For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंडिया आघाडीचे शीड हेलकावू लागले

06:04 AM Jan 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
इंडिया आघाडीचे शीड हेलकावू लागले
Advertisement

2025 च्या उदरात दडले आहे तरी काय? या प्रश्नाचे उत्तर जसजसे नवे वर्ष सरेल तसे मिळत जाणार आहे. राजकीय पटलावर हे वर्ष बरेच रंजक राहणार आहे. संघ आणि भाजपमध्ये सुप्त संघर्ष सुरु झालेला आहे काय याबाबत उलटसुलट वृत्ते आहेत. ज्याप्रकारे साक्षात सरसंघचालकांच्या वक्तव्यावर जो वाद उठला आहे तो अभूतपूर्व ठरणार की काय ते पुढील घडामोडींवर दिसून येणार आहे. जवळ जवळ एक वर्ष उलटत आले तरी भाजपला अजूनही नवा अध्यक्ष निवडता आलेला नाही. या प्रश्नावर साऱ्यांची ‘अळी मिळी गुप चिळी’ असल्याने आत काहीतरी खदखदत आहे असे समजायला वाव आहे.

Advertisement

असे असले तरी एन चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे सध्यातरी भाजपचे भरवशाचे गडी दिसत आहेत. थोडक्यात काय तर नवीन वर्षात ‘मोदी हैं तो मुमकिन हैं’ च्या घोषणा परत ऐकायला मिळाल्या तर आश्चर्य वाटायला नको. दिल्ली निवडणुकात भाजप अरविंद केजरीवाल यांना घरी पाठवणार काय? यावरून बरेच काही ठरणार आहे. विरोधकांना नवीन वर्ष कितपत धार्जिणे जाणार हा लाखमोलाचा सवाल आहे. त्यांच्या मनाप्रमाणे काहीच घडत नाही आहे. विरोधकांची प्रकृती तोळामासा झालेली आहे. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे विरोधकांची इंडिया आघाडी कोसळणार काय? या प्रश्नाला नकारार्थी उत्तर देणे सध्यातरी धारिष्ट्याचे ठरेल.  एका तुफानी वादळात विरोधकांचे हे जहाज सापडले आहे आणि त्यात त्याला आज ना उद्या जलसमाधी मिळणार अशीच काहीशी परिस्थिती आहे. वादळ कमी होण्याची चिन्हे नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या नंतर लाटेवर आरुढ झालेले हे विरोधकांचे जहाज हरियाणा आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे पानिपत झाल्याने हेलकावे खाऊ लागले आहे. या वादळातच आलेल्या तुफानी पावसाने जहाजाची शंभरी भरली आहे असे वाटत आहे. ‘सारेच दीप मंदावले आता, ज्योती विझू लागल्या’, असे काहीसे चित्र विरोधी गोटात आहे.

बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी ही फार जुनी म्हण आहे. इंडिया आघाडीला केंद्रात सत्ता मिळेल असे दूरदूर कोणतेच चिन्ह नाही. तरीही नेतृत्वाच्या प्रश्नावर आत्ताच खडाजंगी सुरु झाली आहे. काहीही करून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला अपशकुन करावयाचा एककलमी कार्यक्रम मित्रपक्षांनी आखला आहे. काँग्रेसदेखील मित्रपक्षांना बरोबर घेण्यात कमी पडत आहे असे चित्र दिसत आहे. इंडिया आघाडीचे इवलेसे रोप वाढवण्यासाठी कोणीच मशागत करताना दिसत नाही आहे. इंडिया आघाडीतील हालहवाल म्हणजे काँग्रेसला खाली खेचण्याचा कार्यक्रम सुरु झाला आहे. यशाचे मालक सारे असतात, अपयशाचा कोणीच वाली नसतो. काँग्रेसचे लोढणे गळ्यात बाळगून आपली ताकद त्याला कशाला द्यायची असा व्यवहारी दृष्टिकोन गैरकाँग्रेसी पक्ष बाळगत आहेत. काँग्रेसकडून आपल्याला ताकद मिळत नाही आहे उलट आपलीच ताकद त्याच्याकरिता खर्च होत आहे असा त्यांचा समज आहे. जेव्हा 7-8 महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 99 जागा मिळाल्या तेव्हा तो विरोधी पक्षांचा मुकुटमणी बनला. आता अपयशाचा धनी झालेला काँग्रेस विरोधकांच्या कळपात कोणाला नकोसा झालेला आहे. ‘दु:ख के दिन अब बीतत् नाही’ असे रडगाणे त्याच्या नशिबी आलेले आहे. राजकारणात रावाचा रंक व्हायला वेळ लागत नाही. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 543 पैकी अवघ्या दोन जागा मिळाल्या होत्या. जर एखाद्या घटनेने राजकारणात त्सुनामी आली तर होत्याचे नव्हते कसे होते काही कळत नाही.

Advertisement

महाराष्ट्रात फार वेगळी स्थिती नाही आहे. कालपरवापर्यंत दिमाखाने वावरणाऱ्या महाविकास आघाडीचे हाल आता कुत्रे खात नाही आहे. कालपर्यंत डरकाळ्या फोडणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कांडात काढण्याची योजना भाजप आखत आहे. शरद पवार हेच आमचे दैवत असे पालुपद लावून अजित पवारांचा पक्ष आघाडीत गोंधळ माजवून देत आहेत. 84 वर्षाच्या शरदरावांच्या मनातील काही कळत नाही आहे. ते हिमनगासारखे आहेत. वरून फारच कमी दिसतात. काँग्रेसला घरघर कशी लागली हे त्या पक्षालाच कळेनासे झाले आहे. कालपरवापर्यंत तालेवार समजले जाणारे अशोक गेहलोत, भूपेश बघेल यांच्यासारख्या नेत्यांना महाराष्ट्रात ठेवूनही असे कसे घडले याबाबत राहुलच हक्केबक्के झालेले आहेत. नाना पटोलेंसारखा प्रदेशाध्यक्ष झाला तर पक्षाचे बारा वाजणारच असे काहींचे स्पष्ट मत आहे. जहाजाचा कॅप्टन कोण असावा? या प्रश्नावर इंडिया आघाडीचा कपाळमोक्ष होणार काय?. या जहाजाला ‘टायटॅनिक’ नाव दिले तर अतिशयोक्ती होणार नाही असे काहींचे म्हणणे. त्या अतिप्रचंड आणि अत्याधुनिक जहाजाप्रमाणेच इंडिया आघाडी मोठ्या धडाक्यात आणि वाजतगाजत सुरु झाली होती. राजकारणाच्या महासागरात दडी धरून असलेले महत्त्वाकांक्षेचे हिमनग त्याला बुडवणार काय? या प्रश्नाचे उत्तर येत्या वर्षात मिळणार आहे. प्रत्यक्ष नसले तरी मनाने या आघाडीतील घटकपक्ष दूर गेले असे दिसत आहे. राष्ट्रीय दृष्टी असलेला काँग्रेस हा एकमेव पक्ष त्यांच्यातील दुआ होऊ शकतो असे दिसत असताना त्यालाच आघाडीतून काढायची बात चालली आहे.

आत्याबाईला मिशा असत्या तर तिला काका म्हटले असते या उक्तीप्रमाणे जर काँग्रेस हरियाणा हारली नसती तर 2025ची सुरुवात वेगळीच झाली असती असे पक्षसमर्थक म्हणत आहेत. भाजपला अनपेक्षितपणे मिळालेल्या उभारीने त्यांच्या पोटात गोळा आलेला आहे. सब कुछ लूटाके होश में आये तो क्या हुआ? असे टोमणे सत्ताधारी मारत आहेत. सत्तेचं गणितच असे असते तिथे कोणी कोणाचा नसतो. प्रत्येकाचे स्वार्थ असतात आणि त्याला तत्वांचा मुलामा देत प्रत्येकजण आपले घोडे पुढे दामटत असतो. तात्पर्य काय तर आजच्यासारखी स्थिती राहिली तर ब्रह्मदेव देखील या आघाडीला वाचवू शकत नाहीत. या आघाडीचे बारा वाजणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकरता शुभसंदेश आहे. विरोधक लेचेपेचे झाले की सत्ताधाऱ्यांचे फावते हा प्रकृतीचा नियम आहे. पण परिस्थिती नेहमी एकसारखी राहात नसते. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी व्हिएतनामला गेलेले राहुल गांधी तेथील लोकांनी 50 वर्षांपूर्वी सर्वात सामर्थ्यवान अशा अमेरिकेला आपल्या गनिमी काव्याने शरणागती पत्करणे भाग पाडले होते. अमेरिकेला युद्ध सोडून मायदेशी परतणे भाग पाडले होते, त्यातून काय बोध घेतात त्यावर बरंच काही अवलंबून आहे.

चीनी कॅलेंडरच्या अनुसार 2025 हे सर्प वर्ष आहे. हे वर्ष महत्त्वाचे मानले जाते याला कारण साप जसा कात टाकून स्वत:ला नवजीवन देतो तसे माणसे आणि संघटनादेखील या वर्षात करू शकतात असे म्हणतात. हे किती बरोबर अथवा चूक हे भारतातील विरोधकांच्या बाबत काय घडते त्यावरून दिसून येणार आहे. सगळे हेवेदावे दूर सारून विरोधकांनी जर कात टाकली आणि भाजपला सळो की पळो करण्याचे राजकारण सुरु केले तर ते जगातील सातवे आश्चर्य ठरणार आहे.  आजच्या घडीला ‘ये रे माझ्या मागल्या’ असेच गैर-भाजप पक्षांमधील चित्र दिसत आहे. उद्याच्या उदरात काय दडले आहे? ते काळालाच केवळ माहित. नवीन वर्षात मोदींच्या चेहऱ्यावर परत चकाकी आली आहे हे नक्की.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :

.