Miraj Crime : मिरजेत सराईत गुन्हेगारांचा कुटुंबावर हल्ला
भाऊराव पाटील चौक परिसरात महिलेसह मारहाण
मिरज : शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील चौक येथे एका इमारतीसमोर असलेल्या कॉफीशॉपची पाण्याची टाकी हटविल्याच्या कारणातून सराईत गुन्हेगार पिट्या भोरेसह चौघांनी दहशत माजवित राडा केला. इमारतीत राहणाऱ्या कुटुंबियांना अॅट्रॉसिटीची धमकी देऊन महिलेसह तिघांना मारहाण केली. तसेच चारचाकीवर दगडफेक करुनफोडाफोडी करत दहशत माजवली.
याबाबत गादी व्यवसायिक रोनक चेतन ठक्कर यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयीत प्रथमेश तांदळे, पिट्या भोरे मुकेश तांदळे आणि ध्रुव भोरे अशा चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. भाऊराव पाटील चौक येथे एका इंग्लिश मिडीयम शाळेलगत हेरवाडकर प्लाझा अपार्टमेंटमध्ये गादी व्यवसायिक रोनक ठक्कर हे कुटुंबियांसह राहण्यास आहेत.त्यांच्या इमारती खालील एका गाळ्यात चिट्टा किचन नावाने कॉफीशॉप आहे. सदर कॉफी शॉपबाहेर पाण्याची टाकी होती. सदर टाकी येण्या-जाण्यास अडथळा ठरत असल्याने ठक्कर यांनी कॉफीशॉप चालकाला सांगून पाण्याची टाकी दुसरीकडे ठेवली होती.
मात्र, पाण्याची टाकी इतरत्र हलविल्यामुळे संशयीत प्रथमेश तांदळेसह त्याचे साथीदार व सराईत गुन्हेगार पिट्या भोरे, मुकेश तांदळे व
ध्रुव तांदळे यांना राग आला. संबंधीत संशयीतांनी संगनमत करत रात्री ठक्कर यांच्यासोबत भांडण काढले. यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या ठक्कर यांच्या पत्नीला ढकलून दिले. यामध्ये त्या जखमी झाल्या. त्यानंतर रोनक ठक्कर यांना दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या रोनक ठक्कर यांच्या भावालाही मारहाण करुन परिसरात दहशत माजवली.