‘नोकरीसाठी पैसे’ प्रकरण सरकारमुळेच उजेडात आले
भाजप प्रवक्ते यतीश नाईक यांचा दावा
प्रतिनिधी/ पणजी
सरकारी नोकरीसाठी पैशांची मागणी करून नंतर त्यांची फसवणूक करणारे असंख्य ठकसेन आज सरकारचा पुढाकार आणि सक्त कारवाईमुळेच तुरुंगाची हवा खात आहेत. त्याशिवाय ज्यांची फसगत झालेली आहे, ज्यांना लाखोंचा गंडा पडलेला आहे त्यांनी तक्रारी करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही स्वत: मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्यावरून सरकार याप्रश्नी किती गंभीर आहे त्याची प्रचिती येत आहे. अशावेळी विरोधक करत असलेले आरोप निराधार व तथ्यहीन आहेत, असे मत भाजप प्रवक्ते अॅड. यतीश नाईक यांनी व्यक्त केले आहे.
शनिवारी भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी सिद्धेश नाईक यांचीही उपस्थिती होती. पुढे बोलताना नाईक यांनी आज विरोधक काहीही आरोप करत असले तरी सरकारच्या पुढाकारामुळेच ‘नोकरीसाठी पैसे’ प्रकरणात पहिला गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर अनेकजण तक्रारी करण्यासाठी पुढे आले व त्यांच्या तक्रारींना अनुसरून अन्य कित्येकांवर गुन्हे नोंदवून अटकही करण्यात आली, असे सांगितले.
यातील प्रत्येक प्रकरणाची पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे व अशा गुह्यांसाठी कुणालाही क्षमा करणार नाही, असे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच स्पष्ट केले आहे. तरीही काही विरोधक राजकारण करत आहेत. त्यांच्याकडून तथ्यहीन आरोप करण्यात येत आहेत. खरे तर विरोधकांनी सरकारच्या आणि पर्यायाने मुख्यमंत्र्यांच्या या तत्परतेचे स्वागत करायला हवे होते. परंतु तसे न करता ते केवळ विरोधाचा घोषा लगावत आहेत, हे पूर्णत: चुकीचे आहे, असे अॅड नाईक म्हणाले.
खरे तर सरकारी नोकऱ्या या कायदेशीर मार्गाने सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच देण्यात येतात. अशावेळी कुणीतरी एखाद दुसरी व्यक्ती याच नोकऱ्यांच्या नावे पैसे घेऊन लोकांची फसगत करत असेल तर त्याला सरकार नव्हे तर अशा बनावट लोकांवर विश्वास ठेऊन लाखो ऊपये त्यांच्या हवाली करणारेच जबाबदार आहेत, असे अॅड. नाईक यांनी सांगितले. या सर्वांचे भांडवल करून विरोधक सरकारवर टीका करतात ही त्यांची मानसिक दिवाळखोरी आहे, अशी टीका नाईक यांनी केली.
या प्रकरणी सरकार प्रामाणिक असून प्रत्येक तक्रारीच्या मुळापर्यंत जाऊन चौकशी होईल व दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास अॅड. नाईक यांनी व्यक्त केला.