For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डेंग्यूच्या रुग्णसंख्येतील वाढ चिंताजनक

11:03 AM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
डेंग्यूच्या रुग्णसंख्येतील वाढ चिंताजनक
Advertisement

बहुसंख्य हॉस्पिटलमध्ये डेंग्यूवर उपचार : लक्षणे दिसताच हयगय नको

Advertisement

मनीषा सुभेदार /बेळगाव

नेमेची येतो मग पावसाळा... आणि सुरू होते आजारांची मालिका... दूषित पाण्यामुळे अनेक समस्या उद्भवणे नेहमीचेच... डासांचा उपद्रव कायमचाच.. एकीकडे पाण्याची टंचाई तर दुसरीकडे पाणी फार दिवस साठवून ठेऊ नका, अशा आरोग्य खात्याच्या सूचना. परिणामी डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ, सध्या बहुसंख्य हॉस्पिटल्समध्ये डेंग्यूवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढती आहे.आरोग्य खात्याच्या मते गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. परंतु खासगी ठिकाणी उपचार करून घेणाऱ्यांच्या एलिजा टेस्ट झाल्या तरच निश्चित आकडा समजणार आहे. अर्थात आकडेवारी महत्त्वाची नाही तर त्या संदर्भात उपचार व काळजी महत्त्वाची आहे. त्या अनुषंगाने ज्येष्ठ फिजिशियन डॉ. रवींद्र वाळवेकर यांची घेतलेली मुलाखत...

Advertisement

डेंग्यूची उत्पत्ती कशी होते?

डेंग्यू हा रक्त शोषणाऱ्या डासांमुळे होणारा विषाणूजन्य आजार आहे. एडीसइजिप्ती या डासांच्या प्रजातीमुळे डेंग्यू पसरतो.

डेंग्यूची लक्षणे कशी ओळखावीत?

डेंग्यूच्या तापाचे दोन प्रकार आहेत. एक डेंग्यू फिव्हर ज्याला वैद्यकीय परिभाषेत डीएफ आणि डेंग्यू होमोरोहेजिक फिव्हर म्हणजेच डीएचएफ म्हणतात. पहिल्या प्रकारामध्ये थंडी वाजून ताप येतो. डोळ्यांच्या मागील बाजूस दुखणे सुरू होते. अंगदुखी सुरू होते, हाडे आणि सांध्यांमध्ये वेदना निर्माण होतात, कधी कधी खोकला वाढून उलट्या होतात, अंगावर रॅश येते. दुसऱ्या प्रकारच्या तापामुळे ताप आणि अंगदुखी होतेच. परंतु शरीरावर पुरळ येतात. नाकातून, हिरड्यांमधून किंवा मुत्रविसर्जन करताना रक्तस्त्राव होऊ शकतो. अशक्तपणा वाढून मळमळू लागते. अशा स्थितीत वेळीच उपचार केला नसल्यास मेंदू, फुफ्फुस किंवा किडनीवरही परिणाम होऊ शकतो.

यावर उपचार किंवा खबरदारी काय?

डासांपासून संरक्षण ही  महत्त्वाची खबरदारी आहे. डास सर्वत्रच आहेत, त्यांना टाळणे अशक्य आहे. म्हणून शक्यतो संपूर्ण त्वचा झाकली जाईल, असे कपडे वापरावेत. घराच्या दरवाजांना, खिडक्यांना जाळ्या लावून घ्याव्यात. संध्याकाळनंतर दारे-खिडक्या बंद ठेवाव्यात. स्वच्छ पाण्यावर हे डास निर्माण होतात,

हे खरे आहे का?

हो, डेंग्यू पसरविणारे डास साचलेल्या स्वच्छ पाण्यावरच तयार होतात. एसी किंवा फ्रीजखाली साचलेले पाणी, फुलदाण्या, रोपे लावलेल्या कुंड्या, बादल्या, जुने टायर यांच्यामध्ये पाणी साचले असेल तर तेथे निश्चितपणे डासांची प्रजाती वाढते. म्हणूनच अशा प्रकारे पाणी कोठेही साचणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. अगदी शहाळी किंवा नारळ वापरून फेकलेल्या करवंट्यांमध्येसुद्धा पाणी साचणार नाही याची काळजी घ्यायला हवी. यासाठी उपाय काय करायला हवेत? पाणी टंचाईच्या काळात पाणी साठवणे अपरिहार्य असते, अशा परिस्थितीत काय करायला हवे?प्रथम परिसर स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. पाणी साठवले तरी ते झाकून ठेवा, सध्याच्या स्थितीत आठवड्यातून एकदा पाणी साठवण्याची सर्व भांडी स्वच्छ घासून, धुवून कोरडी करून मग त्यात पाणी भरून झाकून ठेवा.

साधारण ताप व डेंग्यू ताप कसा ओळखावा?

डेंग्यूच्या तापाची लक्षणे वर दिलेली आहेतच. परंतु बऱ्याचदा 80 टक्के लोकांना हा डेंग्यूचा ताप आहे हे समजतच नाही. कारण त्यांना तीव्र लक्षणे जाणवत नाहीत. अन्य कोणत्या आजारासाठी डॉक्टरकडे गेल्यानंतर ब्लडटेस्टचा सल्ला दिला गेल्याने ती केल्यानंतर कदाचित डेंग्यू होऊन गेल्याचे निष्पन्न होते. एका आठवड्यात ताप गेला तरी तो संपला आहे असे नव्हे. दुसऱ्या प्रकारच्या डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स देण्याची गरज भासते. ही धोक्याची घंटा समजायला हरकत नाही. प्लाझ्मा कमी होतो. त्यामुळे ताप आला आणि असह्या अंगदुखी सुरू झाली तर सर्वप्रथम डॉक्टरांकडे जाणे सर्वोत्तम. रक्ताच्या चाचणीवरून निदान करणे सोपे व सुकर होते. शिवाय जितक्या लवकर निदान होईल तितक्या लवकर आजार आटोक्यात येऊ शकतो. पाण्याशिवाय राहणे अशक्य, डेंग्यू पसरविणारे डास साठलेल्या स्वच्छ पाण्यावरच तयार होतात. तसाच तो साचलेल्या पाण्यावरील डासांमुळेही होतो. परंतु संपूर्ण शहरात ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचलेली आहेत, त्यावर उपाय काय? वास्तविक पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग असा एक विभाग आहे. या विभागाने तसेच आरोग्य खात्याने, आरोग्य खात्याच्या सर्वेक्षण विभागाने सतत स्वच्छतेबाबत जागृती करायला हवी. शिवाय कोठेही पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.

जबाबदारी सर्वांचीच...

कोठेही पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन डॉक्टर करत आहेत. परंतु दुर्दैवाने शहर परिसरात स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. त्यातच पाण्याची पाईपलाईन घालण्यासाठी ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर तेथे खोदकाम केलेला ख•ा पूर्णपणे बुजविला जात नसल्यामुळे त्या ठिकाणी पाणी साचते. कोठेही पाणी साचणार नाही याची जबाबदारी प्रशासन, महानगरपालिका तसेच नागरिकांचीही आहे.

डेंग्यूवर बिम्समध्ये उपचार

डेंग्यू वाढू नये यासाठी आरोग्य खाते खबरदारी घेत आहे. पाण्यामध्ये कोठेही डासांची अंडी, (लार्व्हा) यांचे निर्मूलन केले जाते. कोठेही पॉझिटिव्ह लक्षणे आढळली तर त्या भागामध्ये फवारणी केली जाते. शहर आणि तालुका दोन्ही ठिकाणी नियमितपणे हे काम सुरू आहे. एखाद्या परिसरात एखादा डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तर त्या संपूर्ण परिसरात फवारणी करून डासांचा प्रतिबंध केला जातो. शिवाय किमान त्या परिसरात 10 टक्के सॅम्पल संकलित केले जातात. आजपर्यंत जानेवारी ते एप्रिलदरम्यान 869 सॅम्पल संकलित केले आहेत. त्यापैकी 76 जणांना डेंग्यूची लागण झाली असून बिम्समध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.

- डॉ. विवेक होन्नळ्ळी (जिल्हा संसर्गजन्य रोग नियंत्रणाधिकारी)

घ्यावयाची दक्षता

  • डेंग्यूचे डास साचलेल्या स्वच्छ पाण्यावरच तयार होतात.
  • एसी, कुलर, कुंड्या,जुने टायर, फ्रीजखाली पाणी, फुलदाणी यांच्यात पाणी साचू देऊ नका.
  • भरपूर पाणी प्या. अंगदुखी, थंडी वाजून ताप आल्यास त्वरित डॉक्टरांना भेटा.
  • गटारीत कचरा टाकणे बंद करून गटारीतील पाणी वाहते राहील, याची काळजी घ्या.

Advertisement
Tags :

.