Solapur News : सोलापूरकरांचा प्रवास होणार आता वेगवान !
सोलापूर-पुणे आणि सोलापूर-हैदराबाद प्रवास आता २–५ तासांत शक्य
सोलापूर : सोलापूर शहराच्या विकासाला गती देणारी महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी रविवारी (दि.१) फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात केली आहे. मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद (सोलापूरमार्गे) हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे. यामुळे सोलापूरहून पुण्याला अवघ्या दोन ते अडीच तासांत, तर हैदराबादला पाच ते साडेपाच तासांत पोहोचणे शक्य होणार आहे.
सध्या सोलापूर-पुणे प्रवासासाठी रेल्वेने सुमारे चार तास, तर सोलापूर-हैदराबाद प्रवासासाठी आठ ते दहा तासांचा कालावधी लागतो. हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळेप्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. सोलापूरचे राज्य व देशातील प्रमुख शहरांशी असलेले दळणवळण अधिक बळकट होणार आहे.
हा प्रकल्प भारतीय हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून राबविण्यात येणार असून, यासाठी स्वतंत्र लोहमार्ग उभारण्यात येणार आहे. पुणे, सोलापूर आणि बाडी ही प्रमुख शहरे या मार्गावर असणार आहेत. केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यामुळे मार्ग पाहणी, तांत्रिक अभ्यास आणि डीपीआर तयार करण्याच्या प्रक्रियेला लवकरच गती मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः उद्योग, आयटी, शिक्षण, आरोग्य व व्यापार क्षेत्रासाठी सोलापूर अधिक जवळ येणार असून, शहराच्या आि थक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.