चार कंपन्यांचे आयपीओ लवकरच बाजारात
मुंबई :
भारतीय शेअर बाजारात येणाऱ्या काळामध्ये चार कंपन्यांचे आयपीओ दाखल होणार आहेत. त्यांना शेअरबाजारातील नियामक सेबी यांनी आयपीओ सादरीकरणासाठी मंजुरी दिली आहे. सदर चार कंपन्यांमध्ये नॅक पॅकेजिंग, शिवालय कंस्ट्रक्शन, वर्मोरा ग्रॅनिटो आणि बिहारीलाल इंजिनिअरींग यांचा समावेश आहे. या चारही कंपन्या आयपीओच्या माध्यमातून 1400 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम उभारण्याची तयारी करत आहेत. सेबीने दिलेल्या माहितीनुसार या कंपन्यांनी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान आयपीओ दाखल करण्यासंदर्भात आपले अर्ज कागदपत्रांसह दाखल केले होते. 15 ते 26 डिसेंबर दरम्यान सेबीने चाचणी केली आणि या चाचणीनंतर आयपीओला हिरवा कंदिल दाखविला.
पाहुया कंपन्यांची माहिती
नॅक पॅकेजिंग- कंपनी आयपीओच्या माध्यमातून 475 कोटी रुपये उभारणार आहे. यामध्ये प्रवर्तक आणि समभागधारक 70 लाख समभागांची विक्री करणार आहेत. ही उभारलेली रक्कम कंपनी गुजरातमधील मेहसाना येथे होणाऱ्या उत्पादन कारखान्यासाठी वापरणार आहे. शिवालय कंस्ट्रक्शन- हा आयपीओ ताजे समभाग आणि ऑफर फॉर सेल यांचे मिश्ा़dरण असणार आहे. यामध्ये 450 कोटी रुपयांचे ताजे समभाग सादर केले जाणार आहेत तर 2.48 कोटी समभाग प्रवर्तकांकडून विक्री केले जाणार आहेत. या उभारलेल्या रक्कमेचा वापर कंपनी डोक्यावरील 340 कोटी रुपयांचे कर्ज कमी करण्यासाठी करणार आहे.
वर्मोरा ग्रॅनिटो- राजकोटमधील टाईल्स आणि बाथवेअर उत्पादने बनविणारी कंपनी 400 कोटी रुपयांचे ताजे समभाग सादर करणार आहे. 5.24 कोटी समभाग ऑफर फॉर सेल अंतर्गत सादर केले जातील. कंपनी या रक्कमेचा वापर 280 कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी करणार आहे. इतर शिल्लक राहिलेली रक्कम कंपनी आपल्या कामकाज खर्चासाठी करणार आहे.
बिहारीलाल इंजिनिअरींग- कंपनी 110 कोटी रुपयांचे ताजे समभाग सादर करणार असून 78.54 लाख समभाग ऑफर फॉर सेल अंतर्गत सादर केले जातील. उभारलेल्या रक्कमेचा वापर भांडवली खर्च, कर्जाची भरपाई या शिवाय कामकाजी खर्चासाठी केला जाणार आहे. 1995 मध्ये सदरची कंपनीची पंजाबमध्ये सुरूवात झाली होती.
2025 मध्ये 1.76 लाख कोटींची उभारणी
2025 मध्ये पाहता आतापर्यंत विविध कंपन्यांच्या आयपीओंनी 1.76 लाख कोटी रुपये उभारले आहेत. गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास त्याचप्रमाणे मजबूत आर्थिक विकास या दोन बाबी महत्त्वाच्या राहिल्या आहेत. 2024 मध्ये 90 कंपन्यांनी 1.6 लाख कोटी रुपये उभारले होते.