रांगणा किल्ल्यावरील कोकण दरवाजा खुला झाला...
भगवान चिले व त्यांच्या सहकाऱ्यांनी महाशिवरात्रीनिमित्त राबवला उपक्रम
कोल्हापूरः सुधाकर काशीद
महाशिवरात्रीचा सोहळा कोणी सामूहिक पूजा, भजन ,मिरवणुका ,कोणी महाप्रसाद वाटप करून साजरा केला. प्रत्येकाच्या श्रद्धा व्यक्त करण्याचा तो जरूर एक भाग होता . पण कोल्हापुरातील पाच तरुणांनी रांगणा किल्ल्यावर चार दिवस राहून श्रमदानाने किल्ल्याचा कोकण दरवाजा खुला केला .काळाच्या ओघात हा दरवाजा मातीच्या ढिगार्याखाली दडत चालला होता . रांगणा किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व व या किल्ल्यावरील महादेव महादेवाबद्दलची श्रद्धा यातून या पाच जणांनी किल्ल्यावरील महादेव मंदिरात राहून महाशिवरात्रीला हा एक अनोखा उपक्रम पूर्ण केला .
रांगणा किल्ल्यावरून तळ कोकणात नारू र(तालुका कुडाळ) येथे या दरवाज्यातून निघण्राया दगडी पायवाटेने उतरता येते .रांगणा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी ,महाराणी ताराराणी यांच्या ऐतिहासिक घडामोडींचा साक्षीदार आहे . कोल्हापूर जिह्यात भुदरगड तालुक्यातील पाटगावच्या पुढे भटवाडी व चिकेवाडी नंतर हा रांगणा किल्ला आहे मार्गात दहा किलोमीटर अंतराचे घनदाट जंगल आहे . त्यामुळे वनदुर्ग म्हणून ही किल्ल्याची नोंद आहे .या किल्ल्याच्या परिसरात ब्लॅक पॅंथर असल्याची वन विभागाकडे नोंद आहे . किल्ल्याजवळ चिकेवाडी हे छोटेसे गाव आहे व त्यानंतर किल्ल्याचा परिसर सुरू होतो आणि किल्ल्याचा कडा थेट कोकणाला जाऊन भिडतो .
इतिहासातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तू काळाच्या ओघात मातीच्या ढिगार्याखाली दडलेल्या आहेत . काही वास्तू किल्ला प्रेमी तरुणांनी जरूर त्यांच्या त्यांच्या ताकतीनुसार स्वच्छ केल्या आहेत . अशाच वास्तुपैकी किल्ल्यावरील कोकण दरवाजा काळाच्या ओघात निम्म्याहून अधिक मातीच्या ढिगार्याखाली दडला होता . या दरवाज्यातून निघणारी वाट तळ कोकणात नारूर गावात जाऊन थांबते. किल्ल्याजवळच्या चिकेवाडी या गावातील लोक या वाटेनेच ये जा करतात .हा दरवाजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहे.
गडप्रेमी भगवान चिले व त्यांचे सहकारी अगदी एक खास सेवा म्हणून रांगणा किल्ल्याच्या संवर्धनासाठी झटतात .यावर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्यांनी मातीच्या ढिगार्याखाली अडकलेला कोकण दरवाजा खुला करायचे ठरवले . महाशिवरात्रीच्या आधी तीन दिवस ते त्यांच्या सहक्रायासोबत गेले . त्यांच्यासोबत अभिजीत दुर्गुळे ,अभिषेक घाटगे, अवधूत पाटील व त्यांची मुलगी जान्हवी हे होते . सोबत कुदळ, फावडे, लोखंडी पार हे साहित्यही त्यांनी घेतले होते .त्यांनी प्रयत्नपूर्वक कोकण दरवाजा खुला करण्यास सुरुवात केली. जर जसा मातीचा ढीग दूर होत गेला तसतसे दरवाज्याचे अंतरंग खुले होऊ लागले .दरवाज्याच्या दगडी उंबरठ्यावर असलेले कीर्ती मुखहीदिसू लागले . महाशिवरात्रीदिवशी त्यांनी हा कोकण दरवाजा पूर्ण स्वच्छ केला . त्याला किल्ल्यावरील रान फुलांचे तोरण बांधले . रांगोळीने चौकट सजवली .
हे चारही दिवस चौघेही रांगणा किल्ल्यावरच असलेल्या महादेव मंदिरात राहत होते . जेवण स्वत? बनवून खात होते . अमावस्येचा कालावधी असल्यामुळे अमावस्येचा काळोख म्हणजे काय असतो हे त्यांनी अनुभवले . पण अगदी जिद्दीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने कोकण दरवाजाला त्यांनी खुले केले . त्या दरवाज्याच्या दगडी उंब्रयावर माथा टेकवुन त्यांनी या किल्ल्यावरील स्राया इतिहासाला आणि महादेवाला वंदन केले.
कोल्हापूरकरांनो एकदा रांगणा किल्ला पहाच.....
शिवकालीन गड किल्ले व त्यात दडलेला इतिहास नव्या पिढीसमोर आणण्याचा निसर्ग वेध या आमच्या संस्थेचा उद्देश आहे. रांगणा किल्ला हे कोल्हापूर जिल्ह्याचे ऐतिहासिक वैभव आहे. राज्यातून, देशातून हा किल्ला पाहण्यासाठी इतिहास प्रेमी येतात.पण आपण कोल्हापूरकरांनी एकदा या किल्लाला भेट द्यावी. व त्याचा भोवतालच्या अजस्त्र डोंगर रांगांचे दर्शन घ्यावे. इतिहासाला क्षणभर तरी स्मरावे. किल्ला म्हणजे केवळ इतिहास प्रेमी व गड किल्ले प्रेमी यांनी तो जपावा असे काही नाही. आपल्या साऱ्या कोल्हापूरकरांचा रांगणा किल्ला हा अमूल्या ठेवा आहे.
-भगवान चिले.