सीमाभागात मराठी भाषा टिकविण्याची तीव्रता अधिक!
संमेलनाध्यक्ष बाबासाहेब सौदागर यांचे प्रतिपादन : 23 वे उचगाव साहित्य संमेलन अमाप उत्साहात
एन. ओ. चौगुले /आण्णाप्पा पाटील /उचगाव
सीमाभागात मराठी भाषेवरील दडपण झुगारून अनेक वर्षांपासून सीमाबांधव महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडत आहेत. लोकशाही मार्गाने तुमचा लढा सुरूच आहे. तुमच्या मायबोली मातृभाषेबद्दल इथे स्वातंत्र्य दिसत नाही. मराठी साहित्य संमेलन अथवा मराठी कार्यक्रम भरविण्याकडे इथले प्रशासन व पोलीस अधिकारी यांचे लक्ष असते. अशा परिस्थितीत शांततेत व माय मराठी टिकविण्यासाठी सीमाभागात अधिक तीव्रता दिसून येते. मातृभाषेवर तुमची निष्ठा आहे. मराठी भाषेसाठी असलेल्या तुमच्या जिद्दीमुळेच सीमाभागात मराठी साहित्य संमेलने विलोभनीय दिसून येतात. याचा आम्हाला अभिमान वाटतो, असे प्रतिपादन श्रीरामपूर, अहमदनगर येथील प्रसिद्ध साहित्यिक गीतकार बाबासाहेब सौदागर यांनी येथे व्यक्त केले.
रविवार दि. 12 रोजी आयोजित 23 व्या उचगाव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून बाबासाहेब सौदागर बोलत होते. ते पुढे म्हणाले, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. मात्र, सीमाभाग महाराष्ट्रात सामील झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने सीमाबांधवांना न्याय मिळणार आहे. मराठी भाषा आमची आई आहे. नऊवारीच्या सौंदर्यात मराठी नांदते, त्यामुळे मराठी भाषेचा अभिमान राखा. ही समृद्ध भाषा आहे. आपण आईला आई म्हणतो तोपर्यंत या भाषेला कोणीच धक्का लावू शकत नाही. मराठीबरोबरच अन्य भाषांचा आदर करा. संस्कारांमुळे गुण विकसित होतात. त्यामुळे चांगले संस्कार अंगिकारले पाहिजेत. ग्रामीण भागातून उत्तम दर्जाचे कवी, साहित्यिक निर्माण होऊ शकतात. यासाठी साहित्यिकांच्या सहवासात राहिले पाहिजे.
गद्य, पद्य व मद्य यातील अनेकांना मद्याची ओढ असते. मात्र, गद्य आणि पद्य यांची ओढ निर्माण झाल्यास साहित्यिक, गीतकार निर्माण होतात. गीतकारांनी ग्रामीण भावविश्व जाणून गीतरचना केली पाहिजे. मराठी भाषेत शब्दांची गंमत फार मजेशीर आहे. कीर्तन या शब्दाला उलट केले की नर्तकी असे होते. कीर्तनकारांच्या हातात टाळ वाजतात आणि नर्तकीच्या पायात चाळ वाजतात. लोकांना या दोन्हींचेही तितकेच आकर्षण आहे. समाजात हार घालणारे कमी तर प्रहार करणारे अधिक असतात. यशाचा एक हार गळ्यात घालून घेण्यासाठी हजारो प्रहार झेलावे लागतात, याची जाण तरुणांनी ठेवली पाहिजे. स्वत: यशस्वी झाल्यानंतर समाजात मायेची शाल पांघरा. यामुळे समाधान नक्कीच मिळते, असे सौदागर म्हणाले. त्यांनी आपल्या विविध कविता सादर केल्या. एक सर्वसामान्य कवीपासून ते साहित्यिक, चित्रपट गीतकार होईपर्यंतचा प्रवास त्यांनी सांगितला. यामध्ये त्यांनी सांगितले की, कठीण प्रसंगांचा सामना न डगमगता केला पाहिजे. वीस वर्षांच्या परिश्रमानंतर चित्रपटात गीतकार म्हणून काम केले. समुद्राच्या तळातून मोती काढण्याचे धाडस ठेवा, यश निश्चित मिळेल, असे सौदागर यांनी सांगितले.
‘झाले शहीद त्यांचे, व्हावेत पूर्ण हेतू,
यावे पुन्हा नव्याने, स्वातंत्र्य देवते तू’
देशासाठी शहीद झालेल्या जवानांवर हे गीत सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. मराठी भाषेबद्दल सातत्याने झटणाऱ्या सीमाबांधवांची व्यथा आणि त्यांचा संघर्ष, तळमळ यावर भावूक होऊन त्यांनी, ‘भलेपणाच्या उपकाराचे कसे मानू मी आभार, दरवळणाऱ्या चंद्रफुलांचा आभाळाला झाला भार’, हे गीत बाळासाहेब सौदागर यांनी सादर केले.
समाजाला चांगल्या संस्कारांची गरज : हभप माऊली महाराज जाऊरकर
आधुनिकतेच्या नावाखाली लोक आपली संस्कृती, परंपरा विसरत आहेत. आई-वडिलांनी स्वत: चांगले संस्कार अंगिकारून मुलाबाळांवर सुसंस्कार केले पाहिजेत. कारण समाजाला दिशा देण्यासाठी संस्कारांची गरज आहे, असे आळंदी येथील बाल प्रवचनकार हभप माऊली महाराज जाऊरकर यांनी संमेलनाच्या संत साहित्याच्या दुसऱ्या सत्रात सांगितले. त्यांनी आपल्या सुमधूर आवाजात टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष केला. यामुळे अवघी उचगावनगरी विठ्ठलमय बनली. त्यांनी श्रोत्यांना हात वर करून ‘विठ्ठल विठ्ठल’ म्हणत भक्तीरसात नेले. आपुलीया हिता जो असे जागता, धन्य मातापिता तयाचीया, कुळी कन्या पुत्र, होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, गीता भागवत करिती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, या अभंगाचे विश्लेषण त्यांनी आपल्या कीर्तनातून विविध प्रमाण देत विनोदी शैलीत सादर केले.
‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा’ कवितेने रसिक मंत्रमुग्ध : अनंत राऊत यांचे सादरीकरण
प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्री ही फार महत्त्वाची असते. अगदी नात्यांच्या पलीकडे जाऊन मित्रता टिकविली जाते. चांगला मित्र आपल्या पाठीशी असेल तर त्या जगण्याला वेगळेच बळ मिळते. अशा आशयाची संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असलेली ‘दु:ख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा’ ही कविता जालना-अकोला येथील प्रसिद्ध कवी अनंत राऊत यांनी सादर करून संमेलनात वेगळीच रंगत आणली आणि साऱ्यांना मैत्रीच्या भावविश्वात नेऊन ठेवले. संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात पणवेल येथील कवी दुर्गेश सोनार व अनंत राऊत यांचे कवी संमेलन झाले. यामध्ये चांगला मित्र मार्गदर्शक असेल, कठीण प्रसंगांतून सावरणारा असेल तर आत्महत्येचे प्रमाणही कमी होते, असे कवितेतून अनंत राऊत यांनी सादर केले. ‘कसे वातावरण आले, कुठे अश्रू अडवले, कुठे त्याचे धरण झाले’ ही कविता सादर करत सर्व धर्म समभाव, महिला-पुरुष भेदाभेद नाही, असा संदेश दिला. तसेच ‘मायबाप ही कविता सादर करताच श्रोत्यांना अश्रू अनावर झाले. मराठी भाषा जगली पाहिजे यासाठीच सीमाभागात आलो आहे, असे दुर्गेश सोनार यांनी सांगितले. ‘कुटुंब बदलतंय,आई वातीसारखी जळत राहते, अशा विविध कविता त्यांनी सादर केल्या.
बौद्धिक खाद्य देण्यासाठीच साहित्य संमेलने : डॉ. किरण ठाकुर
पूर्वी बैलगाड्यांच्या शर्यती अधिक प्रमाणात होत असत. यामुळे शेती आणि शेतकरीवर्ग आपल्या कामात रममाण झालेला असे. समाजाला बौद्धिक खाद्य देण्यासाठी मराठी साहित्य संमेलने उपयोगी ठरतात. एकदिवसीय साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ग्रंथदिंडी, पालखी, टाळमृदंगाच्या तालात दंग वारकरी, साहित्यिकांचे विचार व नागरिकांमध्ये असलेला अमाप उत्साह यामुळे गावात साहित्याचा आनंद निर्माण होतो. हे सर्व आम्ही सीमाबांधव आपली मराठी मातृभाषा वाचविण्यासाठी करतो आहोत, असे मनोगत तरुण भारतचे समूहप्रमुख डॉ. किरण ठाकुर यांनी उचगाव येथील मराठी साहित्य संमेलनात व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, एक दिवस महाराष्ट्रात जाऊ, या आशेवर आम्ही जगत आहोत. मात्र, महाराष्ट्राने सीमाबांधवांची ताटातूट केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा बाणा आम्ही सीमाभागात जिवंत ठेवला आहे. महाराष्ट्र मात्र सीमाभागाकडे लक्ष देत नाही. कन्नड सक्ती वाढली, त्याला उत्तर म्हणून मराठी साहित्य संमेलने प्रत्येक गावागावात झाली पाहिजेत. सीमाभागात साहित्य संमेलनांची मेढ कडोली गावातून रोवली आहे. रामायण, महाभारत, शिवचरित्र मातृभाषेमध्ये इतकं चांगलं समजतं की, माणसाने कसं जगावं हे कळतं. संतांची शिकवण फार मोठी आहे. त्यामुळे संतसाहित्याचा अभ्यास करा, असेही डॉ. किरण ठाकुर म्हणाले. याचबरोबर सीमाप्रश्नाच्या लढ्याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.