कॅम्प येथील लोखंडी कमान पुन्हा मोडली
टिप्परची जोरदार धडक : तात्काळ उभारणीची मागणी
बेळगाव : कॅम्प भागातील अवजड वाहतूक रोखण्यासाठी लावण्यात आलेली लोखंडी कमान एका टिप्परच्या धडकेने कोसळल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली. टिप्परचालकाला अंदाज न आल्याने टिप्पर कमानीखाली अडकून बसला. सुदैवाने यामध्ये कोणाला गंभीर दुखापत झाली नसली तरी कमानीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. अवजड वाहतूक रोखण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डने ग्लोब थिएटर, मिलिटरी महादेव मंदिर व गांधी पुतळ्यानजीक लोखंडी कमानी उभारल्या होत्या. यापैकी ग्लोब थिएटर व मिलिटरी महादेव मंदिर येथील लोखंडी कमानी अवजड वाहनांच्या धडकेने त्या अनेक वेळा मोडल्या आहेत. ज्या वाहनांना रोखण्यासाठी कमान उभारली त्याच वाहनांकडून कमानीचे नुकसान होत आहे. ग्लोब थिएटर येथील कमान तर तीन ते चार वेळा मोडल्याचे प्रकार घडले आहेत. यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डचे बरेच नुकसान झाले आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला एका टिप्परचालकाने लोखंडी कमानीला धडक दिली. त्यानंतर टिप्पर तेथेच अडकून पडला. अखेर बऱ्याच प्रयत्नांनंतर टिप्पर कमानीतून बाहेर काढण्यात आला. परंतु, यामध्ये कमानीचे नुकसान झाले. त्यामुळे ही कमान सध्या काढून ठेवली आहे. लवकरच शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुन्हा कमान उभारणे गरजेचे आहे. या परिसरात 5 ते 6 शाळा असल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्यामुळे कमानीची उभारणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.