For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kalammavadi Dam | सुट्टीचा आनंद ठरला काळ! काळमावाडी धरणाच्या परिसरात १६ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

02:27 PM Apr 30, 2026 IST | NEETA POTDAR
kalammavadi dam   सुट्टीचा आनंद ठरला काळ  काळमावाडी धरणाच्या परिसरात १६ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
Advertisement

                       काळमावाडी धरण परिसरात १६ वर्षीय तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Advertisement

राधानगरी (महेश तिरवडे ) - राधानगरी तालुक्यातील काळमावाडी धरण परिसरात फिरण्यासाठी व पोहण्यासाठी आलेल्या एका १६ वर्षीय तरुणाचा दूधगंगा नदीतील काळोख्या डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. स्वराज्य संदीप शिंदे (वय १६), रा. ओवळी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

राधानगरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वराज्य शिंदे याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. उन्हाळी सुट्टीसाठी तो कोल्हापूर येथील कळंबा परिसरात राहणाऱ्या ओंकार पाटील या मामाकडे रहायला आला होता. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी स्वराज्य, त्याचा मामा, व मामाचे मित्र काळमावाडी धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते.दरम्यान, दूधगंगा नदीत पोहण्यासाठी सर्वजण उतरले असता स्वराज्य पाण्यातून बाहेर आला नाही. त्यानंतर स्थानिक नागरिक आणि सोबतच्या मित्रांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र रात्री उशिरापर्यंत तो सापडला नाही. बुधवारी रात्री उशिरा ओंकार पाटील यांनी राधानगरी पोलिस ठाण्यात स्वराज्य बेपत्ता असल्याची नोंद केली.घटनास्थळी पोलीस दाखल झाले मात्र रात्री अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. गुरुवारी सकाळी स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकाच्या मदतीने पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर गुरुवारी सकाळी 10 वाजता दूधगंगा नदीच्या डोहातून स्वराज्यचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

Advertisement

स्वराज्य हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. त्याचे वडील दुबई येथे एका खासगी कंपनीत कार्यरत आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील आणि एक लहान बहीण असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे ओवळी गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

राधानगरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अशोक शेळके आणि किरण पाटील अधिक तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.