गुऱ्हाळघरांना घरघर,कोल्हापुरी गुळाचा ब्रँड धोक्यात
कोल्हापूर / कृष्णात चौगले :
कोल्हापूरी गुळाचा गोडवा राज्यासह देशभरात प्रसिध्द आहे. गुळव्यांच्या हातामध्ये गुळाची चव आणि दर्जा असतो. त्यांच्या कौशल्यावर गुळाचा दर्जा आणि किंमत ठरते. ऊस तोच सर्व साहित्य तेच असते. गुळव्या बदलला की गुळाची चव बदलते. पण यंदाच्या गुऱ्हाळाच्या हंगामात गुळवे आणि मजुरांच्या टंचाईमुळे सुमारे 80 गुऱ्हाळघरेच सुरु झाली आहेत. त्यामुळे कोल्हापुरी गुळाचे उत्पादन घटत चालले असून बाजार समितीमध्ये साखर मिश्रीत कर्नाटकी गुळाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या दहा वर्षातील परिस्थिती पाहता जिह्यातील 1450 नोंदणीकृत गुऱ्हाळघरांपैकी 1350 पेक्षा अधिक गुऱ्हाळघरे बंद पडली आहेत.
जिह्यामध्ये पारंपारिक पद्धतीने गूळ बनविणारे गुळवे पन्हाळा, शाहुवाडी, गगनबावडा या भागात मिळतात. पण गूऱ्हाळासाठी ऊसतोडणी आणि इतर कामांसाठी मजुरांची कमतरता आहे. हे मजूर साधारणपणे बीड, उस्मानाबाद, लातूर या भागात मिळतात. यंदा तर गुऱ्हाळमालक मजुरांच्या शोधात चक्क बिहारपर्यंत पोहोचले आहेत. दरवर्षी तीन ते चार महिन्याच्या हंगामासाठी मजूरांना तीन ते सहा लाखापर्यंत मजुरी द्यावी लागते. दरम्यान गेल्या काही वर्षामध्ये या भागातील काही मजुरांच्या टोळ्यांनी पैसे घेऊन देखील कामाला न येता गुऱ्हाळ मालकास फसवल्याचे प्रकार घडले आहेत. या भितीपोटी अनेक गुऱ्हाळमालकांनी या भागातील मजूर आणण्याचे टाळले आहे.
राज्यातील अनेक कृषी महाविद्यालयांनी गूळ बनविण्याच्या तांत्रिक पद्धती विकसित केल्या असल्या तरी गुळव्यांचे प्रशिक्षण देणारी सर्वच यंत्रणा कमी पडत आहे. तसेच बाजार समितीकडूनही अशा प्रशिक्षणाचे आयोजन केले जात नाही. बाजार समितीच्या अहवालानुसार जिह्यातील 1450 नोंदीत गुऱ्हाळघरांसाठी सुमारे 50 ते 60 हजार मजूरांची गरज असताना सुमारे 5 ते 7 हजार मजूर उपलब्ध होत आहेत. परिणामी स्थनिक मजूरांची मदत घेऊन गुऱ्हाळ चालकांकडून गूळ उत्पादन केले जात आहे. तसेच मजुराअभावी जिह्यातील अनेक गुऱ्हाळघरे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
शासन पातळीवर कृषी महाविद्यालयांनी केवळ प्रदर्शनासाठी गूळ बनविण्याच्या कार्यशाळा घेतल्या. कागदोपत्री नोंदी करून लाखो रूपयांचा खर्च केला. मात्र गूळ बनविणारे नवे गुळवे तयार केले नाहीत. त्यामुळे कृषी महाविद्यालय व कृषी संशोधन केंद्राचे प्रयत्न अपयशी ठरल्याचे दिसत आहेत.
गुऱ्हाळ मालकांकडूनच गुळव्याचे तंत्र आत्मसात
गुळव्यांच्या टंचाईमुळे अनेक गुऱ्हाळ मालकांनीच गुळव्याचे तंत्र आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक मजुरांसह घरातीलच काही सदस्यांसह गुऱ्हाळघरे चालविण्याच्या प्रयत्नात आहेत. दरवर्षी मनुष्यबळाची अडचण येत असल्याने गुऱ्हाळघरांची संख्या कमी होत चालली आहे. कृषी महाविद्यालय अथवा कृषी संशोधन केंद्राने हे प्रशिक्षण कार्यक्रम घेवून गुळवे तयार करणे गरजेचे आहे. मात्र सर्वच यंत्रणांनी याकडे दूर्लक्ष केले आहे.
कर्नाटकी गुळाचा व्यापार तेजीत
कोल्हापूर म्हटले की गुळ, कोल्हापुरी चप्पल आणि तांबडा पांढरा रस्सा ही वैशिष्ट्यो ठळकपणे डोळ्यासमोर येतात. कोल्हापुरात येणारे पर्यटक गुळ आणि तांबडा, पांढरा रस्याची चव चाखल्याशिवाय बाहेर पडत नाहीत. पण गेल्या काही वर्षांपासून कोल्हापुरी गूळाच्या नावाखाली कर्नाटकचा साखरयुक्त गुळ कोल्हापुरात दिसत आहे. परिणामी शाहुनगरीतील गुळाचा ब्रँड धोक्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी बाजार समितीच्या तत्कालिन संचालकांनी कर्नाटकमधून येणाऱ्या गुळावर निर्बंध घालून कोल्हापूरतील गुळ निर्मीतीला चालना देण्यासाठी प्रयत्न केले होते. पण आजही कर्नाटकी गुळाचा व्यापार तेजीत आहे. या गुळामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्याची कोल्हापुरी गुळापेक्षा कमी दरात विक्री केली जाते. साहजिकच बाहेरील राज्यातील व्यापाऱ्यांकडून कमी दरात मिळणारा कर्नाटकी गुळ खरेदी करण्याकडे कल वाढत असून त्याचे कोल्हापूरी गुळ तयार करणाऱ्यांसमोर आव्हान आहे. शेतकऱ्यांनी नुकतेच गुळ सौदे बंद पाडून कर्नाटनातील गुळाला कोल्हापूरचे नाव न देता त्याची कर्नाटकच्या नावावरच विक्री करण्याची मागणी केल्यानंतर बाजार समितीने ती मान्य केली आहे. तरीही ‘चोरी चुपके’ कर्नाटकी गुळाला कोल्हापूरी ‘लेबल’ लावणाऱ्या व्यापाऱ्यांवर वॉच ठेवण्याची गरज आहे.