महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

11:23 AM Jun 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगुंदीजवळ युवकाचा मृत्यू : वादळी पावसामुळे  झाडांची पडझड, प्रशासनाला जाग येणार का?

Advertisement

बेळगाव : वादळी वारा आणि पावसामुळे झाड अंगावर कोसळून बेळगुंदी-बिजगर्णी मार्गावर एका निष्पाप युवकाचा रविवारी बळी गेला आहे. त्यामुळे धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरवर्षी वादळी पावसाला सुरुवात झाली की झाडांची पडझड होते आणि नुकसानीला सामोरे जावे लागते. यंदा पहिल्याच पावसात एका युवकाला जीवाला मुकावे लागले आहे. शहर आणि ग्रामीण भागातील विविध रस्त्यांवर आयुर्मान संपलेल्या झाडांची संख्या मोठी आहे. अशी झाडे वादळी पावसात सर्वांना धोकादायक ठरू लागली आहेत. गतवर्षीच्या पावसाळ्यात 100 हून अधिक झाडांची पडझड झाली होती. मागील दोन वर्षांपूर्वी क्लब रोडवर वृक्ष कोसळून एका निष्पाप व्यक्तीचा बळी गेला होता. पुन्हा यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच एका युवकाचा बळी गेला आहे. झाड अंगावर कोसळून जागीच मृत्युमुखी पडण्याची घटना घडली आहे. त्यामुळे रस्त्याशेजारील धोकादायक झाडांचा प्रश्न समोर आला आहे. याबाबत संबंधित वृक्ष मालक, ग्राम पंचायत आणि वनखात्याने जागृत होऊन धोकादायक झाडांचा सर्व्हे करणे काळाची गरज बनली आहे.

Advertisement

वनखाते दरवर्षी लाखो वृक्षांची लागवड करते. खुल्या जागा, स्मशानभूमी, शाळा, हॉस्पिटल, रस्त्याच्या दुतर्फा ही लागवड केली जाते. मात्र, याच रस्त्यावर आयुर्मान संपलेल्या झाडांकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे दुर्घटनांना सामोरे जावे लागत आहे. मागील दोन दिवसांपासून मान्सून अधिक सक्रिय झाला आहे. जोरदार पावसामुळे विविध ठिकाणी झाडांची पडझड होऊ लागली आहे. त्यामुळे खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान होऊ लागले आहे. विशेषत: रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर अचानक झाडे कोसळू लागल्याने वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होऊ लागला आहे. वनखात्याने पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांचा सर्व्हे करून अशी झाडे हटविणे गरजेचे होते. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याने पावसाच्या सुरुवातीलाच दुर्घटना घडली आहे. त्यामुळे आता तरी संबंधित ग्राम पंचायत आणि वनखात्याला जाग येणार का? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. यंदा हवामान खात्याने दमदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे मोठ्या पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडे हटवावीत, अशी मागणीही होत आहे.

शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न

शहरातील विविध भागांत आणि विविध रस्त्यांवरील धोकादायक झाडांचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. रस्त्याच्या दुतर्फा झाडे एका बाजूला कलंडलेली पाहावयास मिळत आहेत. कधी कोसळतील याचा नेम नाही. त्यामुळे अशा आयुर्मान संपलेल्या धोकादायक झाडांचा सर्व्हे करावा आणि ती हटवावीत, अशी मागणीही होत आहे.

पावसाळ्यात वाहनाधारकांना झाडांचा धोका

ग्रामीण भागात रस्त्याच्या दुतर्फा विविध धोकादायक झाडे आहेत. काही झाडे एका बाजूला पूर्णपणे कलंडलेली आहेत. अशातच अरुंद रस्ते असल्याने अशा झाडांचा धोका कायम आहे. वादळी पावसामुळे झाडांच्या फांद्या आणि झाडे कोसळून दुर्घटनांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाला आता जाग येणार का? असा प्रश्नही केला जात आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article