जैन संस्कृती एक हजार वर्षांपूर्वीच्या कोल्हापूरची
कोल्हापूर / सुधाकर काशीद :
कोल्हापूर जिल्ह्यात शहरासह अनेक ठिकाणी जैन बस्ती आपणास आढळतात. पण गंगावेशीतून महाद्वार रोड किंवा कसबा गेट कडे जाणाऱ्या रस्त्यावर एक वेगळी बस्ती आहे. पार्श्वनाथ दिगंबर मानस्तंभ जैन मंदिर असे या बस्तीचे नाव आहे आणि ही बस्ती 100 नव्हे 200 नव्हे 1000 वर्षांपूर्वीची आहे. बांधकाम अंतर्भाग आज ही जशाच्या तसा आहे. कोल्हापूरची जैन संस्कृती किती प्राचीन आहे याचे अस्तित्वच या बस्तीच्या रुपाने टिकून आहे. आपलं कोल्हापूर किती प्राचीन आहे याचा पुरावा कोणी मागितला तर या बस्तीत शिल्प सौंदर्य आणि शिलालेखाच्या स्वरुपात हा पुरावा आजही जिवंत आणि टवटवीत आहे.
कोल्हापूर जेव्हा गंगावेस शनिवार वेश, आदितवार वेश (बिंदू चौक), मंगळवार वेश, वरूणतीर्थ वेश, रंकाळा वेश ते पुन्हा गंगावेश एवढ्याच हद्दीत एका तटबंदीच्या आत जगत होते तेव्हाची ही गंगावेशीतील जैन बस्ती आहे. या जैन बस्तीच्या पुढे उतारावर गंगावेश म्हणजे कोल्हापुरात प्रवेश करायचे एक प्रवेशद्वार होते आणि चन्नी चेटीचा बुरुज या नावाने एक बुरुज होता. या वेशीतून आले की समोरच ही दगडी बांधकामातील बस्ती नजरेस यायची. ही बस्ती बांधली जैन मुनी माघनंदी यांच्यावर श्रद्धा असलेल्या गंडरादित्य राजाने. या गंडरादित्यने सरदार निंबदेव यांच्याकडून ही बस्ती बांधून घेतली. तो काळ होता अकराशे पस्तीस ते अकराशे ते अकराशे पस्तिसचा. दगडी शिळा खांब याची अडक पद्धतीने बांधणी करून ही बस्ती उभी राहिली. एकात एक दगड अडकवून केलेल्या बांधणीची ही रचना आज ही जशीच्या तशी आहे.
पावसाच्या पाण्याचा एक थेंब या बस्तीत गळत नाही. त्यात पार्श्वनाथाची उभी मूर्ती आहे. या मूर्तीवर पन्नास वर्षांपूर्वी व जतन केला गेला होता. पण काही वर्षांपूर्वी एका मूर्ती अभ्यासकाने हा वज्रलेप काढण्याची सूचना केली. त्यानुसार हा वज्रलेप काढण्यात केला आणि मूळ मूर्ती पुन्हा मूळ स्वरूपात दिसू लागली. मूळ स्वरूपातील ही मूर्ती म्हणजे शिल्पकलेचा एक अमुल्य नमुना आहे ही बस्ती म्हणजे कोल्हापूरच्या तात्कालीक सामाजिक जीवनाचे एक प्रतीक आहे. कारण मंदिराच्या या परिसरात आजही जैन वस्ती आहे. मंदिरापासून काही अंतरावर तात्कालीन प्रशासन व्यवस्थेतील जैन पोलीस पाटलांचा वाडा आजही आहे. अर्थात आता त्याची रचना त्या वाड्याची रचना कालानुरूप बदलत गेले आहे. जवळच कसबा गेट आणि त्याच्या शेजारी नरसिंह मंदिर या चावडीची इमारत म्हणून ओळखल्या जाण्राया वास्तू आहेत.
या साऱ्या परिसरातलाच एक खूप प्राचीनत्व आहे. मात्र आज हा परिसर नवनवीन बद्दल स्वीकारत अक्षरश झळाळून गेला आहे. जे काही प्राचीनत्व उरले आहे ते या जैन बस्तीच्या स्वरूपात आणि मंदिराच्या आवारातील दोन अस्सल शिलालेखात आहे .यातील एका शिलालेखात मंदिराच्या देखभालीसाठी कोणाकडून किती कर घ्यावा याचा सविस्तर उल्लेख आहे. बस्तीच्या आवारातच पुजाऱ्यांची निवासस्थाने आहेत.
या मंदिरा शेजारी राशिनकर यांचा 50 खोल्याचा जुना वाडा होता. याच मंदिराच्या सभोवती गंगावेश, कसबा गेट, रंकाळ वेश, बाबू जमाल दर्गा, गायकवाड वाडा, जीवबा नाना जाधवांचा वाडा, भाऊ नाईक तालीम, डिग्रजकर वाडा, पडळकर वाडा, बापट वाडा, पिशवीकर वाडा, मानेवाडा, जाधव वाडा, जिरगे वाडा या जुन्या वस्तू होत्या त्यातील काही वास्तू पाडून नवीन बांधकामे झाली आहेत पण ही बस्ती जशीच्या तशी जपण्याचा विश्वस्त मंडळाचा प्रयत्न आहे. अर्थात ही बस्ती जैन धर्मियांची असली तरी कोल्हापूरचे पुरातन अस्तित्व कसे होते हे पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी आस्थेने या बस्तीलाही भेट दिली तर नव्या पिढीला आपले कोल्हापूर हजार वर्षांपूर्वी कसे होते याचा अंदाज घेता येणार आहे आणि कोल्हापूरचे प्राचीनत्व हेच कोल्हापूरचे भूषण असल्याचा संदेश नव्या पिढीला मिळणार आहे.
- कोल्हापूरच्या सामाजिक,धर्मिक, संस्कृतीचा अभिमान
या जैन बस्तीची स्वच्छता व देखभाल अतिशय श्रद्धेने जपली गेली आहे. आपण कोल्हापूरच्या सामाजिक धार्मिक संस्कृतीचा हजार वर्षापासूनचा घटक आहे याचा कोल्हापूरच्या जैन बांधवांना अभिमान आहे. आता बस्तीच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सनतकुमार अथने अध्यक्ष राजू मिंच व सदस्य अनिल पाटील यांनी ही बस्ती आणि कोल्हापूरचे नाते याचा खूप आदरपूर्वक व्यक्त केला. कोल्हापूरचे प्राचीन अस्तित्व जपण्याचा कोल्हापुरातील जैन समाज कायम प्रयत्न करीत राहील अशी भावना बोलताना व्यक्त केली.
या बस्तीत तीनशे वर्षांपूर्वी 300 फूट उंच मानस्तंभ उभा करण्यात आला आहे कोल्हापुरातला हा पहिला दगडी मानस्तंभ.