‘सॅजिलीटी’चा आयपीओ आज होणार खुला
वृत्तसंस्था/ मुंबई
आरोग्य क्षेत्राला वाहिलेल्या सॅजिलीटी इंडिया लिमीटेडचा आयपीओ आज मंगळवार 5 नोव्हेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून 2107 कोटी रुपये उभारण्याचा मानस बेंगळूरच्या कंपनीने केला आहे. सदरचा आयपीओ 5 रोजी खुला होईल. 7 नोव्हेंबर रोजी गुंतवणुकीसाठी बंद होणार आहे. या आयपीओकरिता कंपनीने समभागांची किंमत 28-30 रुपये प्रति समभाग अशी निश्चित केली आहे.
आयपीओ खुला होण्याआधी सॅजिलीटी इंडिया लिमीटेडची मूळ कंपनी सॅजिलीटी बीव्ही यांनी 9 संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून 2.61 टक्के हिस्सेदारी विकत 366 कोटी रुपये उभारले आहेत. सॅजिलीटी बीव्ही ही नेदरलँडमधील प्रवर्तक कंपनी 70.2 कोटी समभाग विक्रीसाठी सदर करणार आहे. या आधी 98.44 कोटी समभाग विक्री करण्याचा इरादा कंपनीचा होता. तो आता कमी करण्यात आला आहे. आयपीओमध्ये 75 टक्के हिस्सा संस्थात्मक खरेदीदारांसाठी, 10 टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित 15 टक्के बिगर संस्थात्मक गुंतवणुकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
निवा बुपाचा आयपीओ 7 नोव्हेंबरला
खासगी आरोग्य विमा क्षेत्रात असणारी कंपनी निवा बुपाचा आयपीओ याच आठवड्यात 7 नोव्हेंबरला गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. 11 नोव्हेंबरपर्यंत या आयपीओत गुंतवणूक करण्याची संधी असणार असून 14 नोव्हेंबरला कंपनीचे समभाग बीएसई, एनएसई निर्देशांकावर सूचीबद्ध होणार आहेत. 2200 कोटी रुपये आयपीओच्या मार्फत उभारले जाणार आहेत. 70-74 प्रती समभाग इश्यू किंमत असेल.