For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘कळंब्या’वर पाणीबाणीचे संकट; कळंबा तलावातील पाणी पातळीत घटली

02:09 PM Mar 09, 2024 IST | Abhijeet Khandekar
‘कळंब्या’वर पाणीबाणीचे संकट  कळंबा तलावातील पाणी पातळीत घटली
Kalamba village
Advertisement

ग्रामपंचायत करणार उपसा बंद : 15 दिवस पुरेल ऐवढेच पाणी शिल्लक; ग्रामस्थांची पाण्यासाठी होणार वणवण

सागर पाटील कळंबा

कळंबा तलाव्याच्या पाणीपातळीत गतवर्षीच्या तुलनेत मोठी घट झाल्याने ग्रामपंचायतीकडून तलावातील पाणी उपसा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे कळंबा गावाची वाटचाल मार्चच्या पहिल्याच आठवड्यात पाणीबाणीच्या दिशेने सुरु आहे. पाण्यासाठी ग्रामपंचायतीने महापालिकेला पत्र दिले आहे. मात्र महापालिकेने या पत्राला अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे पुढील चार महिने कळंबा ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण होणार आहे. दरम्यान, गावाला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीने योग्य नियोजन करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Advertisement

कळंबा गावाच्या उशाला असणारा कळंबा तलाव गावच्या पाण्याचा मुख्यस्त्रोत आहे. वर्षभर तलावामधून कोल्हापूर शहरातील काही परिरस आणि कळंबा गावाला येथून पाणीपुरवठा केला जातो. कळंबा गावासह कोल्हापूर महापालिकेकडूनही प्रतिदिन सात एमएलडी पाणीउपसा केला जातो. महापालिकेकडुन मोठ्याप्रमाणात पाणी उपसा होत असल्यामुळे कळंबा गावाला उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. मार्च महिन्यातील पाणीपरिस्थिती पाहता गतवर्षीच्या तुलनेत यंदा तलावाच्या पाणीपातळीत तीन फुट अधिक घट झाल्याची दिसून येत आहे. सध्या पाणीपातळी 11 फुटांवर आहे. सात फुटांवर पाणी पातळी आल्यानंतर पाणीउपसा बंद केला जातो. पुढील पंधरा दिवस पुरेल इतकेच पाणी तलावामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार महिने ग्रामस्थांना पाणी टंचाईशी सामना करावा लागणार आहे.

वर्षभर दिवसाआड पाणीपुरवठा
कळंबा गावाला वर्षभर दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो, तो ही केवळ वीस मिनिटच होतो. गावाला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी काटकसरीने पाणी वापरले जाते. तर महापालिकेकडून दररोज सात एमएलडी पाणी उपसा केला जातो. महापालिकेकडुन मोठयाप्रमाणात उपसा होत असल्याने तलाव उशाला असूनही उन्हाळ्यात ग्रामस्थांच्या घशाला कोरड पडत असल्याची वस्तुस्थिती आहे.

Advertisement

दरवर्षी वणवण, कायमस्वरूपी उपाययोजना कधी
उन्हाळ्यात दरवर्षी पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरु आहे. मात्र याबाबत ठोस अशी कायमस्वरूपी उपाययोजना होताना दिसत नाही. वर्षभर दिवसाआड होणारा पाणीपुरवठा उन्हाळ्यात चार ते पाच दिवसांनी होतो. त्यामुळे विशेषत महिलांची पाण्यासाठी धावपळ करावी लागते. दरवर्षी सुरु असणारी ही वणवण कधी थांबणार असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

जल मिशन योजनाही रखडली, थेटपाईपलाईनेही पाणीपुरवठा होईना
राज्यशासनाकडून गांधीनगर नळ पाणी योजना आणि जल मिशन योजनेतून कळंबा गावासाठी पाणी योजना मंजूर आहे. चार महिने झाले साहित्या आणून पडून आहे. परंतू पाईपलाईन टाकण्याचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. लालफिताच्या कारभारात या योजना रखडल्या आहेत.कोल्हापूर महापालेकच्या थेटपाईपलाईन योजना कार्यन्वीत झाली आहे. परंतू कळंब्याच्या परिसरात अद्यापही या योजनेतूनही पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.

तालावातील पाणी उपसा बंद करणार
तलावाची पाणीपातळी खालावल्याने दोन दिवसोंत तलावामधून पाणी उपसा बंद करणार आहे. गाव विहिरीतून गावाला पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. तसेच महापालिकेकडुनही पर्यायी व्यवस्थेतून पाणी मिळण्यासाठी पत्रव्यवहार सुरु आहे.
-सुमन गुरव, सरपंच कळंबा.

कळंबा तलावाची स्थिती
पाण्याची पातळी क्षमता -27 फुट
सध्याच्या पाण्याची पातळी -11 फुटांवर
कळंबा गावातील पाणीपुरवठा बंद होणार -7 फुटांवर

Advertisement
Tags :

.