संतांचा आग्रह
अंगतपंगत हा भोजनाचा खेळीमेळीचा प्रसंग एकेकाळी खूपच लोकप्रिय होता. सगळ्या मंडळींनी घरातून निरनिराळे पदार्थ तयार करून आणायचे आणि बगिच्यात किंवा कुणाच्यातरी घरी एकत्र बसून त्याचा आस्वाद घ्यायचा. त्यानिमित्ताने दूर राहणाऱ्या मित्रांच्या, आप्तांच्या भेटी होत. ख्यालीखुशाली कळत असे. मुख्य म्हणजे रोजच्या जेवणाशिवाय वेगळे पदार्थ सर्वांना खायला मिळत. केव्हाही, कधीही, कुठेही, कोणतेही पदार्थ विकत मिळण्याचा तो काळ नव्हता. पदार्थ निगुतीने तयार करणाऱ्या गृहिणी घरोघरी होत्या. त्यांच्या हाताला चव होती. त्याबरोबरच आग्रहाची हाताला आवड होती.
आग्रह करून खाऊ घालणारी आणि आग्रहाशिवाय जेवण न जाणारी माणसे कुटुंबात होती. आग्रहामुळे दोन घास पोटात जास्त जातात कारण त्यात प्रेम असते अशी मान्यता समाजात होती. अर्थात त्यात थोडा अहंकारही होता. जेवताना आग्रह केला नाही म्हणून लग्नसमारंभात भर पंगतीत भरल्या ताटावरून उठून जाणारी माणसे एका पिढीने बघितली आहेत. शुभविवाहप्रसंगी वधू-वर पंगतीत फिरून लाडू, जिलेबीचा आग्रह करीत. पाश्चात्य पद्धतीचा शिरकाव संस्कृतीत झाल्यानंतर मात्र स्वरूची भोजन अवतरले आणि आग्रह संपला. शिस्तीत रांग लावा, हवा तो हवा तेवढा पदार्थ ताटात वाढून घ्या आणि उभ्याने एका कोपऱ्यात जागा पटकावून जेवा. ना कुणाचे लक्ष, ना आग्रह. आग्रहाचे दडपण संपले त्याबरोबर भोजनात पदार्थांबरोबर वाढले जाणारे प्रेमरसपूर्ण गोड शब्दही आग्रहासोबत अंतर्धान पावले.
आग्रह या शब्दाला अनेक आयाम आहेत. माझे ऐका, आमचे ऐका व ऐकलेच पाहिजे अशी दमदाटी कानांना करणारे आग्रही बोल आजच्या काळातही कानांवर पडत असतात. लहान मुले जोपर्यंत आई-वडिलांच्या छायेत असतात तोपर्यंत त्यांना पालकांचे ऐकण्यावाचून पर्याय नसतो. वयाचा एक टप्पा ओलांडला की कुणीच कुणाचे ऐकत नाही हा अनुभव आहे. आग्रह गळी उतरायला नको म्हणून एकटे राहणे अनेक जणांना आवडते. त्यामुळे स्वतंत्रतेवर गदा येत नाही. हल्ली एकल कुटुंब निर्माण झाले त्याचे कारणही हेच आहे. आग्रहाचा कानांना त्रास होऊ नये म्हणून एकांतात राहणारी माणसे समाजात दृष्टीस पडतात. त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जगण्याच्या प्रवासात आनंदाच्या आणि प्रकाशाच्या वाटा निर्माण व्हाव्यात म्हणून संतमंडळींचा भगवंताच्या नामस्मरणाचा आग्रह आहे. तो जर कानांवर घेतला तर समस्या उद्भवतच नाहीत. संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे- ‘घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे’. महाराज जिभेला विनवणी करीत आहेत. सलगीने ‘माझे’ असे तिला संबोधित आहेत. ‘आपुलिया बळे नाही बोलावित, सखा कृपावंत वाचा त्याची’ असे म्हणणारे महाराज जिभेला नामाचा गोड आग्रह करीत आहेत. डोळ्यांनाही आग्रह आहे तो विठोबाच्या मुखाचे सुख घेण्याचा. परंतु कानांना केलेला आग्रह काही औरच आहे. ‘तुम्ही आईका रे कान, माझ्या विठोबाचे गुण.’ इथे तुकाराम महाराज इंद्रियावेगळे कुणीतरी निराळे म्हणजे अर्थात एकदम विठोबाचेच होऊन गेले. साक्षीभावाने ते कानांना माझ्या विठोबाचे गुण ऐका असे म्हणतात.
कान्होबाच्या मुरलीचे वेड असणाऱ्या गौळणीच्या रचना सुमधुर आहेत. एक गौळण म्हणते की माझ्या अंगणात मी रोज चिखल करून ठेवते. कृष्णाच्या मुरलीचा स्वर कानांवर पडला की वाटेवर जर चिखल असला तरी रोजच्या सवयीने मी तो सहज तुडवीत जाईन. तर दुसरी गौळण म्हणते, मी माझ्या दारात काटे, दगडधोंडे पसरवून ठेवते. म्हणजे मुरलीचा स्वर ऐकताच कान्हाकडे धावत जाताना रस्त्यावरचे अडथळे मी सहज पार करीन. संत एकनाथ महाराजांची गौळण अनोखी विनंती कृष्णाला करते. ती म्हणते, ‘नको वाजवू श्रीहरी मुरली रे, तुझ्या मुरलीने सुधबुध हरली रे..’ तुझ्या बासरीचे स्वर कानावर पडले की मीपण संपून जाते. माझे भान हरपून जाते. तू सांग, संसार कसा रे करायचा? ती म्हणते, ‘घरी करीत होते मी कामधंदा तेथे मी गडबडली रे..’ घागर घेऊन पाण्याला गेले तर डोक्यावरची घागर पाझरली. संत एकनाथ महाराज म्हणतात, ‘एका जनार्दनी गौळण राधा, राधा गौळण बावरली..’ कानांच्या वतीने केलेला हा राधेचा लटका आग्रह भक्ती, प्रेम वाढवतो.
‘बुडती हे जन न देखवे डोळा’ ही संतांची धडपड आहे. कलियुगात भगवंताचे गोड नामस्मरण ही मोक्षसुखाकडे जाणारी वाट आहे असे सांगून संतमंडळींनी नामाचा आग्रह धरला आहे. संत ज्ञानेश्वर माऊली हरिपाठामध्ये हरीचे चिंतन सर्वकाळ करा असे म्हणत ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधलिया’ असे सांगून आश्वस्त करतात. देवाचे द्वार म्हणजे नाम. माऊली पुढे म्हणतात, ‘त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ.’ नामस्मरणाशिवाय तीर्थयात्रा, तिथे त्रिवेणी संगमी स्नान सारे व्यर्थ आहे. ‘हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षणमात्रे.’ ज्याप्रमाणे अग्नीमध्ये गवत क्षणात जळून जाते त्याप्रमाणे हरी या नामोच्चाराने पापे नष्ट होतात. ‘हरी हरी मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष’ अशी ग्वाही माऊली देतात. ‘अंतकाळी तैसा संकटाचे वेळी, हरी तया सांभाळी अंतर्बाह्य.’ स्थूल देह सोडताना संकटकाळी हरी फक्त धावून येईल हे सांगून माऊली आग्रह धरतात- ‘हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी..’
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना नामावतार म्हणतात. महाराजांनी भक्तांजवळ श्रीरामनामाचा आग्रह धरला. महाराज म्हणत, ‘मला कळत नाही असे ज्याला कळले, त्याला सगळे कळले.’ महाराजांच्या भक्तांनी त्यांना एकदा विचारले, महाराज आत्मज्ञान म्हणतात ते काय आहे? महाराज म्हणाले, मी कोण आहे हे ज्याला आठवत नाही, तरी मी तो आहे, याचे नाव आत्मज्ञान. खोटा मी जाऊन खरा मी ची प्रचिती फक्त नामस्मरणाने येते. महाराजांचा भक्तांना नामस्मरणाचा आग्रह एवढा पराकोटीचा होता की महाराज एकदा म्हणाले, ‘ज्याच्या मुखात नाम आहे त्याच्या दारात मी कुत्र्यासारखा लोळत पडतो.’ यापलीकडे काय सांगावे?
संत तुकाराम महाराजांचे विठ्ठलाकडे मागणे आहे ‘हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा.’ त्यात ते धनसंपदा नको, मुक्ती सुद्धा नको असे म्हणतात. विठ्ठलाकडे ते आग्रहाने काय मागतात तर ‘संतसंग’. संतांचा संग म्हणजे निरंतर नामस्मरण. शेवटी महाराज म्हणतात, ‘तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी.’ विठ्ठला, तुझे गोड नाम निराकारातून आकारात येताना गर्भातच कानी पडावे अशी इच्छा आहे. महाराज विठ्ठलाच्या गोड नामापुढे गर्भवासाचे दु:ख त्रासाचे नाही असे म्हणतात.
समर्थ रामदास स्वामींनी ‘जन्म दु:खाचा अंकुर’ असे जरी म्हटले तरी देहमान्य निरूपणात दासबोधात सांगितले आहे की ‘नरदेह महत्त्वाचा आहे.’ देहेवीण देव कैसा भजावा, देहेवीण देव कैसा पुजावा? या नरदेहामुळे मुक्तीचा मार्ग गवसतो. समर्थ रामदास स्वामींचे शिष्य उद्धव चिद् घन यांचे एक पद आहे- ‘ज्याचे वंशी कुळधर्म रामसेवा, त्याचे वंशी मज जन्म देगा देवा..’ श्रीरामा तुझ्या नामाची परंपरा ज्याच्या वंशात आहे तिथेच मला पुढचा जन्म दे. ते म्हणतात, ‘वारंवार ही विनंती आयकावी, दयासिंधू ही सर्व सिद्धी द्यावी’.. विनंतीपूर्वक ते श्रीरामांना हा आग्रह करतात. ज्यांच्या मुखात श्री रामनाम आहे त्यांची संगती घडू दे हे सांगताना ते म्हणतात, ‘ज्याची वाणी रंगली रामनामी, त्याची माझी संगती घडो स्वामी.’ शेवटी ते सद्गुरूंचा सहवास श्रीरामांना मागतात. ‘म्हणे उद्धव चिद् घन महाराजा, रामदासाचा संग घडो माझा.’ समर्थांच्या सहवासात राहणे म्हणजेच श्रीरामांजवळ वास करणे. म्हणून हा आग्रह भावतो.
कोणत्याही समारंभाचे निमंत्रण असो, त्यात आग्रह असतो. दुर्लभ असा मनुष्यजन्म म्हणजे जगण्याचा उत्सवच आहे. त्या उत्सवात अखंड हरिनाम घ्या, असे आग्रही निमंत्रण संतांचे आहे. या आग्रहाचा स्वीकार करून नामस्मरणात माणसाचे मन रमले तर जन्माचे सार्थक आहे.
- स्नेहा शिनखेडे