सलग चौथ्या सत्रात तेजीचा प्रवास कायम!
जागतिक पातळीवर मिळताजुळता कल :सेन्सेक्स 33 अंकांनी वधारला
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील शेवटच्या सत्रात शुक्रवारी सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक हलक्या तेजीसोबत बंद झाले आहेत. मुख्य कंपन्यांच्या मदतीने शुक्रवारी 30 समभागांमधील कामगिरीमधून सेन्सेक्स दिवसअखेर 33.2 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 81,086.21 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 11.65 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 24,823.15 वर बंद झाला आहे.
शुक्रवारच्या सत्रात वाहन क्षेत्रातील कामगिरीच्या मदतीने शेअर बाजारात तेजीची झुळूक राहिली. याचदरम्यान अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या बैठकीत व्याजदर कपात करण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे या घटनेचाही परिणाम सकारात्मक भारतीय बाजारात दिसून आला आहे. यात 0.5 टक्क्यांची व्याजदर कपात होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे जागतिक बाजारात गुंतवणूकदारही प्रतीक्षा करणार असल्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये निफ्टीत वाहन क्षेत्रांचे समभाग 1.12 टक्क्यांनी वधारले आहेत. यामध्ये बजाज ऑटोचे समभाग 4.74 टक्क्यांनी वधारले तसेच कोल इंडिया, भारती एअरटेल, टाटा मोटर्स आणि सनफार्मा यांचेही समभाग घसरणीत होते. अन्य कंपन्यांमध्ये एलटीआय माइंडट्रीचे समभाग प्रभावीत झाले. यासह विप्रो, ओएनजीसी, एशियन पेन्ट्स आणि टायटन यांचे समभाग नुकसानीत राहिले.
जागतिक स्थितीमध्ये अमेरिकन बाजारात घसरण दिसून आली. तसेच शेअर बाजारातील उपलब्ध आकडेवारीनुसार विदेशी गुंतवणूकदारांनी गुरुवारी 1,371.79 कोटी रुपयांच्या इक्विटीची खरेदी केली आहे. देशातील संस्थांत्मक गुंतवणूकदारांनी 2,971.80 कोटी रुपयांच्या इक्विटीची खरेदी केली आहे. जागतिक बाजारात कच्चे तेल अर्थात ब्रेंट क्रूड 1.01 टक्क्यांनी वधारुन 78 अमेरिकन डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले आहे.
आगामी आठवड्यानंतर सणासुदीचे दिवस सुरु होणार आहेत. गुंतवणूकदारांची भूमिका, जागतिक पातळीवरील स्थिती व देशातील राजकीय स्थिती यावर बाजाराची पुढील दिशा निश्चित होणार आहे.