चळवळीचा अन्वयार्थ
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांना झुरळाची दिलेली उपमा आता ‘कॉक्रोच जनता पार्टी’ नामक चळवळीत रुपांतरीत झाली आहे. विडंबन वा उपहासातून जन्माला आलेल्या या चळवळीला आगामी काळात खरोखरच राजकीय पक्षाचे स्वरुप येईल काय, याचे उत्तर शोधण्यासाठी मात्र काही काळ वाटच पहावी लागेल.
इंधन तुटवडा, महागाई, आर्थिक संकट, बेरोजगारी, पेपरफुटीसह वेगवेगळ्या प्रश्नांमुळे भारतीय जनमानसामध्ये काहीशी अस्वस्थता दिसून येते. विशेषत: देशातील तरुण वर्ग सध्या एका वेगळ्या परिस्थितीतून जात आहे. स्वाभाविकच अशा काळात सरन्यायाधीशांनी केलेले वक्तव्य व त्यांच्या विडंबनार्थ सुरू झालेल्या कॉक्रोच जनता पार्टी या संकल्पनेला आता चळवळीचे स्वरुप प्राप्त झाल्याचे पहायला मिळते. मूळच्या छत्रपती संभाजीनगरच्या व सध्या अमेरिकेतील बोस्टनमध्ये राहणाऱ्या अभिजित दीपके या युवकाने सुरू केलेल्या या संकल्पनेला सध्या भारतीय तरुणाईकडून प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतो. केवळ दोन, तीन दिवसांत सीजेपीचे फॉलोअर्स बीजेपीपेक्षा अधिक वाढल्याची माहिती समोर आली असून, याला वेगळ्या शक्ती कारणीभूत असल्याचे आरोपदेखील होत आहेत. मात्र, एका सोशल चळवळीला इतका भरभरून प्रतिसाद का मिळतो, आपल्यावरील नाराजीचेच हे गमक नाही ना, याचे सत्ताधाऱ्यांनीही आत्मपरीक्षण करावे. तथापि, त्याऐवजी सीजेपीचे एक्स अकाऊंट बंद करण्यातच संबंधितांनी धन्यता मानलेली दिसते. मुळात भारत हा बहुविध व बहुसांस्कृतिक देश आहे. मागच्या सात ते आठ दशकांत देशाने अनेक स्थित्यंतरे अनुभवली. आंदोलने, चळवळी पाहिल्या. त्याचबरोबर अनेकविध राजकीय पक्षांचा उभरता आणि पडता काळही बघितला. आम आदमी पक्ष हे त्याचे अलीकडचे उदाहरण. आप आधी सोशल माध्यमातून पुढे आला, रस्त्यावर उतरला आणि सत्तेला आव्हान देऊ लागला. काँग्रेसप्रणित यूपीए सरकारविरोधात याच अण्णा चळवळीने असंतोष तयार केला. तथापि, पक्षाला सूत्रबद्ध वैचारिक बैठक नव्हती. संघटनात्मक बेस नव्हता. नेतृत्वातील अंतर्विरोध, अनुभवाचा अभाव याही आपमधल्या उण्या बाजू होत्या. त्यामुळे देशात असंतोष पसरवूनही या पक्षाला त्याचा लाभ घेता आला नाही. काँग्रेसविरोधी संतापाची लाट आपने तयार केली, पण त्या लाटेवर स्वार झाला नरेंद्र मोदींचा भाजपा. तिथून पुढचा इतिहास सगळ्यांना ठाऊक आहे. हे बघता कॉक्रोच जनता पार्टीचे काय होते, हे पहावे लागेल. मुळात सोशल मीडिया हँडल चालवणे आणि एखादी चळवळ वा पक्ष चालवणे, यात बरेच अंतर आहे. पेपरफुटी, बेरोजगारी, आर्थिक समस्यांमुळे देशातील तरुण अस्वस्थ असला, तरी या सर्वांना संघटित करणे, दिशा देणे, ही सोपी बाब नाही. त्याकरिता आवश्यक असलेली वैचारिक प्रगल्भता, सातत्य, कार्यक्रम व नेतृत्व क्षमता संबंधितांना दाखवावी लागेल. अन्यथा, ही चळवळ म्हणजे ट्रेंडिंगमधली एक छोटीशी झुळूक ठरण्याचा धोका संभवतो. भारतातील सध्याची राजकीय स्थिती पाहिली, तर भाजपाने अर्धा अधिक भारत व्यापला आहे. अनेक प्रादेशिक पक्ष सध्या शेवटच्या घटका मोजत आहेत. त्यामुळे आगामी काळात अनेक ठिकाणी काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना होऊ शकतो. सीजेपीचे खरोखरच उद्या राजकीय पक्षात रुपांतर झाले, तरी त्यातून भाजपपुढे लगेच आव्हान निर्माण होईल, असे म्हणणे घाईचे ठरेल. आम आदमी पार्टीसारखा पक्ष सुरुवातीच्या काळात काँग्रेससाठी मारक ठरला, तर भाजपला उपकारक. सीजेपीने राजकीय पर्याय दिला, तर हीच भीती जास्त असेल. तरीही भाजपसारखा अतिबलवान पक्ष झुरळासारख्या एका चळवळीची धास्ती घेतो, यातूनच काय ते लक्षात यावे. मुळात येथील सत्ताधारी आजमितीला वास्तवाऐवजी देशाचे गुलाबी चित्र रंगवण्यात मग्न आहेत. तर विरोधकही लोकांच्या मूलभूत प्रश्नांना भिडण्यात असमर्थ ठरत आहे. लोकांचा आवाज बनून मैदानात उतरण्याऐवजी विरोधक केवळ नको त्या टीकाटिप्पण्या करीत तोंडाच्या वाफा दवडत आहेत. त्यामुळे निराश व हताश झालेला एक वर्ग सीजेपीसारख्या चळवळीकडे आकर्षित होत असेल, तर ते स्वाभाविकच म्हणावे लागेल. सीजेपीचे काय होईल, हा भाग अलहिदा. पण, अशी चळवळ निर्माण होणे, हे सत्ताधारी व विरोधक अशा दोघांचे अपयश म्हणावे लागेल.