लोकसभेत कन्हैयालाल यांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित
‘दावत-ए-इस्लामी’वर बंदी घालण्याची मागणी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भाजपचे खासदार अर्जुन लाल मीणा यांनी राजस्थानच्या उदयपूरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या कन्हैयालाल यांच्या हत्येचा मुद्दा गुरुवारी लोकसभेत उपस्थित केला. ‘दावत-ए-इस्लामी’ नावाच्या संघटनेवर बंदी घातली जावी. हत्येच्या घटनेशी या संघटनेचे कनेक्शन असल्याची बाब समोर आली असल्याचे खासदारांनी म्हटले आहे. मीणा यांनी सभागृहात नियम 377 अंतर्गत हा मुद्दा उपस्थित केला आहे.
काही दिवसांपूर्वी उदयपूरमध्ये कन्हैयालाल यांच्या हत्येद्वारे सांप्रदायिक हिंसा भडकविण्याचा कट होता. देशाबाहेरील संघटनेचा या घटनेत हात असल्याचे तपासात दिसून आले आहे. ‘दावत-ए-इस्लामी’ या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी सरकारकडे करत आहे. कन्हैयालाल यांच्या हत्येसाठी जबाबदार लोकांना लवकर फासावर लटकविले जावे असे मीणा यांनी म्हटले आहे.
जारा समुदायाशी संबंधित मागणी
नियम 377 अंतर्गत भाजप खासदार सुब्रत पाठक यांनी उत्तरप्रदेशातील बंजारा समुदायाला अनुसूचित जमातीच्या यादीत सामील करण्याची मागणी केली आहे. ही मागणी गांभीर्याने घेत बंजारा समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात यावा असे पाठक यांनी म्हटले आहे. तर भाजप खासदार सुभाष बहेडिया यांनी धनादेश न वटण्याशी निगडित एका विषयक सभागृहात शून्यप्रहरात उपस्थित केला. याच्याशी निगडित नियमाचा गैरवापर होत असल्याने त्यावर पुनर्विचार केला जावा असे बहेडिया यांनी म्हटले आहे.