पावसाचा जोर ओसरला, साळावली धरण भरले
पणजी /विशेष प्रतिनिधी
राज्यात बुधवारी पावसाचा जोर थोडा ओसरला आणि केवळ एक सेंटिमीटर एवढीच सरासरी पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने मात्र एक ऑगस्टपर्यंत येलो अलर्ट जारी करुन जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान साळावली धरण पूर्ण भरले असून आज कोणत्याही क्षणी या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होईल.
गेल्या 24 तासात सर्वाधिक एक इंच पाऊस हा वाळपईमध्ये झाला. धारबांदोडा, साखळी येथे प्रत्येकी पाऊण इंच तर सांगे, म्हापसा, पेडणे व काणकोण येथे प्रत्येकी अर्धा इंच पावसाची नोंद झाली. फोंडा, जुने गोवे, व केपे येथे अर्धा सेंटीमीटर एवढा पाऊस पडला. मुरगाव, पणजी, दाबोळी व मडगाव येथे तुरळक पावसाच्या सरी पडून गेल्या. गेल्या 24 तासातील एक सेंटीमीटर पावसाच्या नोंदणीमुळे यंदाच्या मोसमात 51 इंच एवढा पाऊस पडला. अद्याप बत्तीस टक्के तूट आहे.
राज्यातील धरण क्षेत्रामध्ये मात्र सर्वत्र समाधानकारक पाऊस पडला असून जवळपास सर्व धरणामध्ये सरासरी 70 टक्के पाणीसाठा निर्माण झालेला आहे. साळावली धरणामध्ये 98.5 टक्के पाणीसाठा असून आज सकाळपर्यंत या धरणांतर्गत असलेली विहीर काठोकाठ भरून वाहू लागेल.