ईश्वरीतत्व जाणून घेण्याचा प्रवास अनेक जन्माचा असतो
अध्याय सहावा
अन्ये नानाविधान्देवान्भजन्ते तान्व्रजन्ति ते । यथा यथा मतिं कृत्वा भजते मां जनोऽ खिलऽ ।। 13।। तथा तथास्य तं भावं पूरयाम्यहमेव तम् । अहं सर्वं विजानामि मां न कश्चिद्विबुध्यते ।। 14 ।। हे दोन श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार बाप्पा म्हणतात, काही लोक नानाप्रकारच्या देवांची भक्ति करतात व त्या त्या देवाप्रत ते जातात. जशी बुद्धि होईल त्याप्रमाणे लोक माझी भक्ति करतात. त्यांचा तो तो भाव अथवा इच्छा मी पूर्ण करतो. मी सर्वांना जाणतो पण मला कोणीही जाणत नाहीत.
निरनिराळ्या देवांची भक्ती करून त्याबदल्यात त्याच्याकडून काहीतरी प्राप्त करून घेणं इथपर्यंतची सकाम भक्तीची वाटचाल करणारे खुपजण असतात. म्हणजे बहुतांश भक्त असेच असतात. अगदी नव्याणऊ टक्के म्हंटलं तरी चालेल. त्यामुळे इथपर्यंतच्या भक्तीमार्गावर खूप लोक चालत असल्याने त्याचा चालून चालून हमरस्ता झालेला असतो. तीर्थक्षेत्रात बारा महिने उडणारी गर्दीची झुंबड बघितली की, हे लगेच लक्षात येईल पण इथून पुढील म्हणजे निरपेक्ष होत होत संपूर्ण निरपेक्ष होऊन भक्ती करून अच्युत पद मिळवण्यासाठी चालावयाची वाट ही पायवाटच असते. कारण अगदी कमी भक्त या वाटेने नेटाने पुढे जात असतात या भक्तांना ईश्वराकडून कोणतीच अपेक्षा नसते. या गोष्टीचं ईश्वराला खूप अप्रूप वाटत असतं. त्यांच्या भक्तीतून ईश्वरविषयी प्रेम ओसंडत असतं. त्या प्रेमाच्या ओझ्याखाली दबून ईश्वर त्यांचा ऋणी होतो आणि सदैव त्यांच्याबरोबर राहून त्यांची वाटचाल सुखमय करतो. ईश्वराची निरपेक्षतेने भक्ती करणाऱ्या भक्ताच्या मनात सतत ईश्वराबद्दलचे विचार घोळू लागतात. सहवासाने प्रेम वाढते असे म्हणतात, त्याप्रमाणे त्याचे ईश्वरावरील प्रेम वाढू लागते. त्याला ईश्वराचा ध्यास लागतो. माणसाला ज्याचा ध्यास लागतो त्याचा त्याला सर्वत्र भास होऊ लागतो. त्याप्रमाणे त्याला सर्वत्र ईश्वरी अस्तित्वाची जाणीव होऊ लागते. त्याच्या जीवनशैलीत हळूहळू परिवर्तन होऊ लागते. तो भानावर येत जातो. आपण या प्रकृतीचा किंवा मायेचा भाग नसून काहीकाळ बंधनात अडकलेलो आहोत हा उलगडा होऊन आपण कोण आहोत याचा साक्षात्कार झाला की, त्याच्यादृष्टीने समोर दिसणारे जगत मिथ्या ठरते. मिथ्या म्हणजे ते समोर दिसत असले तरी त्याचा उद्धार होण्याच्या दृष्टीने ते निरुपयोगी असते. त्यामुळे त्याचे त्यातील स्वारस्य संपलेले असते. त्याच्यावर असलेला षड्रिपूंचा अंमल निष्प्रभ होत जातो. जसजशी त्याची साधना पूर्ण होत जाते तसतसा त्याचा आत्मा ब्रह्मस्वरूपामध्ये लीन होऊन जातो. साधनेने स्वप्रयत्नांनी आपल्यातील चैतन्यस्वरूप प्रकट करावे आणि मुक्त व्हावे यातच मानवी जीवनाची इतिकर्तव्यता आहे. हा प्रवास अनेक जन्मात मिळून पूर्ण होत असतो पण एकदा निरपेक्षतेनं ईश्वरी भक्ती करायच्या टप्प्यावर मनुष्य पोहोचला की, मग तो मागे वळून न पाहता अत्यंत आनंदाने पुढे पुढे जात राहतो कारण त्याचा प्रवास कधीही कंटाळवाणा होत नाही. ईश्वराची भक्ती करण्यात माणसाची परिस्थिती कधीही आड येत नाही हे विविध संतांची हलाखीची आर्थिक व सामाजिक परिस्थिती बघितली की लगेच लक्षात येते. ईश्वराकडून काहीतरी मिळवण्यापासून सुरू झालेली ईश्वर भक्तीची वाटचाल मला इतर काहीही नको फक्त तूच हवास इथपर्यंतच्या टप्प्यावर कसकशी होत राहते ते आपण सविस्तर बघितलं. मुक्कामापर्यंत पोहोचणारे भक्त फार कमी, म्हणजे किती कमी ते भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलं आहे. ते म्हणतात, माझं तत्व जाणून घ्यावं असं वाटणारा लाखात एखादा असतो आणि असं वाटणाऱ्या लाख भक्तांमध्ये एखाद्यालाच माझं तत्व सापडतं.
क्रमश: