा पण गुणांनी विरहित, अव्यक्त, सत् व असत या दोहोहूनही वेगळा, इंद्रिये व त्यांचे विषय प्रकाशित करणारा, विश्वाचे पालन करणारा, सर्वव्यापी असूनही नाना प्रकारांनी भासमान होणारा, बाह्यत: व आन्तरत: पूर्ण असलेला, संगरहित, अंधाराच्या पलीकडे असलेला, अति सूक्ष्मत्वामुळे जाणण्याला कठीण, प्रकाशमान वस्तूंना देखील प्रकाशित करणारा, ज्ञानानेच समजणारा असा आहे. बाप्पांनी सांगितलेली क्षेत्रज्ञाची वैशिष्ठ्यो आपण एक एक करून समजून घेऊ.
संसार हे क्षेत्र असून त्याला जाणणारा क्षेत्रज्ञ ईश्वर आहे. बाप्पांनी क्षेत्रज्ञाला अनादि असं म्हटलंय. अनादि म्हणजे सुरवात माहित नसलेला. नित्य बदलत जाणाऱ्या संसाराची निर्मिती ईश्वराने केलेली आहे पण त्याची सुरवात कुठून झाली हे कुणालाही माहित नाही म्हणून त्याला अनादि असे म्हंटले आहे.
पुढं बाप्पा त्याला इंद्रियरहीत असं म्हणतात. प्रत्येक क्षेत्राच्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक देहात आत्म्याच्या स्वरूपात क्षेत्रज्ञ वास करत असतो. आत्मा देहाच्या हालचाली, स्वत:च्या चैतन्य शक्तीच्या बळावर सुनियोजितपणे घडवून आणत असतो. आत्म्याच्या शुद्ध स्वरूपामुळे तो स्वत: मात्र इंद्रियरहीत असतो.
क्रमश: