For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सासरचे बोल जसे...

06:22 AM Jan 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
सासरचे बोल जसे
Advertisement

अस्सं माहेर सुरेख बाई खायाला मिळतं

Advertisement

अस्सं सासर द्वाड बाई कोंडुनी मारीतं

किंवा मग

Advertisement

सासरच्या वाटे कुचूकुचू काटे

माहेरच्या वाटे नारळ फुटे

अशी हादग्याची गाणी म्हणत खेड्यापाड्यातील मुली आजही हादगा खेळतात. फेर धरून हादग्याची गाणी गातात. आज किंक्रांतीच्या म्हणजेच संक्रांतीच्या करिदिनाच्या निमित्तावर हे कुठे आठवावं? तर त्या गाण्यांचे संदर्भ कधीही कुठेही आठवतात. बहुतेक सगळ्या गाण्यांमध्ये सासर या गोष्टीला असंख्य दूषणं दिलेली आहेत. खूप तिरस्कार दाखवलेला आहे आणि माहेर म्हणजे किती मजा आणि हवा तेवढा खाऊ अशी चित्रणं त्या प्रत्येक गाण्यात दिसतात. आणि ही गाणी अशा मुलींनी रचलेली आहेत की ज्या अतिशय छोट्या वयातच लग्न करून सासरी गेल्या. खायचं, खेळायचं, बागडायचं आणि मनसोक्त वाढायचं वय हे त्यांचं सासरी जाण्याचं वय होतं. आणि आज नव्वदी गाठलेल्या आज्यांना विचारलं तर त्याही सांगतात की मी 11 व्या किंवा 12 व्या वर्षी लग्न होऊन सासरी गेले. कुणी सांगेल माझं आठव्या वर्षी लग्न झालं. आता अशा स्त्रियांची संख्या कमी होत असली तरी पण बंद मात्र झालेली नाही.

महाराष्ट्रातल्या कित्येक जिह्यात आजही बालविवाहाची गंभीर समस्या अस्तित्वात आहे. प्रस्तुत लेखाच्या विषयात या विषयाचा संबंध काय? तर हादग्याची गाणी म्हणजे त्या स्त्रियांच्या मनाचा आरसा असतो. संगीत या क्षेत्रामध्ये लोकगीतांचं फार मोठे योगदान आहे किंबहुना कुमार गंधर्वांसारख्या रसज्ञ संगीततज्ञ माणसानेही संशोधन केलेलं आहे की लोकधून या गोष्टीवरूनच रागसंगीत जन्माला आलं. याचा संबंध इतका गहिरा जर असेल तर लोकगीतांमधूनच स्त्रियांची मानसिकता काय आहे हे आपल्याला समजायला लागलं असं म्हणायला हरकत नाही.

हीच मानसिकता समजायची असेल तर ही हादग्याची गाणी म्हणताना ऐकावं. आता ती गाणी म्हणणाऱ्या किंवा नाचणाऱ्या लहान मुली असतात. पण त्यांच्या आया त्यांना कंपनी द्यायला पाठीमागे उभ्या असतात. किंवा आसपास बायका वावरत असतात. ती ती गाणी ऐकल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे जे बदलत जाणारे भाव असतात त्यावरून सासर आणि माहेर या संकल्पना स्त्राrच्या मनात काय म्हणून असतात आणि ती त्याकडे काय म्हणून बघत असते हे आपल्याला सहज कळेल. छोट्या वयातल्या मुली ज्या वेळेला लग्न करून सासरी जात होत्या त्या वेळेला त्यांना मारहाण होणे स्वाभाविक समजलं जायचं. कारण लहान मुलांना त्यांचे पालकही रट्टे घालतच असतात. परंतु हे रट्टे आपल्याला आई-वडिलांनी देणे आणि सासू-सासरे, मोठी जाऊ, नणंद किंवा दीर, यासारख्या बालमनाच्या हिशोबाने संपूर्णतया परक्या असलेल्या माणसांकडून मार खाणे या दोन गोष्टीत फार मोठा फरक आहे.

सासरी आल्यानंतर होणारे आणि झालेले अशाप्रकारचे अत्याचार, आपल्याला तरुणपण प्राप्त होत आहे याचा आनंद करण्याच्या आतच देहावर नवऱ्याकडून झालेले अत्याचार, ह्यांच्या झालेल्या जखमा त्या स्त्रियांच्या मनावरून कधीच निघून जात नसत. पूर्वीच्या काळी ज्ञानाचा, जाणिवांचा संपूर्ण अभाव यामुळे स्त्रियांची अवस्था मुलं जन्माला घालण्याचे मशीन यापेक्षा वेगळी नव्हतीच. त्यामुळे भराभर मुलं जन्माला येत असत. आणि प्रत्येकवेळचं बाळंतपण हे एक एक पुनर्जन्म म्हणूनच सामोरं येत असे. आणि अशावेळी कित्येकदा बाळंतपणादरम्यान स्त्रियांचे मृत्यू होत असत किंवा मृत्यूतुल्य वेदना तरी भोगावी लागत असे. या सगळ्या अत्याचाराचं, सगळ्या वेदनांचं चित्र जिवंतपणे या हादग्याच्या गाण्यांमधून उमटतंच. शिवाय लग्नात होणारी फसवणूक. या फसवणुकीचा प्रकार आजही कमी झालेला नाही पण त्यावेळी त्या फसवणूकीपासून सुटका करून घेण्याचा कुठला मार्गच त्या स्त्रियांजवळ नसे. मग हादग्यामध्ये ह्या गोष्टीचं चित्रण करणारे एक मार्मिक गाणं

आहे.

श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं.

असं कसं वेडं माझ्या नशिबी आलं?

वेड्याच्या बायकोने केले होते लाडू

तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले

चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले

आपल्याला वेडा नवरा नशिबात आल्याची तक्रार करणाऱ्या बायकोची ही व्यथा! पण या व्यथेचा शेवट फारच भयानक आहे.

विड्याची बायको एकदा होती झोपली

तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिली

मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकली!

काय हा दैवदुर्विलास म्हणावा! आताच्या स्त्रियांवर ही वेळ येण्याची शक्यता कमीच असते. वेडा नवरा नशिबात आला किंवा लग्नात फसवणूक झाली तर किमान कोर्टाचे दरवाजे तरी ठोठावता येतात. अगदीच नाही तर किमान त्या लग्नापासून सुटका करून माहेरी किंवा अन्यत्र आपलं पोट भरून राहता येतं. किंवा आयुष्यात दुसरा चांगला जोडीदार त्या व्यक्तीला निवडता तरी येतो. परंतु जेव्हा ही कुठलीच सोय स्त्राrला उपलब्ध नव्हती तेव्हाच्या यातनांचं कोणीतरी केलेले ते भीषण चित्रण आहे. जिला स्वत:ला ते भोगावं लागलं असेल, ती बिचारी हयातच राहिली नसेल. पण तिची कोणीतरी मैत्रीण, नातेवाईक स्त्राr असेल जिला ते बोलून दाखवावं असं वाटलं असेल. त्या काळच्या स्त्रियांना जसं बाहेर जायलाही फारशी साधनं आणि निमित्तं नव्हती म्हणून हळदीकुंकू भजनं वगैरे कार्यक्रम ठेवावे लागत. त्याचप्रमाणे बोलण्यासाठीही काही जागा किंवा स्वातंत्र्य नव्हतं म्हणून या स्त्राrगीतांमधूनच मनातला सारा कालवा त्यांना बाहेर काढावा लागे. बहुतांश वेळा स्त्रियांचं आयुष्य, मग ती कितीही आधुनिक असो, असं असतं की मनात असंख्य सल, यातना, वेदना, अपमान, निराशा, घुसमट घेऊन तिला जगावं लागतं. आणि यापेक्षाही वाईट गोष्ट जर कोणती असेल तर तिला याविषयी उघडपणे बोलता न येणे. तिला कुठेही बोलायला मुभा नसते. कित्येक वेळा माहेरचे नातेवाईकच तिच्याविरुद्ध फिरलेले असतात. मग त्यांची तक्रार करायची झाली तर करायची तरी कुठे? नवऱ्याने मारलं तर जायचं कुठे असे पूर्वीच्या बायका म्हणत असत. परंतु त्याहीपेक्षा भीषण हे आहे की माहेरच्यांनीच जर आसरा नाकारला तर जायचं कुठे हा बायांच्या समोरचा खरा प्रश्न असतो. मग या ना त्या प्रकारे त्या प्रचंड घुसमटीला वाट काढून द्यावी लागते. परंतु काही वेळा त्या घुसमटीला वाटच मिळत नाही. आणि मग स्त्रिया मनोरुग्ण होतात. आणि त्या आजाराच्या भरात बरळणाऱ्या स्त्रिया बघितल्या की पराकोटीचं वाईट वाटतं. कारण त्या बोलत असलेल्या गोष्टीतला शब्दनशब्द खरा असतो. परंतु त्यांना ते बोलण्यासाठी शब्दश: वेडं व्हावं लागतं. जेव्हा त्यांच्या मनावरचं त्यांचं नियंत्रण पूर्णपणे सुटतं तेव्हा त्या झटक्यात त्या धडाधडा खरं बोलत सुटतात. तेव्हा ते पचवण्याची शक्ती ऐकणाऱ्याच्या अंगी नसते. म्हणून सोपा मार्ग म्हणून त्या आपल्या

सासरचे बोल जसे कारल्याचे वेल

गोड कसे लागतील काही केल्या

सासरचे बोल जशा रेशमाच्या गाठी

रात्रंदिन रडविती धायी धायी

असे दिवस काढीत असाव्यात. संक्रांतीच्या गोड मुहूर्तावर हे काहीसं कडवट, पण महत्त्वाचं. त्यांच्याशी गोड नाही बोललात तरी हरकत नाही. तेवढं कडूजार बोलणं कमी करा म्हणजे झालं...!

-अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु

Advertisement
Tags :

.