भारतीय युवा संघाचा दक्षिण आफ्रिकेवर विजय
हरवंश पांगलिया, अंबरिश यांची दमदार अर्धशतके
वृत्तसंस्था/ बेनोनी
हरवंश पांगलिया आणि आर. एस. अंबरिश यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय युवा क्रिकेट संघाने यजमान दक्षिण आफ्रिकेचा डकवर्थ-लेविस नियमाच्या आधारे 25 धावांनी पराभव करत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळविली.
या सामन्यात दक्षिण आफ्रिका युवा संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताचा डाव 50 षटकात 301 धावांत आटोपला. त्यानंतर पावसाचा अडथळा आल्याने बराच वेळ खेळ वाया गेला. पाऊस थांबल्यानंतर पंचांनी खेळाला पुढे सुरुवात केली आणि दक्षिण आफ्रिकेला 27.4 षटकात 174 धावांचे नवे उद्दिष्ट दिले. दक्षिण आफ्रिका युवा संघाने 27.4 षटकात 4 बाद 148 धावा जमविल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला.
भारतीय युवा संघाच्या डावामध्ये सलामीचा अॅरॉन जॉर्ज, कर्णधार वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी आणि अभिज्ञान कुंडू हे चार फलंदाज केवळ 67 धावांत तंबूत परतले. त्रिवेदीने 4 चौकारांसह 21 तर कुंडूने 3 चौकारांसह 21 धावा केल्या. सूर्यवंशीने 2 चौकारांसह 11 आणि जॉर्जने 5 धावा जमविल्या. हरवंश पांगलिया आणि अंबरिश यांनी संघाचा डाव सावरताना 5 व्या गड्यासाठी 137 धावांची शतकी भागिदारी केली. अंबरिशने 79 चेंडूत 7 चौकारासह 65 धावा जमविल्या. तो बाद झाल्यानंतर पांगलिया आणि चौहान या जोडीने 6 व्या गड्यासाठी 58 धावांची भर घातली. पांगलियाने 95 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह 93 धावा झळकाविल्या. चौहानने 23 चेंडूत 3 चौकारांसह 32 धावा केल्या. खिलन पटेलने केवळ 12 चेंडूत 3 षटकारांसह 32 धावा झोडपल्याने भारतीय युवा संघाला 300 धावांचा टप्पा ओलांडता आला. भारताच्या डावामध्ये 3 फलंदाज धावचीत झाले. दक्षिण आफ्रिकेतर्फे बॅसनने 54 धावांत 4 तर माजोला, सोनी आणि एम्बेथा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेच्या डावाला सावध सुरुवात झाली. सलामीच्या लॅगेडिएन आणि स्केव्हिक या जोडीने 35 धावांची भागिदारी केली. दीपेशने लॅगेडेनला झेलबाद केले. त्याने 4 चौकारांसह 19 धावा केल्या. कर्णधार मोहम्मद बुलबुलिया केवळ 5 धावांवर दीपेशच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. रोलेसने 13 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 16 धावा जमविल्या. खिलन पटेलने त्याला झेलबाद केले. स्केव्हिक आणि मॅनेक या जोडीने चौथ्या गड्यासाठी 86 धावांची भर घातली. मॅनेक धावचीत झाला. त्याने 59 चेंडूत 4 चौकारांसह 46 धावा केल्या. स्केव्हिकने 72 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 60 धावा झळकाविल्या. भारतातर्फे दीपेश देवेंद्रनने 2 तर खिलन पटेलने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक - भारत 50 षटकात सर्वबाद 301 (पांगलिया 93, अंबरिश 65, चौहान 32, खिलन पटेल 26, त्रिवेदी 21, कुंडू 21, अवांतर 17, बॅसन 4-54, माजोला, सोनी आणि एम्बेथा प्रत्येकी 1 बळी), दक्षिण आफ्रिका (27.4 षटकात 174 धावांचे नवे उद्दिष्ट) 27.4 षटकात 4 बाद 148 (स्केव्हिक नाबाद 60, लॅगेडिएन 19, बुलबुलिया 5, रोलेस 16, मॅनेक 46, दीपेश देवेंद्रन 2-33, खिलन पटेल 1-14).