अचानक रोखण्यात आली केदारनाथ यात्रा
सुरक्षित स्थानांवर रोखण्यात आले भाविक
वृत्तसंस्था/ देहरादून
उत्तराखंडमध्ये सातत्याने होणारी अतिवृष्टी आणि हवामान विभागाकडून जारी ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीदाखल केदारनाथ यात्रा अस्थायी स्वरुपात रोखली आहे. भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता देत हा निर्णय घेण्यात आला आहे. रुद्रप्रयाग जिल्ह्यातील विविध पर्वतीय क्षेत्रांमध्ये सातत्याने पाऊस पडत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हवामान विभागाने आगामी काही तासांमध्ये मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि वादळसदृश स्थितीची शक्यता वर्तविली आहे. संभाव्य धोका पाहता केदारनाथ धामच्या दिशेने जाणाऱ्या भाविकांना विविध ठिकाणी आणि होल्डिंग क्षेत्रांमध्ये रोखून सुरक्षितस्थळी थांबविण्यात आले आहे.
पायी यात्रा करणाऱ्यांनाही रोखले
पायी यात्रामार्गावरील भाविकांनाही नजीकच्या सुरक्षितस्थळी आणि निर्धारित होल्डिंग एरियामध्ये थांबविण्यात आले आहे. तर श्रीनगर क्षेत्र केदारनाथ धामच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची वाहतूक सध्या रोखण्यात आली आहे. वाहनांना निर्धारित होल्डिंग क्षेत्रात उभे करविण्यात येत आहे, जेणेकरून हवामान सामान्य होईपर्यंत कुठल्याही प्रकारच्या दुर्घटनेची शक्यता निर्माण होणार नाही.
पुढे जाण्याची अनुमती केव्हा?
हवामानात सुधार आणि यात्रामार्गाची स्थिती पूर्णपणे सुरक्षित आढळून आल्यावरच भाविकांना तसेच वाहनांना पुढे जाण्याची अनुमती दिली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाची पथकं सातत्याने स्थितीवर नजर ठेवून आहेत.
भाविक अन् वाहनचालकांना आवाहन
प्रशासनाकडून जारी दिशानिर्देशांचे पालन करावे, अनावश्यक यात्रा टाळावी तसेच कुठल्याही प्रकारच्या अफवांवर लक्ष न देण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी भाविक तसेच वाहनचालकांना केले आहे. भाविकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्यात येत आहेत. सातत्याने हवामान खराब होत असतानाही प्रशासन पूर्ण सतर्कतेने यात्रा व्यवस्थापनात मग्न असल्याचा विश्वास अधिकाऱ्यांकडून देण्यात आला.
19 एप्रिलला यात्रेला प्रारंभ
चारधाम यात्रेची सुरुवात 19 एप्रिल रोजी गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरांच्या दर्शनासह झाली होती. केदारनाथ मंदिरातील दर्शन 22 एप्रिल रोजी सुरू झाले होते. यात्रा सुरू झाल्यापासून केदारनाथ तसेच अन्य तीन धाम बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीमध्येही भाविकांची मोठी गर्दी होत आहे.