कोर्ट आवारातील दुकानांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
अनधिकृतपणे उभारलेल्या गाळ्यांकडे ता. पं.चे अक्षम्य दुर्लक्ष : खानापूर ता.पं.च्या जागेवर व्यापारी संकुल उभारल्यास सोयीचे होणार
खानापूर : येथील कोर्ट आवारातील तालुका पंचायतीच्या मालकीच्या जागेत असलेल्या दुकान गाळ्यातील एका दुकानाला गुरुवारी सायंकाळी आग लागल्याने या दुकान गाळ्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जुन्या कोर्ट आवाराची जागाही तालुका पंचायतीच्या मालकीची असून या ठिकाणी अनधिकृतपणे दुकानगाळे उभारण्यात आले आहेत. याकडे तालुका पंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. या जागेत अनेकांनी कोणतीही परवानगी नसताना दुकानगाळे तयार केलेले आहेत. यापूर्वीही ता.पं.च्या बैठकीत या गाळ्यांबाबत निर्णय घेण्यात यावा, असा ठराव करूनदेखील ता. पं. अधिकाऱ्यांनी गाळ्यांबाबत ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे अतिक्रमण करून जागा हडप करणाऱ्यांचे फावले आहे. याबाबत नगरपंचायतीनेही ता. पं.कडे बोट करून आपली जबाबदारी झटकली आहे. शहरातील अनेक ठिकाणी मोक्याच्या जागेवर अतिक्रमण करून जागा बळकावण्याचे प्रकार होत असताना ता. पं. आणि नगरपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
अधिकृत कागदपत्रांची पूर्तता दुकानगाळ्यांकडून नाहीच
राजा छत्रपती चौकात अगदी मोक्याची ठिकाणी जुन्या कोर्ट आवाराची जागा ही ता. पं.च्या मालकीची आहे. तसेच राजा छत्रपती स्मारकासमोरील गाळेही ता. पं.च्या मालकीची आहेत. रामदेव स्वीटमार्टपासून बालाजी चाट दुकानपर्यंत सर्व गाळेही ता. पं.च्या मालकीची आहेत. मात्र याबाबत कोणत्याही अधिकृत कागदपत्रांची पूर्तता दुकानगाळ्यांकडून केलेली नाही. तसेच कोर्ट आवारात अनधिकृत दुकानगाळे उभारुन भाड्याने देण्यात आलेली आहेत. याबाबत ता. पं.ने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने अतिक्रमण करणाऱ्यांचे फावले आहे.
आतापर्यंत 15 लाखाचा कर थकीत
स्वीट मार्टसह चार दुकानांचे बांधकाम 30 वर्षापूर्वी केलेले आहे. मात्र कोर्ट आवारातील शेड हे सोयीनुसार उभारुन दुकानगाळे थाटली आहेत. कोर्ट आवारातील समोरील गाळ्यांची नगरपंचायतीत नोंद केली आहे. मात्र मागील बाजूच्या जागेत दाटीवाटीने अनधिकृत गाळे उभारले आहेत. सर्वच गाळ्यांना विद्युतपुरवठा केलेला आहे. मात्र कोणत्याही दुकानाचा नगरपंचायतीचा कर ता. पं.ने भरलेला नाही. आतापर्यंत 15 लाखाचा कर थकलेला आहे,असे नगरपंचायतीकडून सांगण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच अतिक्रमणची चर्चा
नगरपंचायतीनेही करवसुलीसाठी अनेकवेळा ता.पं.ला नोटिसाही बजावल्या आहेत. या नोटिसीकडे ता.पं. अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष करून त्यांना केराची टोपली दाखविली आहे. अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच ता.पं.च्या जागेवर अतिक्रमण होत असल्याची चर्चा शहरात होत आहे. नगरपंचायतीकडून करवसुलीसाठी सामान्य जनतेला वेठीला धरले जाते. काही कामासाठी उतारा किंवा इतर काही कागदपत्रे हवी असल्यास पाणीपट्टी आणि घरपट्टी भरल्याशिवाय कागदपत्रे पुरविली जात नाहीत. मात्र लाखोनी कर थकबाकी असताना दुकानदारांना मात्र सर्व सोयी, सवलती पुरविल्या जात आहेत. याबाबत ता.पं. व्यवस्थापकांना विचारले असता दुकानगाळ्यांचे भाडेही थकलेले आहे. याबाबत वरिष्ठ अधिकारीच माहिती देऊ शकतील म्हणून जबाबदारी झटकलेली आहे.
दाटीवाटीत उभारल्यानेच दुकानगाळ्याला आग
गुरुवारी लागलेल्या आगीत राजू पुजारी यांचे संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नामुळे मोठा धोका टळलेला आहे. हे दुकानगाळे एकमेकांना लागून दाटीवाटीत उभारली आहेत. त्यामुळे यापुढेही धोक्याचा संभव आहे. आतातरी ता. पं. अधिकाऱ्यानी याबाबत गांभीर्याने विचार करून या ठिकाणी व्यापारी संकुलाची उभारणी करावी. यामुळे सरकारी जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांना चाप बसेल, अशी चर्चा शहरात होत आहे.