भारतीय महिला अंध संघ विश्वविजेता
वृत्तसंस्था/ कोलंबो
पहिल्यांदाच आयोजित केलेल्या अंध महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघाने अजिंक्यपद पटकाविताना अंतिम सामन्यात नेपाळचा 7 गड्यांनी पराभव केला.
येथे खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नेपाळने 20 षटकात 5 बाद 114 धावा जमविल्या. त्यानंतर भारताने 12 षटकात 3 बाद 117 धावा जमवित विजेतेपद हस्तगत केले. या सामन्यात भारतीय संघातील गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी केली. तसेच त्यांचे क्षेत्ररक्षणही दर्जेदार झाल्याने नेपाळला डावामध्ये केवळ एकच चौकार नोंदविता आला. या स्पर्धेत शनिवारी झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात नेपाळने पाकिस्तानचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. तर या स्पर्धेचे सहयजमान लंकन संघाला केवळ एक सामना जिंकता आला. प्राथमिक फेरीतील पाच पैकी चार सामने लंकेने गमाविले तर एका सामन्यात त्यांनी अमेरिकेचा पराभव केला. या स्पर्धेत एकूण 6 संघांचा समावेश होता. अंतिम सामन्यात भारताच्या डावामध्ये फुला सरीनने सर्वाधिक म्हणजे नाबाद 44 धावा झळकाविल्या. भारतीय महिला संघाने उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन अंतिम फेरी गाठली होती. या स्पर्धेमध्ये पाक संघातील फलंदाज मेहरीन अलीने सर्वाधिक धावा म्हणजे 600 धावा जमविल्या. तिने लंकेविरुद्ध 78 चेंडूत 230 तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 133 धावा जमविल्या.
संक्षिप्त धावफलक - नेपाळ 20 षटकात 5 बाद 114, भारत 12 षटकात 3 बाद 117 (फुला सरीन नाबाद 44).