For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अभ्यासाच्या ‘कोकण पॅटर्न’वर पुन्हा शिक्कामोर्तब!

06:56 AM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
अभ्यासाच्या ‘कोकण पॅटर्न’वर पुन्हा शिक्कामोर्तब
Advertisement

फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये झालेल्या राज्य परीक्षा मंडळाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच ऑनलाईन जाहीर झाले. नेहमीप्रमाणे याहीवर्षी कोकण बोर्डाने राज्यात आपला अव्वल क्रमांक कायम राखला आहे. सलग 13 वर्षे 10वी व 12वीच्या परीक्षेत राज्यात सर्वोत्तम निकाल देत कोकण विभागीय मंडळाने आपलाच 12 वर्षे उच्चतम निकालाचा विक्रम मोडत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. याबद्दल प्रशासकीय यंत्रणेपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्वच घटक विशेष कौतुकाला पात्र आहेत. सातत्याने अग्रस्थान कायम राखण्यामागे कोकण विभागाचा नेमका कोणता विशेष पॅटर्न राबविला जातो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Advertisement

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च महिन्यात 10वी व 12वी च्या परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. कोकण बोर्डात अत्यंत शांततेत आणि कॉपीमुक्त वातावरणात या परीक्षा पार पडल्या. भरारी पथकांसह विविध यंत्रणांनी विविध तत्कालिक अडचणींवर मात करत आपापली कामगिरी यथायोग्य पार पाडली. उत्तरपत्रिका तपासणी, स्व्रुटिनी आदी कामेही वेळेत व काटेकोरपणे पार पडली. राज्यात सर्वच मंडळांचे काम वेळेत पूर्ण झाल्याने यावर्षी पहिल्यांदाच निकाल अनुक्रमे 21 आणि 27 मे रोजी लागले. निकाल जाहीर करतानाच मंडळ अध्यक्षांनी “यावर्षी नेहमीप्रमाणे कोकण बोर्डाचा निकाल सर्वाधिक” असल्याचे सांगत सलग 13व्या उच्चतम निकालाचे कौतुक केले. प्रसार माध्यमांनीही “नेहमीप्रमाणे कोकण बोर्ड” अव्वल असल्याचा मुद्दाच पुन्हा एकदा मांडला.

मंगळवार 21 मे रोजी 12वीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये कोकण बोर्डाने पुन्हा एकदा बाजी मारली. कोकण विभागीय मंडळामधून सिंधुदुर्ग जिह्यातील 9 हजार 72 तर रत्नागिरी जिल्हयातील 16 हजार 721 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले होते. यातील जिल्हानिहाय अनुक्रमे 8921 (98.33 टक्के) व 16 हजार 232(97.07) विद्यार्थी यशस्वी झाले. कोकण विभागाचा एकूण निकाल 97.51 टक्के लागला. नेहमीप्रमाणे याहीवेळी कोकण बोर्डात सिंधुदुर्ग जिह्याचा निकाल रत्नागिरीपेक्षा अधिक तर मुलींचा निकाल मुलांपेक्षा सुमारे अडीच टक्क्यांनी अधिक आहे.

Advertisement

कोकण विभागात 12वीच्या परीक्षेत प्रविष्ट 25हजार 793 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 8426 म्हणजे 32 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी विशेष गुणवत्ता व प्रथम श्रेणीतील आहेत. तृतीय श्रेणीतील विद्यार्थीसंख्या जेमतेम 10 टक्के एवढीच आहे. हे आकडे केवळ एकूण निकालच अव्वल नव्हे तर उच्च गुण मिळविणारे विद्यार्थीही कोकण बोर्डात अधिक असल्याचे स्पष्ट करतात. 12वीसाठी उपलब्ध 79 पैकी तब्बल 30 विषयांचा निकालही 100 टक्के लागला आहे. विशेष म्हणजे यामध्ये संस्कृत, सामान्य ज्ञान व माहिती तंत्रज्ञान सारख्या विषयांचा समावेश आहे. बारावीमध्ये पुर्नपरीक्षार्थी व खाजगी विद्यार्थ्यांचा निकालही 80 टक्क्यांच्या पुढे लागला आहे, ही बाबही उल्लेखनीय आहे.

बारावीमागोमाग 27 मे रोजी लागलेल्या दहावीच्या निकालातही कोकण विभागाने पुन्हा एकदा 99.01 टक्के निकालासह अग्रस्थान टिकवून ठेवले आहे. परीक्षेला 26 हजार 780 विद्यार्थ्यांपैकी 26 हजार 517 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीचा निकाल बेस्ट ऑफ फाइव्ह सूत्रानुसार जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये कला-क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीबद्दलच्या जादा गुणांचाही समावेश आहे. उच्च माध्यमिक विभागाकडे ज्याप्रमाणे उच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांची संख्या चांगली आहे शेष गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांची संख्या कौतुकास्पद आहे. त्याचप्रमाणे 10वीमध्येही 9 हजार 515 विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी तर 10 हजार 940 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे. 90 टक्केपेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी सुमारे साडेपाच टक्के (1473) असून 85 ते 90 टक्के गुण मिळवणारे 1987 तर 80 ते 85 टक्के गुणांच्या स्तरावर 2 हजार 722 विद्यार्थी आहेत. 80 टक्केपेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी सुमारे 24 टक्के आहेत. 40 टक्केपेक्षा कमी गुण मिळविणारे विद्यार्थी जेमतेम 4 टक्के आहेत. बारावीमध्ये 38 टक्के विषयांचा निकाल 100 टक्के लागला होता तर दहावीमध्ये 19 पैकी 8 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. हे प्रमाण 42 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

कोकण बोर्डात बारावीत नेहमीप्रमाणे मुलींचा निकाल सुमारे अडीच टक्क्यांनी अधिक आहे. याचबरोबर नेहमीप्रमाणे रत्नागिरीच्या तुलनेने सिंधुदुर्ग जिह्यात विद्यार्थी संख्या खूपच कमी असली तरी निकालात मात्र वरचष्मा दिसून येतो. कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही ज्ञान शाखांमध्ये सिंधुदुर्गचा निकाल 1 ते 2 टक्क्यांनी अधिक आहे. याचवेळी व्यवसाय अभ्यासक्रम आणि तांत्रिक विषयात मात्र सिंधुदुर्ग जिल्हा 3 ते 5.4 टक्क्यांनी मागे पडलेला दिसतो. या दोन शाखांमध्ये सिंधुदुर्ग जिह्याने अधिक लक्ष दिल्यास हा टक्का आणखी वधारेल, हे निश्चित. दहावीतही रत्नागिरी जिल्ह्यापेक्षा (98.85 टक्के) सिंधुदुर्ग जिह्याचा निकाल (99.35 टक्के) लागला आहे. दहावीतही रत्नागिरी जिह्याची विद्यार्थीसंख्या सिंधुदुर्गपेक्षा अधिक आहे. कोकण विभागात वेंगुर्ला तालुक्याने 99.52 टक्के निकालासह बाजी मारली असून लांजा तालुक्याचा निकाल सर्वात कमी (96.99टक्के) आहे.

कोकण विभागाचे हे निर्भेळ यश अचानक जादूने किंवा नशिबाने मिळालेले यश नक्कीच नाही. गेली अनेक दशके प्राथमिक स्तरापासून विविध घटकांनी प्रामाणिकपणे घेतलेल्या कष्टांचे हे फळ आहे. भरमसाठ प्रश्नपत्रिका सोडवून घेणे, पाठांतर वा पोपटपंची करवून घेणे यासारखे केवळ कागदावरचे गुण दाखवणारे उपाय कोकणात कधीच अवलंबले गेलेले नाहीत.  साहजिकच गेली 13 वर्षे कोकणाने जपलेले हे यश राजमार्गावर वाटचाल करून पारदर्शकपणे मिळविलेले यश आहे, असेच म्हणावे लागेल.

सातत्याने यश मिळत राहिले की पॅटर्नची चर्चा सुऊ होते. त्यामुळे कोकण विभागातही असा काही विशेष पॅटर्न राबविला जातो का हा प्रश्न पुढे येणे स्वाभाविक आहे. त्या-त्या वेळा विविध घटकांनी केलेल्या प्रयत्नांतून हा पॅटर्न आपोआप तयार झाला असून आता तो पक्का ऊजला आहे, असेच म्हणावे लागेल. या विभागात अजूनही शिक्षणाचे बाजारीकरण झालेले नाही. नव्याने काही ‘व्यापारी’ प्रवेशकर्ते झाले असले तरी ही येथील बहुतांश शाळा स्वत:च्या खिशाला चाट देऊनच संस्थाचालक व शिक्षकांकडून चालवल्या जात आहेत. या प्रामाणिकपणाचेही हे फळ म्हणावे लागेल. सतत 13 वर्षे निर्विवाद वर्चस्व मिळवून देणारा कोकण पॅटर्न यातच दडलेला आहे. मोठ-मोठ्या जाहिराती, भरमसाठ फी, गाजावाजा यातील काहीही न करता विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थाचालक, अधिकारी व शिक्षणप्रेमी समाज या सर्वांचे सामूहिकपणे प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण प्रयत्न म्हणजेच यशाचा कोकण पॅटर्न म्हणावा लागेल.

विश्वेश जोशी

Advertisement
Tags :

.