For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उडी मारणारे घर

06:02 AM Oct 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
उडी मारणारे घर
Advertisement

भूकंप ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. ती रोखणे अशक्य असते. मात्र, भूकंपापासून वाचयचे कसे, यावर जगभरात मोठे संशोधन होत आहे. जपान हा देश पृध्वीवरच्या सर्वाधिक भूकंपप्रवण क्षेत्रात आहे. त्यामुळे या देशात सातत्याने मोठे भूकंप होत असतात. साहजिकच या देशात भूकंपातून वाचण्यासाठीचे सर्वाधिक संशोधन होत असते. एका जपानी कंपनीने एक असे घर निर्माण केले आहे, की जे भूकंपाचे धक्के बसू लागताच, हवेत उडी मारते. अशा प्रकारे ते भूकंपापासून आपला बचाव करु शकते. या कंपनीचे नाव ‘एअर डानशिन सिस्टिम्स्’ हे आहे. गेली अनेक वर्षे संशोधन करुन कंपनीने हे तंत्रज्ञान विकसीत केले आहे. भूकंपाला प्रारंभ झाला, की हे घर 3 सेंटीमीटरपर्यंत हवेत उडी घेते.

Advertisement

उडी घेतल्याने भूकंपाच्या धक्क्यापासून घराचे संरक्षण होते. तसेच घराला आडवे धक्के न बसल्याने ते सुरक्षित राहते. घरातील सामान आणि माणसेही जागच्या जागी राहू शकतात. घर उडी कशी मारते, याची माहितीही कंपनीने दिली आहे. घराच्या खाली एक काँप्रेसर बसविलेला असतो. भूकंपाला प्रारंभ होताच क्षणार्धात तो काँप्रेसर काम करु लागतो. त्यामुळे खालून हवेचा दाब निर्माण होतो आणि घर काही सेंटीमीटर वर उचलले जाते. त्यानंतर ते पुन्हा हळू खाली येते आणि परत हवेच्या दाबामुळे वर उचलले जाते. भूकंपाचे धक्के थांबेपर्यंत ही प्रक्रिया होत राहते. अशा प्रकारे घराची मुळीच हानी न होता, ते सुरक्षित राहते. घराला तडा सुद्धा जात नाही, असे कंपनीचे म्हणणे आहे. शोईची साकामोटो हे या घराचे संशोधक आहेत. भूकंपाला प्रारंभ झाल्यानंतर कित्येकदा वीज पुरवठा खंडित होतो. तथापि, वीज पुरवठा बंद पडल्यानंतरही घराच्या खालचा काँप्रेसर काम करत राहतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत घराचे संरक्षण होत राहते. सध्या जपानमधील 90 घरांमध्ये ही व्यवस्था काम करत असून आतापर्यंतचा अनुभव अतिशय उत्साहवर्धक असल्याचे दिसून येत आहे. घर वर उचलले गेले, तरी घरातील सामान आहे त्याच स्थानी राहते, हे दिसून आले आहे. त्यामुळे ही यंत्रणा अत्यंत सुदृढ आहे, हे सिद्ध होत आहे. आगामी काळात ही यंत्रणा आणखी कित्येक घरांमध्ये स्थापन करण्याची कंपनीची योजना आहे, असे स्पष्ट केले गेले.

Advertisement
Advertisement
Tags :

.