द. आफ्रिकेच्या संघात नवोदित त्रिकुटाचा समावेश
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
संयुक्त अरब अमिरातमध्ये पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या अफगाण आणि आयर्लंड विरुद्धच्या मालिकांसाठी घोषित करण्यात आलेल्या द. आफ्रिकेच्या संघामध्ये एन्काबा पीटर, अॅन्डिले सिमीलेन आणि जेसन स्मिथ या नवोदित त्रिकुटाचा समावेश पहिल्यांदाज करण्यात आला आहे.
अॅन्डिले सिमीलेन हा अष्टपैलू असून त्याची आयर्लंड विरुद्ध होणाऱ्या टी-20 प्रकारातील पहिल्या दोन सामन्यांसाठी द. आफ्रिका संघात निवड करण्यात आली आहे. हे दोन्ही सामने अबुधाबी येथे खेळविले जातील. त्यानंतर आयर्लंडबरोबर तीन सामन्यांची वनडे मालिका शारजामध्ये 18 सप्टेंबरपासून खेळविली जाणार आहे. अष्टपैलू स्मिथ आणि फिरकी गोलंदाज पीटर यांनी यापूर्वी द. आफ्रिकेच्या टी-20 संघात आपला सहभाग दर्शविला होता. वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी याचा द. आफ्रिकेच्या घोषित करण्यात आलेल्या विविध तीन संघांमध्ये समावेश करण्यात आला आहे. गेल्या जूनमध्ये भारतात झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत द. आफ्रिकेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. भारताने अंतिम सामन्यात द. आफ्रिकेचा पराभव करुन जेतेपद मिळविले होते. मात्र द. आफ्रिकेला अलिकडेच झालेल्या विंडीज विरुद्धच्या मालिकेत 3-0 असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला होता. द. आफ्रिकेने आपली शेवटची वनडे मालिका गेल्यावर्षीच्या डिसेंबर महिन्यात भारताविरुद्ध खेळली होती आणि भारताने ती 2-1 अशा फरकाने जिंकली होती.
वनडे संघ अफगाण विरुद्धच्या सामन्यात - बवुमा (कर्णधार), बार्टमन, बर्गर, डी झोर्जी, फोर्च्युन, हेंन्ड्रीक्स, मार्करम, मुल्डेर, एन्गिडी, फेलुकेवायो, पीटर, सिमीलेन, स्मिथ, स्टब्ज, व्हेरेनी, विलियम्स
टी-20 संघ आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात - मार्करम (कर्णधार), बार्टमन, ब्रिझेकी, बर्गर, फोर्टुन, हेंन्ड्रीक्स, व्रुगेर, मुल्डेर, एन्गिडी, पीटर, रिक्लेटन, सिमीलेन, स्मिथ, स्टब्ज, विलियम्स
वनडे संघ आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात - बवुमा (कर्णधार), बार्टमन, बर्गर, डी झोर्जी, फोर्च्युन, मुल्डेर, एन्गिडी, फेलुकेवायो, पीटर, रिकेल्टन, स्मिथ, स्टब्ज, व्हॅन डेर ड्युसेन, व्हेरेनी, विलियम्स