राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा बसविण्याकडे नैर्त्रुत्य रेल्वेचे अक्षम्य दुर्लक्ष
त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी
बेळगाव : बेळगाव रेल्वेस्थानकावर मागील वर्षभरापासून छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा प्रवेशद्वारासमोर ठेवण्यात आल्या आहेत. देशाचे आराध्य दैवत असतानाही रेल्वेकडून प्रतिमा बसविण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. तसेच या प्रतिमांना आता तडे जाऊ लागले आहेत. त्यामुळे नैर्त्रुत्य रेल्वेने या प्रकाराची गंभीर दखल घेत या प्रतिमा त्वरित बसवाव्यात, अशी मागणी म. ए. युवा समितीच्यावतीने नैर्त्रुत्य रेल्वेकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. बेळगावात घडलेल्या इतिहासातील घटना तसेच बेळगावमध्ये आलेल्या व्यक्तींच्या प्रतिमा येथील रेल्वेस्थानकावर बसविण्यात आल्या. परंतु, छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा अडगळीत ठेवल्या होत्या. शिवप्रेमी व भीमप्रेमींनी या प्रतिमा बाहेर काढून मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारी उभ्या केल्या. काही दिवसात या प्रतिमा बसविल्या जातील, असे आश्वासन नैर्त्रुत्य रेल्वेकडून दिले होते. परंतु, उद्घाटनाला वर्ष उलटले तरी अद्याप या प्रतिमा बसविल्या नाहीत.
प्रतिमा न बसवल्यास आंदोलन
शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांचे देशाप्रतीचे कार्य मोठे आहे. याची दखल घेत नैर्त्रुत्य रेल्वेने प्रतिमा बसवाव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशारा युवा समितीच्यावतीने देण्यात आला आहे. युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी नैर्त्रुत्य रेल्वेला पत्र पाठविले आहे.