For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-अमेरिका व्यापार करार मार्चमध्ये

07:00 AM Dec 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारत अमेरिका व्यापार करार मार्चमध्ये
Advertisement

मुख्य आर्थिक सल्लागार नागेश्वरन यांचा विश्वास

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

भारत आणि अमेरिका यांच्यात असलेल्या व्यापार विषयक मतभेदांपैकी बहुतेक सर्व अडचणी दूर करण्यात आल्या असून येत्या मार्चपर्यंत दोन्ही देशांमध्ये एक व्यापक व्यापार करार होईल, असा विश्वास भारताचे मुख्य आर्थिक सल्लगार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी व्यक्त केला आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात अशा करारासंबंधीची चर्चा वेगाने होत असून ती अंतिम रुप घेत आहे. लवकरच, या संबंधात महत्वाची घोषणा केली जाईल, अशी माहिती नागेश्वरन यांनी दिली आहे.

Advertisement

नागेश्वरन हे गुरुवारी एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेला मुलाखत देत होते. या मुलाखतीत त्यांनी भारत आणि अमेरिका यांच्यात होत असलेल्या व्यापार चर्चेसंबंधी महत्वाची माहिती दिली. भारताची अर्थव्यवस्था भक्कम स्थितीत असून 2027 च्या आर्थिक वर्षातील अनुमाने सकारात्मक आहेत. भारताच्या रुपयाची घसरण होत असली तरी अर्थव्यवस्थेच्या पायाच्या भक्कमपणाच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन अधिक प्रमाणात दाखविण्यात येत आहे, असेही प्रतिपादन नागेश्वरन यांनी यावेळी केले.

दोन्ही बाजूंचा आशावाद

भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या महत्वाच्या अधिकाऱ्यांनी व्यापार करारासंबंधी आशावाद गेल्या काही दिवसांमध्ये व्यक्त केला आहे. भारताने अमेरिकेला आतापर्यंतचा सर्वात सकारात्मक प्रस्ताव काही दिवसांपूर्वी दिला आहे, असे विधान अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सार्वजनिकरित्या केले आहे. अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमीसन ग्रीर यांनी अमेरिकन सिनेटच्या अॅप्रॉप्रिएशन उपसमितीसमोर नुकतेच एक वक्तव्य केले असून भारताने गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेसमोर आतापर्यंतचे सर्वाधिक स्वीकारार्ह प्रस्ताव ठेवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तथापि, भारताला चर्चेत मोडणे अतिशय अवघड आहे, ही बाबही त्यांनी मान्य केली आहे. आपल्याला हानीकारक होईल, असे प्रस्ताव भारत मान्य करत नाही. आपल्या देशहितासंबंधीच्या भूमिकेवर तो नेहमीच ठाम राहतो. त्यामुळे भारताशी चर्चा करणे हे नेहमीच आव्हानात्मक असते, असे त्यांचे प्रतिपादन आहे.

तर आश्चर्य वाटेल

भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश आता चर्चेच्या अंतिम टप्प्यात पोहचले आहेत. मतभेदांचे बहुतेक सर्व मुद्दे दूर करण्यात आले आहेत. आता केवळ कराराचे अंतिम प्रारुप सज्ज होण्याचे काम उरलेले आहे. हा करार व्यापक आणि बहुउद्देशीय असेल. विद्यमान आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत दोन्ही देशांमध्ये व्यापक व्यापार करार झाला नाही, तरच आर्श्चय आहे, असे नागेश्वरन यांनी स्पष्ट केले.

बुधवारी चर्चेला प्रारंभ

अमेरिकेचे एक उच्चस्तरीय मंडळ भारतात आले आहे. बुधवारी भारताच्या प्रतिनिधीमंडळाची या उच्चस्तरीय मंडळासमवेत चर्चा झाली आहे. ती गुरुवारी रात्रीपर्यंतही चालली. हे उच्चस्तरीय मंडळ शुक्रवारपर्यंत भारतात आहे. बुधवारी आणि गुरुवारी चर्चेत बऱ्याच सकारात्मक आणि होकारात्मक घडामोडी घडल्या आहेत. आता उरल्यासुरल्या मुद्द्यांवर तोडगा काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ही चर्चा केवळ आर्थिक मुद्द्यांच्या संदर्भातील नाही. तर भू-राजकीय संदर्भही या चर्चेला आहेत. दोन्ही देश आर्थिक सहकार्याच्या दृढतेप्रमाणे भू-राजकीय संबंधांवरही एकमेकांच्या अधिक निकट येण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे महत्वाचे प्रतिपादन नागेश्वरन यांनी या मुलाखतीत गुरुवारी केले आहे.

शुल्काच्या प्रभावाला दिले तोंड

अमेरिकेने भारतावर 50 टक्के शुल्क लागू केल्यानंतर काही काळ जग भारताच्या अर्थव्यवस्थेसंबंधी चिंतेचे सूर लावत होते. तथापि. गेल्या 10 वर्षांमध्ये भारताने जी आर्थिक धोरणे स्वीकारली आहेत, त्यांच्यामुळे अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम झाला. त्यामुळे अमेरिकेच्या 50 टक्के करांनाही भारत यशस्वीरित्या तोंड देऊ शकला. भारताच्या निर्यातीवर या 50 टक्के करांचा परिणाम विशेषत्वाने झालेला नाही, असे आतापर्यंत तरी दिसून आले आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेत ज्या रचनात्मक सुधारणा करण्यात आल्या, त्यांचा हा परिणाम आहे. अमेरिकेच्या करांची झळ सौम्य करण्यासाठी भारताने इतर बाजारपेठा आपल्या निर्यातीसाठी अत्यल्प वेळेत शोधल्या आहेत, या बाबीचा त्यांनी उल्लेख केला.

Advertisement
Tags :

.