For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निमसोड गटातील वाढीव मताधिक्याने इच्छुकांच्या आशा पल्लवित

04:16 PM Dec 11, 2024 IST | Radhika Patil
निमसोड गटातील वाढीव मताधिक्याने इच्छुकांच्या आशा पल्लवित
The increased vote share in the Nimsod group has raised the hopes of aspirants.
Advertisement
वडूज : 
विधानसभा निवडणूक निकालाचा धुरळा काहीअंशी बसू लागला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी नुकताच पार पडला. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओ.बी.सी. आरक्षणाचा न्यायालयीन निर्णयाचा निकाल केव्हाही लागू शकतो. मंत्रीमंडळाचा विस्तार व ओ.बी.सी.आरक्षणाचा निकाल लागला की तापल्या तव्यावर पोळी भाजून घेण्यासाठी महायुतीचे विद्यमान सरकार गेली काही वर्षे रखडलेल्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका कधीही जाहीर करु शकते. या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत भाजपाचे आ. जयकुमार गोरे यांना निमसोड जिल्हा परिषद गटात मिळालेले मताधिक्य या पक्षातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणार्या उमेदवारांच्या आशा-आकांक्षाना धुमारे फुटणार आहेत.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत निमसोड गटातील खातवळ, बनपुरी, पिंपरी, धोंडेवाडी, गोरेगांव, निमसोड, डांभेवाडी, तडवळे, मांडवे, पेडगांव, सातेवाडी, हिंगणे, डाळमोडी, बोंबाळे, येरळवाडी, गणेशवाडी, वाकेश्वर, कातरखटाव, मानेवाडी-तुपेवाडी या 19 गावात आ. गोरे यांना मताधिक्य मिळाले आहे. तर दातेवाडी, पळसगांव, शितोळेवाडी, कदमवाडी, बडेखानमळा, पिंपळवाडी या फक्त सहा पोलवर राष्ट्रवादीचे उमेदवार प्रभाकर घार्गे यांना नाममात्र आघाडी मिळाली आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण याच गटातील येरळवाडी गावचे सुपुत्र असून ते कातरखटाव पंचायत समिती गणाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. या गणातील अपवाद वगळता बहुतांशी ग्रामपंचायतीवर भाजपाचीच सत्ता आहे. श्री. चव्हाण मोठे दुध व्यावसायिक असून त्यांच्या राजकीय महत्वकांक्षाही मोठ्या आहेत. खटाव मतदारसंघ स्वतंत्र झाल्यानंतर ते उमेदवारी करण्यासंदर्भात चर्चा आहे. त्यादृष्टीने पहिली स्टेप म्हणून ते जिल्हा परिषद निवडणूकीकडे पाहू शकतात.
दुसर्या बाजूला बनपुरीचे माजी सरपंच रामभाऊ साहेबराव देवकर-पाटील यांच्याही नावाची चर्चा आहे. पाठीमागे जिल्हा परिषद सदस्या तथा महिला बालकल्याण सभापती सौ. कल्पना नंदकुमार मोरे व काँग्रेस नेते रणजितसिंह देशमुख यांच्या पत्नी सौ. राजेश्वरी देशमुख या दोन बलाढ्या उमेदवारांच्या विरोधात श्री. देवकर यांच्या पत्नी शारदा देवकर यांनी कडवी लढत देत सुमारे 4 हजारांच्या वर मते घेतली होती. मात्र त्यावेळी सौ. देवकर अगदीच नवख्या उमेदवार होत्या. शिवाय गावोगावी संघटनेचे पाठबळही नव्हते. आता पाटील यांचा मतदारसंघात चौफेर संपर्क वाढला आहे. शिवाय राज्य व केंद्रातील सत्ता, आमदारकीची ताकद, गाव पातळीवर माजी उपसभापती नाना पुजारी यांच्या गटाशी झालेले मनोमिलन या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचीही पाटीलकी मिळविण्यासाठी रामभाऊ सज्ज होवू शकतात.
तिसरीकडे इतर लहान गावात पार्टी कितीही मजबुत झाली तरी मोठी मतदारसंख्या असणार्या निमसोड गावाला बाजूला ठेवून पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे राजकारण आजपर्यंत कधीही यशस्वी होवू शकले नसल्याचा दाखला आहे. त्यादृष्टीने विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शशिकांत विठ्ठलराव मोरे (नाना) यांचे नांव पुढे येवू शकते. शशि नानांना माजी आमदार कै. शिवाजीराव पवार यांचा मोठा राजकीय वारसा आहे. त्याचबरोबर शशिकांत यांचे बंधू उद्योगपती बाळासाहेब मोरे यांचा साखर कारखाना इंडस्ट्री उभारणी मुळे राज्य स्तरावरील वरिष्ठ पातळीवर अनेक बड्या हस्तींशी जवळून संपर्क आहे.  त्यामुळे मोरे यांच्या उमेदवारीचाही मजबुत दावा होवू शकतो.
विशाल बागल, चंद्रकांत देशमुखही चर्चेत  
 श्री. चव्हाण, श्री. देवकर-पाटील, श्री. मोरे यांच्या बरोबर आ. जयकुमार गोरे यांना पहिल्या निवडणूकी पासून सलग चार निवडणूकीत सावलीप्रमाणे साथ करणारे कातरखटावचे युवा नेते विशाल बागल यांनाही पडद्यासमोर कधीतरी येण्याची संधी मिळावी अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा असू शकते. त्याचबरोबर निमसोडचे युवा उद्योजक अजितकुमार चंद्रकांत देशमुख यांचेही नांव डार्क हॉर्स म्हणून स्पर्धेत येवू शकते.
 मतदारसंघ रचना अनं आरक्षणाचाही बागलबुवा
सद्यस्थितीत इच्छुकांच्या आशा-अपेक्षा वाढणे साहजिक आहे. मात्र निमसोड जिल्हा परिषद गट आहे तसाच राहणार की पुर्नरचनेत यातील काही भाग खटाव गटाला जोडला जाणार याबाबत अनिश्चितता आहे. त्याचबरोबर मुळचा आहे असा निमसोड गट राहिला तर लोकसंख्येच्या निकषानुसार या मतदारसंघावर अनुसुचित जाती प्रवर्गासाठी आरक्षीत होण्याची दाट शक्यता नाकरता येवू शकत नाही.
Advertisement
Advertisement
Tags :

.