विद्यालयाप्रतिचा कृतज्ञताभाव हीच खरी गुरुभक्तीची पोचपावती - महादेव मठकर
तळवडे जनता विद्यालयातील सुशोभित वर्गखोल्यांचा उद्घाटन समारंभ संपन्न
सावंतवाडी । प्रतिनिधी
माजी विद्यार्थ्यांच्या योगदानातून विद्यालयाचा होत असलेला भौतिक विकास हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी नक्कीच साह्यभूत ठरणार आहे. माजी विद्यार्थ्यांच्या मनात विद्यालयाप्रति असलेला कृतज्ञताभाव ही त्यांच्या गुरुभक्तीची पोचपावती आहे. असे प्रतिपादन सेंट्रल एक्साईज अँड कस्टमचे निवृत्त असिस्टंट कमिशनर तथा विद्यालयाचे माजी विद्यार्थी महादेव मठकर यांनी केले.तळवडे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शालांतर्गत पारितोषिक वितरण समारंभ व पारंपरिक वेशभूषा स्पर्धा आणि सुशोभित वर्गखोल्यांच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री मठकर हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार डॉ भालचंद्र कांडरकर, प्रमुख पाहुणे संस्था सभासद देवेश कावळे, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई, पर्यवेक्षक दयानंद बांगर, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष गणपत पांढरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले. यावेळी विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी श्रीमती मंदा कावळे यांच्या देणगीतून सुशोभीकरण करण्यात आलेल्या वर्गखोल्यांचे उद्घाटन श्री मठकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.यावेळी महादेव मठकर यांचा डॉ भालचंद्र कांडरकर यांच्या हस्ते तर श्रीमती मंदा कावळे यांचा सौ मिलन देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, भजन गायन स्पर्धा, आकाश कंदील स्पर्धा अशा वर्षभरातील विविध शाळांतर्गत स्पर्धांचे व क्रीडा महोत्सवांतर्गत विविध क्रीडास्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक दयानंद बांगर यांनी तर अहवाल वाचन मुख्याध्यापक प्रतापराव देसाई यांनी केले. उपस्थितांचे परिचय व स्वागत अंकुश चौरे यांनी केले. पारितोषिकांचे वाचन विजय सोनवणे सौ. मिलन देसाई, अजित मसुरकर, दिलराज गावडे, प्रवीण गोडकर यांनी केले. आभार प्रदर्शन सौ. मिलन देसाई यांनी तर सूत्रसंचालन श्री प्रसाद आडेलकर यांनी केले. या कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.