For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय निवडणूक व्यवस्था अनुकरणीय

06:55 AM Aug 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय निवडणूक व्यवस्था अनुकरणीय
Advertisement

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप यांनी केली तोंड भरुन स्तुती

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन डीसी

भारताची निवडणूक व्यवस्था योग्य असून ती अनुकरणीय आहे, अशी प्रशंसा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा उल्लेखही केला आहे. भारतात मतदारांना परिचय पत्र दिले जाते. त्यामुळे बनावट मतदान मोठ्या प्रमाणात टाळले जाऊ शकते. अमेरिकेतही मतदार परिचयपत्र असण्याची आवश्यकता आहे. ही सुधारणा आमच्याकडे झाली पाहिजे, असे प्रतिपादन डोनाल्ड ट्रंप यांनी केले आहे.

Advertisement

अमेरिकेत मतदार परिचयपत्राशिवायच निवडणुका कशा होतात, असा प्रश्न भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केला काही दिवसांपूर्वी केला होता. डोनाल्ड ट्रंप यांनी या प्रश्नाचा उल्लेख आपल्या वक्तव्यात केला आहे. भारताप्रमाणे अमेरिकेतही मतदारांना ओळखपत्रे देण्यात आली पाहिजेत. त्याशिवाय खरे मतदार कोण हे ओळखता येणार नाही, अशी भूमिका ट्रंप यांनी मांडली आहे.

भारतात वाद

ट्रंप यांच्या विधानावरुन भारतात राजकीय वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने ट्रंप यांच्या विधानावर टीका केली. ज्ञानेश कुमार यांचे एव्हढे कौतुक ट्रंप यांना असेल, तरी त्यांनी कुमार यांना अमेरिकेत न्यावे. भारतात मतपत्रिकेवर निवडणुका होण्याची आवश्यकता आहे, असे काँग्रेसने दिलेल्या प्रतिक्रियेत स्पष्ट केले गेले.

भारताकडून अमेरिकेला प्रेरणा

भारताची निवडणूक व्यवस्था उत्तम असल्याचे विधान अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप यांनी करणे, ही महत्वपूर्ण घटना आहे. भारताच्या लोकशाहीकडून आता अमेरिकाही प्रेरणा घेऊ लागली आहे, हे भारतासाठी अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाने व्यक्त केली. ट्रंप यांनी त्यांच्या संदेशात 2024 मध्ये झालेल्या भारतातील लोकसभा निवडणुकीचाही उल्लेख केला आहे. या निवडणुकीत भारतात 64.6 कोटी मतदारांनी मतदान केले. त्यांच्यापैकी केवळ 1 टक्का मते पोस्टाने आली होती. भारताप्रमाणे अमेरिकेतही मतदारांची नोंदपुस्तिका निर्माण झाली पाहिजे. प्रत्येक मतदाराला परिचय पत्र देण्यात आले पाहिजे. आम्हाला आता ‘अमेरिका वाचवा’ हा कायदा संमत करुन भारताच्या धर्तीवर अमेरिकेच्या निवडणूक पद्धतीत सुधारणा कराव्या लागणार आहेत, असा स्पष्ट संदेश ट्रंप यांनी त्यांच्या ट्रूथ सोशल या वेबसाईटवर दिला आहे. यावरुन भारताची निवडणूक व्यवस्था आता जगात आदर्श मानली जाऊ लागली असून ही बाब भारतासाठी समाधानाची आहे, अशी भलावण भारतीय जनता पक्षाने केली आहे.

मतदान यंत्रांसंबंधीचा वाद

भारतात अनेक वर्षांपासून मतदान यंत्रांच्या साहाय्याने मतदान होत आहे. ही प्रथा खरेतर काँग्रेसच्याच सत्ताकाळापासून पडलेली आहे. तथापि, आता काँग्रेसचा वारंवार पराभव होत असल्याने तो पक्ष इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांसंबंधी तक्रार करु लागला आहे. अन्य विरोधी पक्षांनाही यंत्रांविषयी संशय आहे. अनेकदा हे प्रकरण न्यायालयांमध्ये गेले. पण मतदान यंत्रात घोटाळे करता येतात, हे कोणताही विरोधी पक्ष सिद्ध करु शकलेला नाही. त्यामुळे आता हा वाद निवळल्याचे दिसून येते. तथापि, डोनाल्ड ट्रंप यांच्या नव्या वक्तव्याने विरोधकांची कोंडी झाल्याचे दिसून येते, असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे पुन्हा नव्या वादाला फोडणी मिळाली आहे.

Advertisement
Tags :

.