निज्जर हत्येमागे भारत सरकारचा हात नाही
कॅनडाने दिली कबुली : माजी पंतप्रधान ट्रुडो यांनी केला होता खोटा दावा
वृत्तसंस्था/ ओटावा
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येमागे भारताची भूमिका नसल्याचे कॅनडाने मान्य केले आहे. चौकशीत भारतीय अधिकारी या हत्याप्रकरणात सामील असल्याचा कुठलाच पुरावा मिळाला नसल्याचे कॅनडाच्या पोलिसांनी जाहीर केले आहे. 2023 साली निज्जरच्या हत्येनंतर कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारत सरकारचे अधिकारी या हत्याप्रकरणात सामील असल्याचा दावा संसदेत बोलताना केला होता. कॅनडाच्या या आरोपांमुळे दोन्ही देशांचे संबंध तणावपूर्ण झाले होते. कॅनडाच्या पोलिसांनी आता निज्जरच्या हत्येत भारताची भूमिका नसल्याचा निर्वाळा दिला आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डीर बराडवर निज्जरला ठार करण्याचा कट रचल्याचा आरोप अमेरिकेने केला असताना कॅनडा पोलिसांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
निज्जर हत्याप्रकरणाच्या चौकशीदरम्यान भारतीय अधिकारी यात सामील असल्याचे पुरावे मिळाले नाहीत. भारत सरकारला या प्रकरणाशी जोडणारी कुठलीच बाब समोर आलेली नाही असे कॅनडा पोलीस विभागाच्या उपायुक्त लिसा मोरलँड यांनी सांगितले आहे.
कॅनडा-अमेरिकेचे संयुक्त अभियान
अमेरिकेची एफबीआय आणि कॅनडा पोलिसांनी संयुक्त अभियानात भारतीय पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांच्या 24 सदस्यांना अटक केली आहे. ऑपरेशन हार्ड बॉल अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईनंतर रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी (आरसीएमपी) पत्रकार परिषद घेतली आहे. निज्जर हत्या प्रकरणाच्या चौकशीत भारतीय अधिकाऱ्यांवर कुठलाही आरोप झालेला नाही तसेच त्यांचा या प्रकरणात हात असल्याचा कुठलाच पुरावा मिळाला नसल्याचे आरसीएमपीकडून सांगण्यात आले.
संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या विरोधात मोठी कारवाई आणि आरोप निश्चित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. आरसीएमपीने एफबीआयसोबत मिळून लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी बराड, रविंदर ढांडा आणि जग्गू भगवानपुरिया यांच्या गुन्हेगारी नेटवर्कला लक्ष्य केले आहे. या टोळ्यांवर खंडणीवसुली, अमली पदार्थांची तस्करी, अपहरण आणि हिंसक गुन्ह्यांचे आरोप आहेत.
लॉरेन्स बिश्नोईचा हात
निज्जरच्या हत्येसाठी तुरुंगात कैद कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नाई जबाबदार असल्याचा दावा अमेरिकेच्या न्याय विभागाने अलिकडेच उघड केलेल्या दस्तऐवजांमध्ये करण्यात आला आहे. पंजाबचा रहिवासी असलेला 33 वर्षीय बिश्नोई दीर्घकाळापासून भारतातील तुरुंगात कैद आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने बिश्नोईसोबत त्याच्या नेटवर्कचा अमेरिकेतील म्होरक्या सतिंदरजीत सिंह उर्फ गोल्डी बराड (32 वर्षे), युरोपीय म्होरक्या रोहित गोदारा (37 वर्षे) आणि सुखराज सिंह कंग (58 वर्षे) यांनाही याप्रकरणी आरोपी केले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाई
अमेरिका, कॅनडा आणि युरोपच्या कायदा अंमलबजावणी संस्थांनी भारताशी संबंधित तीन गुन्हेगारी टोळ्यांच्या 24 सदस्यांना अटक केली आहे. यातील 11 जणांना कॅलिफोर्नियामध्ये, 3 कॅनडामध्ये, एकाला स्पेनमध्sय, एक जण इंडियानामध्ये आणि एकाला जॉर्जिया येथे ताब्यात घेण्यात आले आहे. एकूण 37 जणांवर आरोप निश्चित करण्यात आले असून यातील 7 जण पूर्वीपासूनच कोठडीत होते. पोलीस अद्याप 10 फरार आरोपींचा शोध घेत आहेत. यातील 7 जण अमेरिकेत, 2 भारतात आणि एक युरोपमध्ये आहे. तपास यंत्रणांनी हार्ड बॉल ऑपरेशन अंतर्गत सुमारे 1 हजार किलो कोकेन, एक किलो हेरॉइन, 40 हजार डॉलर्स रोख आणि शस्त्रास्त्रs हस्तगत केली आहेत.
भारतातील पोलीस अधिकाऱ्यावर अमेरिकेचा आरोप
भारतातील एका पोलीस प्रमुखाने लॉस एंजिलिसच्या एका परिवाराकडून 4 लाख डॉलर्सची खंडणी मागितली होती. पोलीस अधिकाऱ्याने परिवाराच्या भारतात राहणाऱ्या एका नातेवाईकावर हत्येचा खोटा गुन्हा नोंदविण्याची धमकी दिली होती असा दावा अमेरिकेच्या यंत्रणेकडून करण्यात आला आहे. गुरिंदरजीत सिंह असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून त्याने पीडित, त्याचे पिता आणि बहिणीवर भारतात हत्येचा कट रचल्याचा खोटा आरोप ठेवला होता. संबंधित पोलीस अधिकाऱ्याने खंडणी वसूल केली असून सध्या तो फरार आहे. अटकेनंतर त्याला अमेरिकेत प्रत्यार्पित केले जावे असे यूएस अॅटर्नी ऑफिसचे फर्स्ट असिस्टंट एसेली यांनी म्हटले आहे.