रनपार समुद्रात अडकलेल्या 'त्या' 'बार्ज' चा प्रवास लांबणार
रत्नागिरी :
पूर्णगड सागरी हद्दीतील फिनोलेक्स जेटीसमोरील अरबी समुद्रात ४ जून रोजी गोव्यातील वास्को द गामाहून मुंबईकडे जाणारे भले मोठे बार्ज तांत्रिक बिघाडामुळे येथे नांगरून ठेवण्यात आलेय. पण आठवडाभरानंतरही ते बार्ज जाग्यावरच आहे. त्याच्या दुरूस्तीनंतरही पुढील प्रवास आवश्यक असलेल्या परवानगीनंतरच सुरू होणार असल्याचे येथील प्रादेशिक बंदर विभागामार्फत सांगण्यात आले.
वास्को द गामा येथून ३ जून २०२५ रोजी ऑईल घेवून मुंबईकडे जाण्यासाठी निघालेले ते बार्ज ४ जून रोजी सकाळी ११ च्या दरम्यान रत्नागिरी येथील फिनोलेक्स जेटीजवळील अरबी समुद्रात आले होते. त्या बोटीत बॅटरी व पाण्याचा पंप यात बिघाड झाला. त्यामुळे सुरक्षिततेच्यादृष्टीने ती टग रनपार किनाऱ्यालगत आणून अँकर टाकून उभी करण्यात आल्याचे समोर आले. पण त्याची खातरजमा होईपर्यंत येथील सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली होती. कोस्टगार्डच्या अधिकाऱ्यांनी त्या संशयित बार्जवरील लोकांशी संपर्क साधला असता त्या बार्जचे नाव AVNKO 5 (Tug), AVNKO7 (Boat), AVNKO 2 (Dredging barge) अशी नावे आहेत. त्यावरील खलाशांनी कंपनीशी संपर्क साधून बोटावरील बिघाडासंदर्भात कळविण्यात आले. त्या बार्जची दुरूस्तीही तंत्रज्ञांच्या मदतीने झाल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर बार्जचा पुढील प्रवास रखडला. फिनोलेक्स जेटीसमोरील समुद्रात नांगरून ठेवलेले ते बार्ज आठवड्यानंतरही अजून त्य त्याच जागेवर उभे आहे. कारण पुढील प्रवासासाठी आवश्यक असलेल्या बंदर विभागाकडील परवानगीबाबत संबंधित जहाजाच्या कंपनीने पाऊल उचलणे गरजेचे आहे. ती परवानगी घेतल्यानंतरच या बार्जचा पुढील प्रवासाचा मार्ग मोकळा होणार असल्याचे बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ती परवानगी आणल्यानंतरही ओढून नेण्यासाठी आवश्यक टगची उपलब्धता होणे गरजेचे आहे. पण खवळलेल्या समुद्रात टग येण्यासमोरही प्रश्न उभा राहणार आहे .
- 'बसरा स्टार'ची विल्हेवाट पावसाळ्यानंतरच होणार
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिऱ्या किनाऱ्यावर अडकून पडलेल्या बसरा स्टार जहाजाचे समुद्राच्या लाटांच्या तडाख्यात अलिकडेच दोन तुकडे झाले. ५ वर्षे एकाच जाग्यावर अडकून पडलेल्या या जहाजाचे दोन तुकडे झाल्यामुळे सेल्फी पॉईंट, रिल्स् पॉईंटसाठी पर्यटकांच्या आनंदावरही विरजण पडले आहे. ३५ कोटींचे हे महाकाय जहाज समुद्राच्या खाऱ्या पाण्याने व लाटांच्या माऱ्याने सडले होते. अवघ्या २ कोटींमध्ये ते भंगारात काढले जाणार आहे. शिपिंग कॉपरिशन कंपनी कस्टम व मेरिटाईम बोर्डाच्या कन्सल्टंट म्हणून काम करत आहे. मात्र तुकडे झालेले हे जहाज या किनाऱ्यावरून बाजूला करण्यासाठी केल्या जात असलेल्या हालचालींसमोर सध्याच्या पावसाळी वातावरणामुळे खवळलेल्या समुद्राचा अडसर उभा राहिला आहे. या जहाजाचे तुकडे बाजूला ओढून नेण्यासाठी मोठ्या टगची गरज आहे. हे टग सप्टेंबरनंतरच खवळलेल्या समुद्राची स्थिती शांत होताच येणे शक्य होणार आहे. त्यानंतरच या जहाजाचे तुकडे बाजूला केले जाणार आहेत. तोपर्यंत त्या तुकड्यांना दोरखंडाने बांधून ठेवण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.