हिरकणी बुरुजाचे अंतरंग झाले खुले
कोल्हापूर / सुधाकर काशीद :
रायगडावरील हिरकणी बुरुज आणि एका आईचे वात्सल्य ही ओळख प्रत्येकाच्या मनात आजही ठसलेली आहे. पण या हिरकणी बुरुजाचा वर्षानुवर्षे दडून राहिलेला सुरक्षिततेचा आणखी एक पैलू काही दिवसांपूर्वी समोर आला आहे. हा बुरुज म्हणजे केवळ एक सुळका नाही, तर या बुरुजा आडून सुरक्षिततेचा वेध घेण्यासाठी म्हणजे मावळ्यांना सुरक्षित फिरण्यासाठी दगडी बांधणीची असलेली वाट सापडली आहे.
रायगडाचे संवर्धन सुरू आहे. त्यानिमित्ताने हिरकणी बुरुजाचे काम करताना सध्याच्या पातळीपेक्षा सात फूट खोलीवर ही बांधीव वाट मिळाली आहे. जी दगड-मातीच्या थराखाली पूर्ण मुजून गेली होती. त्याचबरोबर याच बुरुजाजवळ एक शिवकालीन पाण्याची बांधीव टाकीही सापडली आहे. अभेद्य अशा रायगडाची बांधणी करताना किती कल्पकता वापरली होती? कशाकशाचा वेध घेतला होता? याचे हा बुरुज एक उदाहरण ठरला आहे. रायगडावरील प्रत्येक बांधकामाचे खूप वेगळे महत्त्व आहे. पण आता संवर्धनाच्या निमित्ताने आणखी वेध घेत असताना नवे नवे पैलू समोर येऊ लागले आहेत.
रायगड संवर्धनाचे काम संभाजीराजे छत्रपती यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. या संवर्धनाचे वास्तू संवर्धक म्हणून वरूण भामरे काम पाहत आहेत. रायगडाच्या मूळ ढाच्याला कसलाही धक्का न लावता हे काम सुरू आहे. काळाच्या उदरात दडून गेलेली रायगडावरील घरे, त्यातील वस्तू त्यामुळे प्रकाशात आल्या आहेत. गडावरील तलावांचे संवर्धन झाले आहे. आता हिरकणी बुरुज, वाघ दरवाजा आणि महादरवाज्याच्या परिसरात काम सुरू आहे.
हिरकणी बुरुज आणि एका मातेचे वात्सल्य ही कथा तर लहानपणापासूनच प्रत्येकाच्या मनात ठसलेली आहे. त्यातून वात्सल्याबरोबरच रायगडाची भव्यताही जाणवणारी आहे. हा तासून तयार केलेला आहे. हा बुरुज रायगडावर येणाऱ्या प्रत्येकाने पाहिला आहे. पण वस्तुस्थिती अशी, की बुरजाचे टोक सर्वांच्या नजरेस पडते. पण बुरुजाची नेमकी बांधणी दगड-मातीच्या आत दडून राहिली होती. आता संवर्धनाच्या निमित्ताने ही दगड-माती काळजीपूर्वक बाजूला काढली गेली असता सात फुटाखाली चक्क दगडी मार्ग व छोटे-छोटे झरोके दिसून आले आहेत. जेणेकरून बुरुजाजवळून फिरताना खाली तळापर्यंतचे सर्व काही मावळा पाहू शकेल. पण बुरुजाच्या आडाने फिरणारा मावळा तळाकडून कोणाच्याही नजरेस येणार नाही, अशी त्याची रचना आहे. आता संवर्धनाच्या निमित्ताने दगड-माती बाजूला काढली जात आहे आणि रायगडावरील हिरकणी बुरुजाचे दडलेले रूप पुन्हा प्रकाशात येऊ लागले आहे. या बुरुजाला बाण मारण्यासाठी खासजागा ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याला ‘गन पॉईंट’ असेही म्हटले जाते.
रायगड ही छत्रपती शिवरायांची राजधानी. हिरोजी इंदलकर यांनी गडाची बांधणी करताना त्याची निवास, राज्यकारभार, पाणीपुरवठा आणि सुरक्षितता अशा वेगवेगळ्dया अंगाने वैशिष्ट्यो जपली. हिरकणी बुरजाजवळ आता पाण्याची टाकीही सापडली आहे. त्या टाकीत वर्षानुवर्षे साचलेला 11 फूट गाळ होता. त्यामुळे या बुरुजाजवळ टाकी आहे, त्याची कल्पना कोणाला येत नव्हती. रायगडाची भव्यता सर्वांच्या नजरेस येते. त्याचे वैशिष्ट्यापूर्ण कंगोरे मात्र सहजपणे कळत नाहीत. बुरजालगत पाण्याची दगडी टाकी म्हणजे बुरुजाचे संरक्षण करणाऱ्या मावळ्यांसाठी खास केलेली ही सोय होती.
रायगड संवर्धनाच्या निमित्ताने हे सर्व दडलेले कंगोरे समोर येत आहेत. रायगडावर पाऊल ठेवले की शिवरायांचा जयजयकार आपोआप ओठावर येतो. एवढी शिवरायांची महानता आहे. पण केवळ जयजयकार नव्हे तर, रायगडाचा कोपरा आणि कोपरा या निमित्ताने पाहण्याची गरज आहे. कारण त्या ठिकाणी इतिहास दडला आहे आणि कशा ना कशा रूपातून तो डोकावतच आहे.
- रोज नवा पैलू नजरेस
रायगड म्हणजे एक अमूल्य असा इतिहासाचा ठेवा आहे. रायगड संवर्धनाची जबाबदारी पेलताना त्याचे वेगवेगळे पैलू समोर येत आहेत. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा या संवर्धनात मोठा वाटा आहे. रायगड असा अंतर्बाह्या आम्हाला रोज पाहायला मिळतो आहे. सर्वांनी जरूर रायगडाचे या वेगवेगळ्dया बाजूने नक्कीच दर्शन घ्यावे.
वरूण भामरे, वास्तू संवर्धक