भारतीय युवा संघांचा सलग दुसरा विजय
सामनावीर सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजी, किशन सिंगचे 4 बळी, रोलेसचे शतक वाया
वृत्तसंस्था / बेनोनी
कर्णधार व सामनावीर वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर भारतीय युवा क्रिकेट संघाने द. आफ्रिकेच्या दौऱ्यावर सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली. सोमवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय युवा संघाने द. आफ्रिकेचा डकवर्थ-लेव्हीस नियमाच्या आधारे 8 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने केवळ 24 चेंडूत 10 षटकार आणि 1 चौकारांसह 68 धावांची तुफानी खेळी केली.
या दुसऱ्या सामन्यात द. आफ्रिकेच्या युवा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. द. आफ्रिका संघाचा डाव 49.3 षटकांत 245 धावांत आटोपला. जेसन रोलेसने 113 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकारांसह 114 धावा झळकविल्या. बोसमनने 63 चेंडूत 1 चौकारांसह 31, अदनान लॅगेडीयनने 24 चेंडूत 4 चौकारांसह 25, स्केलविकने 1 चौकारासह 10, कर्णधार बुलबुलीयाने 3 चौकारांसह 14 धावा जमविल्या. भारतीय युवा संघातर्फे किशन सिंगने 46 धावांत 4 तर अंबरीशने 47 धावांत 2, दिपेश देवेंद्रन, कनिष्क चौहान आणि खिलान पटेल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
या सामन्यात द. आफ्रिकेचा डाव संमल्यानंतर पावसाचा अडथळा आल्याने बराच वेळ वाया गेला. त्यामुळे पंचांनी भारतीय युवा संघाला आधी 42 षटकांत 230 धावांचे नवे उद्दिष्ट दिले होते. काही षटकांचा खेळ झाल्यानंतर पुन्हा पावसास सुरुवात झाली. खेळ पुन्हा सुरू झाल्यावर भारताला 27 षटकांत 174 धावांचे विजयासाठी दुसरे नवे उद्दिष्ट दिले. भारतीय युवा संघाने 23.3 षटकांत 2 बाद 176 धावा जमवित हा सामना 8 गड्यांनी जिंकला.
भारताच्या डावाला अॅरोन जॉर्ज आणि कर्णधार सूर्यवंशी यांनी दमदार प्रारंभ केला. या जोडीने 37 चेंडूत 67 धावांची भागिदारी केली. जॉर्जने 19 चेंडूत 3 चौकारांसह 20 धावा जमविल्या. भारताचा डाव सुरू असताना पहिल्यांदा पुन्हा खराब हवामानामुळे खेळ थांबवावा लागला. त्यावेळी भारताने 12.5 षटकांत 2 बाद 115 धावा जमविल्या होत्या. तत्पूर्वी पंचांनी भारताला 42 षटकांत 230 धावांचे पहिले उद्दिष्ट दिले होते. पाऊस थांबल्यानंतर पुन्हा खेळाला पुढे प्रारंभ झाला.
वैभवचा धडाका
वैभव सूर्यवंशीने आक्रमक फटकेबाजी केली. त्याने 24 चेंडूत 10 षटकार आणि 1 चौकारासह 68 धावा झोडपल्या. सूर्यवंशीने केवळ 19 चेंडूत 8 षटकारासह अर्धशतक झळकविले. भारताच्या 100 धावा केवळ 52 चेंडूत फलकावर लागल्या. व्रुसकॅम्पने पहिल्यांदा जॉर्जला तर त्यानंतर सूर्यवंशीला झेलबाद केले. वैभव बाद झाला. त्यावेळी भारताची स्थिती 8.1 षटकांत 2 बाद 95 अशी होती.
वेदांत त्रिवेदी आणि अभिज्ञान कुंडू यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण करताना तिसऱ्या गड्यासाठी 15.2 षटकांत अभेद्य 81 धावांची भागिदारी केली. त्रिवेदीने 57 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 31 तर कुंडूने 42 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 48 धावा झोडपल्या. 23.3 षटकांत भारताने 2 बाद 176 धावा जमवित सामना जिंकला. द. आफ्रिकेतर्फे व्रुसकॅम्पने 23 धावांत 2 गडी बाद केले.
द. आफ्रिका : 49.3 षटकांत सर्वबाद 245 (रोलेस 114, बोसमन 31, लॅगेडीयन 25, स्केलविक 10, बुलबुलीया 14, मॅनेक 16, अवांतर 14, किशन सिंग 4-46, अंबरीश 2-47, देवेंद्रन, चौहान, खिलन पटेल प्रत्येकी 1 बळी), भारत (27 षटकांत 174 धावांचे उद्दिष्ट), 23.3 षटकांत 2 बाद 176 (वैभव सूर्यवंशी 68, कुंडू नाबाद 48, त्रिवेदी नाबाद 31, जॉर्ज 20, अवांतर 9, व्रुसकॅम्प, 2-23).