यंत्रश्वानाला फिरविण्याची नोकरी
सध्याच्या यंत्र आणि इलेक्ट्रॉनिक्स युगात नोकऱ्यांचे स्वरुप बरेच पालटले आहे. आता तर कृत्रिम बुद्धीमत्ता किंवा एआयमुळे तर नोकरी क्षेत्रात बरीच उलथापालथ होत आहे. तथापि, काही स्वरुपांच्या सेवा आणि नोकऱ्या मात्र टिकूनच राहतील अशी शक्यता आहे. घरात पाळलेल्या श्वानाला फिरवून आणणे ही अशाच प्रकारची नोकरी म्हणा किंवा सेवा म्हणा, आहे. भारतात पाळीव श्वानांना फिरवून आणण्याचे काम प्रामुख्याने घरातील माणसेच करतात. तथापि, अमेरिकेसारख्या देशांमध्ये यासाठी स्वतंत्र नोकर नेमले जातात. या नोकरांना भरपूर वेतनही मिळते. आता श्वानांना फिरवून आणण्यासाठी अधिक नोकरांची आवश्यकता लागणार आहे. कारण, केवळ नैसर्गिक श्वानांनाच नव्हे, तर यंत्रश्वानांना फिरवून आणण्याचे कामही त्यांना करावे लागणार आहे. खऱ्या श्वानांसारखे आता यांत्रिक श्वान किंवा रोबो डॉग्ज लोकप्रिय होत आहेत. पण या श्वानांनाही फिरवून आणावे लागते. हे यांत्रिक श्वानही हालचाल न करता एका जागी बसून राहिले, तर त्यांचे कार्य मंदावते. यांत्रिक श्वान खऱ्या श्वानांपेक्षा बुद्धीमान असले, तरी ते स्वत:चे स्वत: बाहेर फिरुन येऊ शकत नाहीत. ते मार्ग चुकण्याची किंवा त्यांची चोरी होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांना फिरविण्यासाठी एका माणसाची नियुक्ती केली जाते. या माणसाला एका तासाला 1,700 डॉलर्स इतके भरभक्कम मानधन मिळते. इतके मानधन या यांत्रिक श्वानांचे उत्पादन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मिळत नाही, असे बोलले जाते. यांत्रिक श्वान पाळण्याचे प्रमाण जसजसे वाढत जाईल, तशी त्यांना फिरविण्यासाठी अधिकाधिक माणसांचीही आवश्यकता भासणार आहे. अशा प्रकारे एक नवी ‘एम्प्लॉयमेंट’ निर्माण होण्याची शक्यता आहे. नवे तंत्रज्ञान नव्या रोजगारांना जन्म देते असा अनुमव आहे. असाच प्रकार याही संदर्भात घडण्याची शक्यता आहे. येत्या काही वर्षांमध्ये या संदर्भातले चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.
