मान्सूनोत्तर पावसाचा जोर वाढला
वाळपईत अडीच इंच पावसाची नोंद : आजही राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस
पणजी : गोव्यात मान्सूनोत्तर पावसाचा जोर बराच वाढलेला आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात सध्या मुसळधार पाऊस पडत असून वाळपईत गेल्या 24 तासांमध्ये अडीच इंच पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत गोव्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत होता. सोमवारपासून गोव्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. बुधवारी सकाळी लखलखीत ऊन पडले. मात्र दुपारनंतर ढगाळ हवामान आणि त्यानंतर सत्तरी, सांखळी, धारबांदोडा, फोंडा आदी भागात सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत चालूच होता. इशान्य मान्सूनने दक्षिण भारताच्या पूर्व भागातील राज्यांमध्ये जोर धरलेला आहे.
त्यातच बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गोव्यात बुधवारी जोरदार पाऊस दुपारनंतर सुरू झाला. त्यामुळे सायंकाळी कार्यालये सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या कर्मचारीवर्गाची धांदल उडाली. पावणेसहाच्या दरम्यान सुरू झालेला पाऊस सायंकाळी उशिरापर्यंत चालू होता. आजही गोव्यातील विविध भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली. मंगळवारी डिचोली, सत्तरी, सांगे, केपे, मुरगाव आदी भागात मुसळधार पाऊस पडला. वाळपईत अडीच इंच पावसाची नोंद झाली. दाबोळीत दीड इंच, केपे येथेही दीड इंच तसेच सांगेमध्ये सव्वा इंच, मुरगाव, काणकोण, फोंडा येथे प्रत्येकी 1 इंच तर मडगाव, सांखळी, म्हापसा येथे प्रत्येकी अर्धा इंच, पेडणे, जुने गोवे व पणजी येथे अर्धा इंच पेक्षाही कमी पाऊस पडला.
कोजागरीचा चंद्र लपला ढगात
बुधवारी गोव्यात कोजागरी उत्सव होता. सायंकाळी शारदीय चंद्रदर्शन हे अत्यंत महत्त्वाचे असते. शरद ऋतूतील या स्वच्छ चांदण्यांचा आस्वाद सोडा, चंद्राचे दर्शन देखील दुर्मिळ झाले. कारण संपूर्ण आकाश पावसाच्या ढगांनी व्यापले गेले आणि चंद्र ढगाआड गेला. त्यामुळे शरद पौर्णिमेच्या चंद्राच्या शीतल व स्वच्छ अशा दर्शनाला असंख्य नागरिक मुकले. गेल्या 24 तासांमध्ये गोव्यात सरासरी 1 इंच पावसाची नोंद झाली. यंदाच्या मान्सूनोत्तर पावसाचे प्रमाण सरासरी 65 टक्के अतिरिक्त झाले. एव्हाना 4 इंच पाऊस पडतो त्या ऐवजी यंदा 7 इंच पाऊस आतापर्यंत पडला आहे.
विजांचा कडकडाटासह आजही मुसळधार
हवामान खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार आज दि. 17 रोजी गोव्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर वादळी वारे ताशी 45 कि. मी. पर्यंतच्या वेगाने वाहील, असा इशारा दिला आहे.