Hill Station | महाराष्ट्र होरपळतोय, पण 'या' पर्यटनस्थळावर अवतरलाय थेट काश्मीर! पर्यटकांसाठी सर्वात मोठी गूड न्यूज
उन्हाच्या झळांमध्ये महाबळेश्वरचा काश्मिरी थंडावा
पाचगणी ( इम्तियाज मुजावर ) -राज्यातील अनेक भाग उष्णतेच्या झळांनी होरपळत असताना, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर मात्र सध्या थेट काश्मीरची अनुभूती देत आहे. दाट धुक्याची चादर, थंडगार वारे आणि निसर्गाचे मनमोहक रूप यामुळे पर्यटक अक्षरशः भारावून गेले आहेत.
महाबळेश्वरमधील डोंगर-दऱ्या, वेण्णा लेक आणि मुख्य बाजारपेठ दाट धुक्यात हरवून गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सकाळ आणि सायंकाळच्या वेळी धुक्याची दुलई संपूर्ण शहराला वेढून टाकत असून, ऐन उन्हाळ्यातही थंडीची अनुभूती पर्यटकांना मिळत आहे.
राज्यात तापमानाचा पारा चढत असताना महाबळेश्वरमध्ये मात्र वातावरणाने अचानक कात टाकली आहे. निसर्गाच्या या अनोख्या आविष्काराचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे दाखल होत आहेत. वेण्णा लेक परिसरात नौकाविहाराचा आनंद घेताना आणि धुक्यात हरवलेल्या निसर्गसौंदर्याचे छायाचित्र टिपताना पर्यटक दिसून येत आहेत.
'मिनी काश्मीर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरने पुन्हा एकदा आपल्या मोहक रूपाने पर्यटकांना भुरळ घातली असून, धुक्याच्या या नयनरम्य वातावरणाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.