फिनटेक कंपनी पाईन लॅब्सचा आयपीओ येणार
1 अब्ज डॉलर्सची रक्कम उभारणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मास्टर कार्ड यांची गुंतवणूक असणाऱ्या पाईनलॅब्स या कंपनीचा आयपीओ लवकरच बाजारात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या आयपीओ अंतर्गत कंपनी येणाऱ्या काळामध्ये एक अब्ज डॉलरची रक्कम उभारणी करणार आहे.
शेअर बाजारामध्ये असणाऱ्या तेजीचा कल पाहून अनेक कंपन्या आता आपला आयपीओ सादर करण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. त्यामध्ये आता डिजिटल पेमेंट क्षेत्रातील कंपनी पाईन लॅब्स यांचादेखील समावेश झाला आहे. आयपीओ सादरीकरण करण्याआधी कंपनी काही रक्कमही उभारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरी मोठी कंपनी
तसे पाहायला गेल्यास एक अब्ज डॉलर्सचा आयपीओ सादर करू शकणारी पेटीएमशी संबंधित वन 97 कम्युनिकेशन्स नंतर दुसरी भारतीय फिनटेक क्षेत्रातील मोठी कंपनी ठरणार आहे. वन 97 कमुनिकेशन्स कंपनीने 2021 मध्ये आयपीओ अंतर्गत अडीच अब्ज डॉलरची उभारणी केली होती. भारतात कंपन्यांनी यावर्षी आत्तापर्यंत आयपीओच्या माध्यमातून सात अब्ज डॉलर्स रुपयांची उभारणी केली आहे. 2023 च्या समान अवधीच्या तुलनेमध्ये पाहता सध्याची रक्कम उभारणी ही जवळपास तीनपट अधिक आहे.