Radhanagari | राधानगरीत सहलीचा आनंद विरला; दूधगंगा नदीच्या 'काळोखा' डोहात बुडून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
राधानगरीत तरुणाचा दूधगंगा नदीत बुडून मृत्यू
राधानगरीः राधानगरीतालुक्यातील काळमाबाडी धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा दूधगंगा नदीतील 'काळोखा' डोहात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अभिषेक बाबासो कांबळे (वय २१, रा. बत्तीस शिराळा, जि. सांगली) असे - मृत तरुणाचे नाव आहे.
राधानगरी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक कांबळे हा तळसंदे येथील डी. वाय. न पाटील कॉलेजमध्ये अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता.
सुट्टीच्या निमित्ताने तो आपल्या चार ते पाच मित्रांसोबत काळमावाडी धरण परिसरात फिरण्यासाठी आला होता. बुधवारी दुपारी सुमारे दीडच्या सुमारास सर्व मित्र दूधगंगा नदीच्या पाण्यात उतरले असताना अभिषेक हा खोल पाण्यात जाऊन बेपत्ता झाला.
घटनेनंतर त्याच्या मित्रांनी तत्काळ नातेवाईकांना माहिती दिली. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास राधानगरी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर पोलिसांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली; मात्र अंधार पडल्यामुळे रात्री उशिरा मदतकार्यथांबवण्यात आले.
गुरुवारी सकाळी फेजीबडे येथील कुशल पोहणाऱ्यांच्या मदतीने शोधमोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. दुपारी एक ते दीडच्या दरम्यान राधानगरी पोलीस व स्थानिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून मृतदेह बाहेर काढण्यात आला.
अभिषेक हा बाबासो कांबळे यांचा एकुलता एक मुलगा असून त्याच्या पश्चात आई-वडील आणि बहीण असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.